Nagar Agricultural Festival : महोत्सवाद्वारे महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

नगर कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा ग्रामीण विकास व पशुसंवर्धन विभाग यांनी एकत्रितपणे यंदाच्या वर्षी १० ते १४ फेब्रुवारी या काळात नगर महोत्सव व पशुप्रदर्शनाचे आयोजन केले.
Agricultural Festival
Agricultural FestivalAgrowon

Women Empowerment : शेतकऱ्यांना शेतमालासाठी थेट ग्राहकपेठ मिळावी यासाठी नगर जिल्हा कृषी विभागातर्फे (Nagar District Agriculture Department) सतरा वर्षांपूर्वीपासून नगर येथे ‘महापीक बाजार’ उपक्रम, त्यानंतर ‘धान्य व फळे महोत्सव’ सुरू झाला. सन २००६ मध्ये तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील (District Agriculture Officer Vikas Patil) यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम पुढे राज्यात राबवण्यात येऊ लागला.

नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील (Shalini Vikhe Patil) यांच्या संकल्पनेतून बचतगटांतील महिलांसाठी २००९ पासून ‘साई ज्योती स्वयंसाह्यता यात्रा’ उपक्रम सुरू झाला. कोरोनामुळे मागील दोन वर्षे तो झाला नाही.

यंदा मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil), खासदार डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosle), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिवाजी जगताप यांनी पुढाकार घेतला.

त्यातून कृषी विभाग, जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन विभाग यांच्या एकत्रित समन्वयातून यंदा १० ते १४ फेब्रुवारी या काळात महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असावा. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांचे मोठे सहकार्य लाभले.

Agricultural Festival
Agricultural Festival : कृषी महोत्सवातून मिनी जलकुंडाचा पर्याय

कृषी विभागाची प्रात्यक्षिके

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (मिलेट्‍स) म्हणून साजरे केले जात आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने तृणधान्यांबाबत जागृती करण्यासाठी महोत्सवात उपक्रम राबवले. दुष्काळावर मात करण्यासंबंधीची प्रात्यक्षिके पाहण्यास मिळाली.

संरक्षित शेती, कृषी निविष्ठा, मुरघास तयार करणारे यंत्र, सूक्ष्म सिंचन, कांदाचाळ, सूक्ष्म अन्न प्रक्रिया, पूरक व्यवसाय, हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती, नाडेप, बायोडायनॅमिक कंपोस्ट, गांडूळखत, पाचट आच्छादन, प्लॅस्टिक मल्चिंग, माथा ते पायथा मृद्‍ व जलसंधारण, शेततळे, कांदा चाळ, पॉलिहाउस, शेडनेट, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मशरूम, मुक्तसंचार गोठा आदींचा समावेश राहिला.

महोत्सवातील लक्षवेधक बाबी

१) महिला बचत गटांतर्फे निःशुल्क स्टॉल. सुमारे ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स.

२) ग्राहकांकडून मागणी असलेल्या व अकोले तालुक्यात उत्पादित काळभात, जिरेसाळ, कोळपी, आंबेमोहर तसेच हातसडीचा तांदूळ.

३) नगर जिल्ह्याच्या विविध भागांतील कडधान्ये, ज्वारी, बाजरी, गहू. शेतकरी गट व कंपन्यांकडून विविध प्रकारच्या डाळी, भाजीपाला, प्रक्रियायुक्त उत्पादने.

४) कर्जतमधील शिपी आमटी, पुरणपोळी, खानदेशी मांडे.

५) ‘मिलेट्‍स’ विषयावर परिसंवाद.

६) पशुप्रदर्शनात देवणी, लाल कंधारी, डांगी, खिलार, गीर, कांकरेज आदी गायींच्या जाती, मुऱ्हा म्हैस, शेळ्यांमध्ये जमनापरी, बीटल, उस्मानाबादी, संगमनेरी, आफ्रिकन बोअर, दख्खनी व माडग्याळ मेंढी, विविध जातींच्या कोंबड्या.

Agricultural Festival
Nagar Agricultural Festival : नगर महोत्सवात तीन दिवसांत सुमारे सव्वाचार कोटींची उलाढाल

‘उमेद’ला मिळाले बळ

ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून बचत गट चळवळ चालवली जात आहे. सन २०१८ पासून राज्यात ‘उमेद’ अभियान राबवले जात आहे. त्याद्वारे गटांना भांडवल, लघुउद्योगासाठी मदत, व्यवसाय कौशल्यवृद्धी या बाबी साध्य केल्या जात आहेत.

नगर जिल्ह्यात एकूण २२ हजार ६५१ महिला बचत गट आहेत. ९४२ ग्रामसंघ स्थापन केले असून, बचत गटांच्या माध्यमातून सात शेतकरी बॅंका तयार झाल्या आहेत. गटांद्वारे सुमारे सहा लाखांहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत.

आतापर्यंत गटांना अडीचशे कोटीपेक्षा अधिक अर्थसाह्य झाले आहे. नगर महोत्सवात महिला बचत गटांचा उत्साह पाहून उमेदला अधिक बळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. बचत गटांना यंदा पहिल्यांदाच स्टॉल मोफत मिळाले. आगामी काळात पाच कोटी रुपये खर्च करून बाजारपेठ व्यासपीठ मिळण्यासाठी महिला बचत गट भवन बांधले जाणार आहे.

आर्थिक उलाढाल वाढली

पूर्वी जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या धान्य- फळे महोत्सवात साधारणपणे दीडशे स्टॉल्स आणि पाचशेच्या जवळपास शेतकऱ्यांचा सहभाग असायचा. साई ज्योती स्वयंसाह्यता यात्रेत जिल्हा स्तरावर २००, तर विभाग स्तरावर २५० स्टॉल्स असत.

या वर्षी कृषी विभागाचे २०० स्टॉल्स होते. त्यात धान्य व फळांचे ३६, प्रक्रियायुक्त पदार्थांचे ३०, रोपवाटिका ४, कृषी निविष्ठा ९०, शेती अवजारे २० व योजनांची माहिती देणारे २० स्टॉल असा समावेश राहिला.

साईज्योती स्वयंसाह्यता यात्रेत ३०० हून अधिक महिला बचत गटांचे स्टॉल्स व पंचवीस हजारांपेक्षा महिलांचा सहभाग राहिला. बचत गटाच्या माध्यमातून पाच कोटी ३२ लाख तर कृषी विभागाच्या खरेदी-विक्रीतून सुमारे चार कोटी ९३ लाखांची उलाढाल झाली.

एकत्रित महोत्सवातून दरवर्षीच्या स्वतंत्र महोत्सवांच्या तुलनेत पाच दिवसांत ५० टक्के उलाढाल अधिक झाली.

संपर्क - कृषी विभाग- प्रकाश आहेर, ९४२०९३२३९७, प्रवीण गोरे, ९४२१५५८८३४, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ९७६५८०६१०२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com