होय, आम्ही पिकवू शकतो आणि विकू पण शकतो!

शेतकरीपुत्र उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आंबा विक्रीसाठी पुढाकार
होय, आम्ही पिकवू शकतो आणि विकू पण शकतो!
MangoAgrowon

अकोला ः शेतकरी पिकवू शकतो पण त्याला विकता येत नाही, असे नेहमी बोलले जाते. पण आता परिस्थिती बदलू लागली. शेतकऱ्याची नवी पिढी हिमतीने प्रयोग करू लागली. बुलडाणा जिल्ह्यातील कोनड खुर्द येथील शेतकरी पुत्र असलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने स्वतःच्या शेतातील केसर आंबा विक्रीसाठी (Mango Sale) असाच पुढाकार घेतला. आंबा खरेदी करायला व्यापारी तयार नसल्याने कुटुंबावर पसरलेले चिंतेचे ढग त्यांच्यामुळे दूर तर झालेच शिवाय होय, आम्ही पिकवू शकतो व विकू पण शकतो ! असा लाखमोलाचा विश्‍वाससुद्धा मिळाला.

ही गोष्ट आहे, बुलडाणा जिल्ह्यातील कोनड खुर्द (ता. चिखली) येथील जावळे कुटुंबाची. या कुटुंबाने सोयाबीन व तूर पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून दोन एकरांत केसर आंब्याची (Kesar Mango) १४ बाय सात अंतरावर ८७० झाडे लावली. या बागेतून उत्पादनाचे हे पहिलेच वर्ष होते. आंबा विकण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत संपर्क केला. व्यापाऱ्यांना आंब्याचे फोटो पाठवले. फळाचे वजन २५० ते ३५० ग्रॅमपर्यंत असल्याचे सांगितले. हे आंबे पाहून व्यापारीसुद्धा कौतुक करीत. हा निर्यातक्षम दर्जाचा माल असल्याचे सांगत होते. व्यापाऱ्याने बागेस भेट दिल्यानंतर आंब्याचा माल कमी आहे असे कारण देत कमी भावात मागणी करू केली. तसेच गुजरातचा केसर यंदा खूप आला आहे असे सांगत भाव पडतील हे सांगून चिंताही वाढवली.

स्वतः यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे प्रातांधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. शरद ज्ञानेश्‍वर जावळे पाटील यांनीसुद्धा व्यापाऱ्याला आंबे तोडण्याची विनंती केली. सात मे रोजी जेव्हा व्यापारी बाग बघायला शेतात आला त्या वेळी त्याने दोन दिवसांत बाग तोडली नाही तर फळे झाडावर पिकतील, असे सांगितले. त्यामुळे त्याला उद्याच आंबे तोड, भावाचे नंतर पाहू, अशी विनंती केली. पण तो व्यापारी माल कमी आहे, वाहतुकीसाठी परवडणार नाही, असे कारण देत टाळाटाळ करीत होता. डॉ. जावळे यांनी त्याला वाहतूक खर्चसुद्धा देतो, पण आंबा उद्याच तोड, असेही सांगितले. मात्र त्याने ते मान्य केले नाही व व्यापारी निघून गेले.

येथून जावळे कुटुंबात चिंता तयार झाली. व्यापारी गेल्यावर डॉ. जावळे यांच्या वडिलांनी ‘‘आम्ही शेतकरी काही पण पिकवू, पण आम्ही विकू शकत नाही. तू जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत तू ही बाग व्यापाऱ्याला देऊन टाक, आम्ही कोठे जाणार आंबा विकायला,’’ असे त्यांना सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तणाव होता. या वेळी आपण उगाच पीक पद्धतीत बदल करून केसर आंबा लावला, अशी खंत डॉ. शरद यांनाही वाटू लागली.

विक्रीसाठी घेतला पुढाकार

आपल्या मालाचा दर्जा व गुणवत्ता चांगली असल्याने मार्केटचा थोडा अभ्यास केला तर आपण सुद्धा स्वतः विकू शकतो हा विचार डॉ. शरद यांनी आई बाबा व पत्नीला सांगितला. ते म्हणाले, ‘‘तू ज्या पदावर नोकरी करीत आहे, ते तुला शोभणार नाही. लोक नाव ठेवतील. पण आपल्या शेतातील माल विकायला काय लाज,’’ असे असे सांगितले. आपण केसर आंबा व्यवस्थित बॉक्समध्ये कोणतीही प्रक्रिया न करता पॅकिंग करून दिला व लोकांना गुणवत्तेची खात्री दिली, तर आपण देखील विकू शकतो याची खात्री होती.

डॉ. जावळे यांची सुट्टी संपणार असल्याने त्यांनी परत जाताना काही बॉक्स नेण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी आंबा तोडणे, पॅकिंगची माहिती घेत पत्नी, भाऊ, भावजय यांना दिली. डाळिंब पॅकिंगसाठी लागणारे १० किलो वजनाचे १४ बॉक्स भरून गाडीत घेऊन गेले. त्या वेळी त्यांच्याकडे फक्त १० किलो आंब्याची ऑर्डर होती. डॉ. शरद नोकरीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी हा आंबा आमच्या शेतातील असून कोणत्याही प्रकारे प्रकिया न करता झाडाचा असल्याचे सांगितले. सोबतच बाग, आंबा तोडतानाचे फोटो, एक छोटे पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन मोबाईलवर टाकले. त्यानंतर पाहता पाहता सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व बॉक्स विक्री झाले. आंब्याची चव घेतल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीकडे ४०० किलो आंब्याची ऑर्डर आली. गावाकडून वडिलांनी पॅकिंग करून पुन्हा आंबा पाठवला. तोसुद्धा आंबा दुसऱ्या दिवशी आपल्या भावाने विकला. डॉ. शरद यांची पत्नी व मुलीने आतापर्यंत सुमारे दीड टन आंबा अशा पद्धतीने विक्री केला.

आपण स्वतः कोणतीच लाज बाळगू नये. लोक काय म्हणतात याचा विचार न केल्यास व आपल्या मालाच्या गुणवत्तेमध्ये तडजोड न केल्यास व्यवस्थित भाव मिळतो. मी केलेल्या विक्रीमुळे माझ्या बाबाच्या चेहऱ्यांवर आनंद पसरल्याचे खूप समाधान मिळाले. त्यांच्या मेहनतीचे चीज झाले होते. यापुढे नॅचरल निर्मल- सुरेख केसर आंबा या ब्रँडने आता विक्रीचा संकल्प केला आहे.
डॉ. शरद जावळे, पाटील, प्रातांधिकारी, वणी, यवतमाळ मो. ९७६३८१७६१४
शेतकऱ्यांच्या पोरांनी कितीही मोठे झाले तरी शेती व माती विसरली नाही पाहिजे. याचा डॉ. शरद जावळे यांनी आदर्श घालून दिला आहे. यापासून प्रेरणा घेऊन बरेच तरुण नक्कीच पुढे येतील.
एकनाथ डवले, कृषी सचिव, महाराष्ट्र राज्य

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com