
जालना : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील लवकर छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे (Grape Orchard) सौदे देणे जवळपास आठवडाभरापासून सुरू झाले आहे. कडवंची शिवारातील काळ्या द्राक्षांचा १२१ रुपये प्रति किलो, (Black Grape Rate) तर इतर द्राक्षांना ५० ते ७० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सौदी झालेल्या काही बागांत काढणी (Grape Harvesting) सुरू झाली आहे.
जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहे. शिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील सटाना, पळशी परिसरांतही द्राक्ष बागांचा विस्तार झाला आहे
यंदा अति पावसाने बांगांचा घात केला. लांबलेल्या छाटण्याचाही परिणाम उत्पादन व बागा फुटण्यावर झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ३० ते ४० टक्के बागा फुटल्याच नाही. दुसरीकडे लवकर छाटण्या केलेल्या व आता काढणी सुरू असलेल्या द्राक्ष बागांमध्ये उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटात दोन हंगाम गेल्याने द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला. चंद्रकांत क्षीरसागर म्हणाले, की काही अंशी वातावरण पोषक असले, तरी यंदा कडवंची शिवारात ऐरवी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या छाटण्या जवळपास ५ डिसेंबरपर्यंत चालल्या. पहिल्या टप्प्यात अर्ली छाटण्या २५ टक्के, ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत जवळपास ६० टक्के, तर त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत जवळपास ३० टक्के झाल्या.
टप्पेनिहाय झालेल्या छाटणीत जवळपास २० ते ३० टक्के बागा फुटल्याच नाही. केवळ ३० ते ४० टक्के बागा बऱ्यापैकी फुटल्या, तर उर्वरित बांगाची फूट ही जेमतेम राहिली. डाऊनी भुरी घडकजु आदी आक्रमण द्राक्ष बागांवर झाले.
गेल्या हंगामात द्राक्षात अपेक्षित गोडी नव्हती. कदाचित घडांची व त्यामध्ये मन्यांची संख्या जास्त यामुळे ती गोडी नसावी म्हणून यंदा शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या अपेक्षित गळ न झाल्याने कृत्रिमरीत्या गळ होण्यासाठी प्रयत्न केले.
त्यासाठी थिनिंगही केली, त्यामुळे गोडी चांगली येण्याची आशा असल्याचे द्राक्ष उत्पादक दत्तात्रय चव्हाण म्हणाले. मोठ्या प्रमाणात २६ जानेवारी नंतरच द्राक्ष बाजारात येण्याची अपेक्षा आहे, असे असले तरी अनेक बागांमध्ये उत्पादनात मोठी घट दर बरे असली, तरी द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढवणारी आहे.
एक एकरावर काळे द्राक्ष बाग घेतली. नुकत्याच दिलेल्या सौद्यात त्याला व्यापाऱ्याकडून १२१ रुपये प्रति किलोचा दर देण्यात आला. तीन टप्प्यांत व्यापारी द्राक्षांची तोडणी करणार आहे.
- विक्रम क्षीरसागर,
द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना
लवकर छाटणी झालेल्या बागांचे सौदे सुरू आहेत. दरकवाडी व हिवरा येथील काही द्राक्ष बागा ६५ ते ६८ रुपये प्रति किलोने दिल्या आहेत. उत्पादनात मात्र ४० ते ५० टक्के घट येते आहे.
- नंदकिशोर साळुंके,
द्राक्ष उत्पादक गोलटगाव, जि. औरंगाबाद
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.