Abdul Sattar : सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी वसुलीचे ‘टार्गेट’?

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड महोत्सवाला आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली राज्यभरातून १५ कोटी रुपयांची माया गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

पुणे : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या सिल्लोड महोत्सवाला (Sillod Festival) आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली राज्यभरातून १५ कोटी रुपयांची माया गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘हे काम प्रत्यक्ष मंत्र्यांनी सांगितलेले असून तुम्हाला ते करावेच लागेल,’ अशा स्पष्ट सूचना दस्तुरखुद्द कृषी आयुक्तांनीच (Agriculture Commissionor) एका बैठकीत दिल्याचे उघड झाले आहे. “महोत्सवासाठी कृषी मंत्रालयातून अर्वाच्य भाषेत दमदाटी होत असून, पैसे गोळा करण्यासाठी राज्यभर चक्क अधिकारीनिहाय याद्या पाठविण्यात आल्या आहेत,” अशी माहिती मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

Abdul Sattar
Abdul Sattar : सिल्लोड महोत्सवाचा कृषी खात्याला ‘ताप’

“कृषिमंत्र्यांच्या कार्यालयातील गृह खात्याच्या एका कर्मचाऱ्याला, तसेच महसूल खात्याच्या एका अधिकाऱ्याला या महोत्सवासाठी माया गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे दोघेही अधिकारी सध्या मंत्र्यांचे नाव सांगून राज्यभर कृषी अधिकाऱ्यांना दमदाटी करीत आहेत. टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून ते अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहत आहेत. तसेच तुला बडतर्फ करू, निलंबित करू, तुझी बदली करू, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना तंबी देत आहेत,”असे एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले.

Abdul Sattar
Abdul Sattar : कृषिमंत्री सत्तारांचा राजीनामा घ्या

श्री. सत्तार यांनी १ ते १० जानेवारी दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील स्वतःच्या सिल्लोड विधानसभा मतदार संघात ‘सिल्लोड महोत्सव’ आयोजित केला आहे. शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन घेत असल्याचे भासवून प्रत्यक्षात राज्यभर खंडणी गोळा करणारी एक यंत्रणा उभारली गेली आहे. त्यातून १५ ते ५० कोटी रुपयांपर्यंत माया गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. कृषी उद्योग कंपन्या, खते, कीडनाशके, बियाणे विक्रेते, संघटना, कृषी यंत्रे पुरवठादार अशा सर्व घटकांकडून ही रक्कम गोळा केली जात आहे.

“स्वतः कृषी आयुक्तांनी आम्हाला ६ डिसेंबरला कृषी आयुक्तालयात एका बैठकीसाठी बोलावले होते. तेथे राज्यातील सर्व कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक तसेच संचालक उपस्थित होते. या सर्व अधिकाऱ्यांसमोरच आयुक्तांनी आम्हाला सत्तार यांच्या महोत्सवासाठी राज्यभरातून पैसे गोळा करावे लागतील, असे सांगितले. आयुक्तांनीच ही भूमिका घेतल्याने सर्व अधिकारी स्तंभित झाले. त्यामुळे सध्या सारे कृषी अधिकारी तणावाखाली आहेत,” अशी माहिती एका संचालकाने दिली.

कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याच्या कार्यालयातून, तसेच सत्तार यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून जमा होणाऱ्या रकमांचा हिशेब घेतला जात आहे. “राज्यातील सर्व कृषी अधिकारी स्वतः मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषिमंत्रालयाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनींचे कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासल्यास हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा काही तासांत उघड होईल,” अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

दरम्यान, कृषिमंत्र्यांच्या या खंडणी महोत्सवामुळे तणावाखाली आलेले काही प्रामाणिक अधिकारी निविष्ठा उद्योगाकडे लाच मागण्याच्या मानसिकतेत नाही. त्याऐवजी स्वतःचा एक महिन्याचा पगार व त्यात काही रक्कम टाकून स्वतःपुरते टार्गेट पूर्ण करण्याचा निर्णय या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

मोबाइल कॉल्स व्हायरल...

सिल्लोड महोत्सवाकरिता पैसे गोळा करणाऱ्या विविध स्तरांवरील अधिकारी-कर्मचारी कृषी निविष्ठा उत्पादक, विक्रेत्यांना मोबाइलवरून संपर्क साधत आहेत. या कॉल्स्चे रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत असून, यातील संवादांमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

वसुलीचे उद्दिष्ट व नियोजन...

- दहापेक्षा जास्त तालुके असलेल्या जिल्ह्यातून २५००० रुपयांच्या ३० प्लॅटिनम प्रवेशिका (पास), १५ हजार रुपयांच्या ५० डायमंड, १० हजार रुपयांच्या ७५ गोल्ड आणि ७५०० रुपयांच्या १५० सिल्व्हर प्रवेशिका खपविणे बंधनकारक

- दहापेक्षा कमी तालुके असलेल्या जिल्ह्यातून २५००० रुपयांच्या १५ प्लॅटिनम प्रवेशिका (पास), १५ हजार रुपयांच्या २५ डायमंड, १० हजार रुपयांच्या ४० गोल्ड आणि ७५०० रुपयांच्या ७५ सिल्व्हर प्रवेशिका खपविणे बंधनकारक

- राज्यस्तरावरून निविष्ठा उद्योगाचे परवाने दिलेल्या कंपन्यांची ज्या जिल्ह्यात मुख्यालये आहेत, तेथे १० पेक्षा जास्त तालुके असल्यास

तेथून २५ हजार रुपये किमतीच्या २५ प्रवेशिका खपविणे बंधनकारक

- राज्यस्तरावरून निविष्ठा उद्योगाचे परवाने दिलेल्या कंपन्यांची ज्या जिल्ह्यात मुख्यालये आहेत, तेथे १० पेक्षा कमी तालुके असल्यास तेथून २५ हजार रुपये किमतीच्या १० प्रवेशिका खपविणे बंधनकारक

- प्रवेशिका खपविण्याची जबाबदारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांवर असेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com