
नागपूर : बुरशीजन्य रोगांच्या (Fungal Disease On Orange) परिणामी संत्रापट्ट्यात दरवर्षी उत्पादकांना (Orange Producer) फळगळीच्या (Fruit Fall) समस्येला सामोरे जावे लागते. कोट्यवधी रुपयांचे नुकसान या माध्यमातून होत असताना संत्रा फळगळ (Orange Fruit Fall) मदतीच्या कक्षेत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते. यंदा मात्र ४८ हजार हेक्टर क्षेत्र मदतीच्या कक्षेत आणण्यात आले आहे.
विदर्भात सुमारे एक लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर संत्रा लागवड आहे. त्यातील एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात तर २५००० हेक्टर क्षेत्र नागपूर जिल्ह्यात आहे. उर्वरित राज्यात संत्रा लागवड क्षेत्र २५ हजार हेक्टर क्षेत्र असल्याचे कृषी विभागाची आकडेवारी सांगते.
यंदाच्या खरिपात मार्च महिन्यापासूनच तापमानात वाढ झाल्याने संत्रा उत्पादकांना फळगळतीला सामोरे जावे लागले. त्यानंतर बागा ताणावर असताना पाऊस येऊन दुसऱ्यांदा फळगळती झाली. तब्बल ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा ‘महाऑरेंज’ने केला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान तत्काळ दिसून येते. त्यामुळे शेतात उभ्या पिकांचे सर्वेक्षण व पंचनामे तत्काळ केले जातात.
फळझाडांवर आधी बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यानंतर काही दिवसांनी फळगळती होते. परिणामी फळगळतीची सर्वेक्षण व पंचनामे तत्काळ करणे शक्य होत नाही, अशा तांत्रिक अडचणींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून संत्रा उत्पादकांना मदतीपासून वंचित राहावे लागत होते.
यंदा सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीचे दुबार-तिबार सर्वेक्षण व पंचनामे झाले. या काळात फळगळ दिसून आल्याने अमरावती विभागातील तब्बल ४० हजार हेक्टर क्षेत्र सर्वेक्षण व पंचनाम्याखाली आणण्यात आले. शासनाने निधी देखील दिला. त्याचे वितरणही शेतकऱ्यांना करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या ३५ हजार हेक्टरवरील बागायतदारांना अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मदत दिली. ५००० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान संततधार पावसामुळे झाले. या दुसऱ्या टप्प्यातील मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. परंतु अद्याप निधी मिळालेला नाही. नागपूर जिल्ह्यात ८००० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान दाखविले. नैसर्गिक आपत्तीमधील मदतीचे निकष यासाठी लावले. निधी प्राप्त होताच त्याचे वितरण केले जाईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.