
Agriculture Department News अकोला ः राज्यात कृषी खात्यातील (Agriculture Department) तांत्रिक तसेच प्रशासनिक गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर (Promotion) लादलेली स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे. याबाबत सोमवारी (ता.६)
शासनाचे अवर सचिव अ. नि. साखरकर यांच्या स्वाक्षरीचे पत्र जारी करण्यात आले. स्थगिती उठवल्याने राज्यातील कृषी खात्यात असलेल्या या संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ६ सप्टेंबर २०२२ रोजी तातडीचे पत्र काढत कृषी विभागाअंतर्गत कार्यरत तांत्रिक व प्रशासनिक संवर्गातील गट ‘ब’ आणि ‘क’ या संवर्गाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती, अंशतः बदल या पुढील आदेश देईपर्यंत शासनाच्या मान्यतेशिवाय करू नये, असे स्पष्ट बजावले होते.
याचा संदर्भ देत साखरकर यांनी कृषी आयुक्तांना ८ सप्टेंबर २०२२ ला पत्र देत शासनाच्या मान्यतेशिवाय बदल करू नये, असे सुचविले होते. त्यानंतर राज्यात या संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये खदखद सुरु झाली होती.
कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक संघटनांनी ही स्थगिती उठवण्याची सातत्याने मागणी लावून धरली. गेल्या महिन्यात मुंबईत आझाद मैदानावर कृषी सहायक संघटनेने केलेल्या उपोषणातही या मागणीचा समावेश होता.
कृषी मंत्र्यांनी दोन ओळींचे पत्र काढत बदली, पदोन्नती प्रक्रिया शासन मान्यतेशिवाय करू नये, असे पत्र देण्यामागचे कारण अद्यापही उलगडलेले नाही. गेले पाच महिने राज्यात यामुळे संपूर्ण प्रक्रियाच थंडावली होती.
याविरुद्ध रोष वाढत चालला होता. अखेरीस वाढती मागणी पाहता शासनाला हा आदेश रद्द करावा लागला. आता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर संघटनांकडून आनंद व्यक्त केला जाऊ लागला आहे.
पदोन्नती, बदल्यांचा मार्ग मोकळा
स्थगिती उठविल्याने कृषी विभागातील गट ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, बदलीचा पोळा फुटण्याची शक्यता आहे. गेले काही महिने पदोन्नती, बदल्यांची फाइल स्वीकारली जात नव्हती. आता स्थगिती उठल्याचा फायदा प्रतिक्षेत असलेल्यांना होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.