
Onion Disease नाशिक ः चालू रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवडी (Summer Onion Cultivation) वातावरणीय बदलांमुळे (Climate Change) अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. गेल्या सप्ताहात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तसेच धुके पडल्याने अनेक भागात कांद्यावर करपा या बुरशीजन्य रोगाचा व फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
दरम्यान, आता वातावरण निवळल्याने काही अंशी नुकसान टळले असले तरी प्रादुर्भाव अनेक भागांत आहे. या पार्श्वभूमीवर लागवडी वाचविण्यासाठी फवारण्या सुरू आहेत.
मात्र अगोदरच उत्पादन खर्च वाढलेला असताना पीक संरक्षण खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
जिल्ह्यात सटाणा, कळवण, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगाव, देवळा व निफाड तालुक्यांत उन्हाळ कांदा लागवडी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत.
मात्र ढगाळ वातावरण, पडणाऱ्या धुक्यामुळे आद्रता टिकून राहिल्याने सुरुवातीच्या टप्प्यातील आगाप कांदा लागवडीमध्ये रोगांमध्ये बुरशीजन्य करपा व फुलकिड्यांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
थंडीच्या काळात ढगाळ वातावरण, पाऊस असल्यास करपा वाढण्याची शक्यता असते. हवेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे हा प्रादुर्भाव वाढतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
करपा रोगाचा प्रादुर्भाव अनेक भागांत दिसून आला आहे. फुलकिडींना पोषक वातावरण तयार झाल्याने प्रादुर्भाव वाढल्याची स्थिती आहे. ढगाळ वातावरण व धुक्यामुळे कांद्याची वाढ थांबली आहे.
ज्या रब्बी लागवडी ७० दिवसांवर झाल्या असून मान धरून पात वाढली आहे. अशा लागवडीमध्ये परिणाम जास्त दिसून येत आहे.
पात वाढताना हवेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे अडचणी वाढल्या आहेत. पडणाऱ्या धुके व दव पडून पाने ओलसर असलेल्या ठिकाणी ही वाढ अधिक झाल्याची निरीक्षणे आहेत.
...ही आहे नुकसानीची स्थिती :
- लागवडीत पाने पिवळी पडले
- रोपांचे शेंडे जळून गेले आहेत.
- प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावली
- उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता
गेल्या वर्षांपासून हंगामातील सतत वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे कांदा पिकावर प्रतिकूल परिणाम जाणवत आहे. करपा, मर व फुलकिडी यांचा प्रादुर्भाव आहे. खर्च वाढल्याने शेतकरी तोट्यात जात आहे. अपेक्षित उत्पादनामध्ये ५० टक्के घट आहे.
- शरद देवरे, कांदा उत्पादक, कोठरे, ता. मालेगाव.
ओलसरपणा टिकून राहिल्याने हिरव्या ओलसर पातीवर बुरशी वाढल्याचे दिसून आले आहे. आर्द्रता वाढल्यानंतर प्रादुर्भाव वाढत जातो. त्यामुळे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सकाळी लवकर दव झटकून घ्यावे. शिफारशीनुसार, स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा वापर करावा. थंडीचा वाढल्यास स्टेमफिलीअम नावाचा करपा अधिक प्रमाणावर दिसून येतो. त्यामुळे प्रादुर्भाव स्थितीनुसार फवारण्या घ्याव्यात.
- डॉ. सतीश भोंडे, कांदा पीक शास्त्रज्ञ, राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.