
Gosi Khurd Irrigation Project भंडारा : गोसीखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून हरितक्रांतीचे (Green Revolution) स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांची अपेक्षापूर्ती लवकरच होणार आहे. येत्या जूनपर्यंत या प्रकल्पातून २८ हजारपैकी २० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली (Irrigation) येईल, अशी माहिती प्रकल्पाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
गोसीखुर्द प्रकल्पाची पायाभरणी १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर २२ एप्रिल १९८८ मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. या धरणाची सुरुवातीची किंमत ३८८ कोटी रुपये होती.
मात्र भूसंपादनातील अडचणी, निधीची उपलब्धता नसणे अशा अनेक कारणांमुळे हा प्रकल्प चार दशकाहून अधिक काळ रखडला. परिणामी प्रकल्पाची आताची किंमत २० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यासह लगतच्या काही जिल्ह्यांमध्ये सिंचन सुविधांमध्ये वाढ होईल. दोन लाख ५० हजार ८०० हेक्टर क्षेत्र बारमाही पिकाखाली येईल. वैनगंगा नदीवर हा प्रकल्प उभारला आहे.
या योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात २८ हजार हेक्टर सिंचन होईल. त्याकरिता ४३ किलोमीटर कालवे बांधकामाचे काम हाती घेण्यात आले होते. १८ किलोमीटरपर्यंत काम झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भूसंपादनास नकार दिला.
वाढीव निधीची मागणी शेतकरी करीत होते. गेल्या चार दशकात या समस्येवर तोडगा निघू शकला नाही. मात्र प्रकल्पाचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी नेटाने काम करीत शेतकऱ्यांची मनधरणी केली.
अखेरीस उर्वरित भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लागला. ४३ किलोमीटर पर्यंत मुख्य कालवा आणि सात ते आठ किलोमीटर उप-कालवे असे सर्व काम पूर्ण झाले आहे.
या कालव्याच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडण्यात आले. यात सुखावणारी बाब म्हणजे सोडलेले पाणी ५० किलोमीटर लांब असलेल्या अंतिम गावापर्यंत पोहोचले.
वैनगंगा नदीवर नेरला गावात नेरला उपसा सिंचन योजना उभारण्यात आली आहे. गोसीखुर्दमधील बॅक वॉटरचा वापर योजने अंतर्गत सिंचनकामी केला जातो.
२८ हजार हेक्टर सिंचन क्षमता वाढणार
नेरला उपसा सिंचन योजना ही या प्रकल्पाची महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेतून भंडारा, पवनी, लाखांदूर, लाखनी या तालुक्यांतील शेत जमीन सिंचनाखाली येईल.
त्याचा या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. जिल्ह्यात या प्रकल्पातून २८ हजार हेक्टर सिंचन क्षमता वाढेल. आतापर्यंत १६००० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे.
येत्या जूनपर्यंत बंदनलिका वितरण पद्धतीतून ४००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. अशा प्रकारे २० हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्यानंतर उर्वरित आठ हजार हेक्टर सिंचन क्षमता पुढील वर्षी निर्माण होईल, अशी माहिती प्रकल्पाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
नेरला उपसा सिंचन योजना गोसीखुर्द प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. खरीप हंगामात १८ किमीपर्यंत पाणी दिले जात होते. यावर्षी उन्हाळी धानाला देखील तीन हजार हेक्टरसाठी पाणी दिले आहे. पुढील वर्षी तीनही हंगामात पाणी देणे शक्य होईल. शेतकरी आता धान पिकासोबतच ऊस लागवडीकडे देखील वळले आहेत.
- अनिल फरकडे, कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.