
पुणे : राज्यातील विविध साखर कारखान्यांवर (Sugar Factory) काम करणाऱ्या ऊसतोडणी कामगारांना (Sugarcane Workers) आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विमा संरक्षणाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. आता ही रक्कम दहा लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांना अपघाती, नैसर्गिक अथवा इतर कोणत्याही प्रकारे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास ही रक्कम मिळणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांत सहकारी आणि खासगी मिळून जवळपास २०० च्या दरम्यान साखर कारखाने आहेत. ऊसतोड कामगार या कारखान्यांसाठीचा महत्त्वाचा घटक आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागांतील दहा जिल्ह्यांमधून ऊसतोड कामगार साखर कारखान्यांवर कुटुंबासह ऊसतोडणीसाठी येतात. या दरम्यान कामगारांना केवळ प्रवासासाठी असलेले हे विमाकवच आता कायमस्वरूपी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाने घेतला आहे.
पूर्वी कामगारांसाठी कारखान्यांच्या वतीने येता जाता (प्रवासासाठी) विमासंरक्षण देण्यात येत होते. तेही केवळ तीन लाख रुपये एवढे होते. त्याची सुरूवात २९ जानेवारी २००३ पासून केली होती. त्याचा फायदा अनेक ऊस तोडणी कामगारांनी घेतला. यामध्ये एक अवयव गेल्यास दीड लाख रूपये, दोन अवयव गेल्यास तीन लाख रूपये किंवा मृत्यू झाल्यास तीन लाख रूपये देण्यात येत होते. हा विमा ३६५ दिवस लागू होता.
विशेष म्हणजे, जे कामगार सहा महिने ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर राबतात, त्यांना इतर कोणत्याही सोयीसुविधा कारखान्यांच्या व्यवस्थापन विभागाकडून देण्यात येत नव्हत्या. त्यामुळे या कामगारांचे जीवन म्हणजे अत्यंत हलाखीचे होते. आता मात्र राज्य शासनाने यामध्ये अनेक बदल केले आहेत. या कामगारांच्या सुविधासांठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे
- ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दहा लाख रुपयांचे कायमस्वरूपी विमासंरक्षण
- हा निर्णय नोंदणीकृत ऊसतोड कामगारांसाठीच लागू
- ऊसतोड कामगारांची नोंदणी, महामंडळाकडील ओळखपत्र बंधनकारक
- ऊस तोड कामगारांनी संबंधित कारखान्याकडे नोंदणी करणे गरजेचे
कायमच उघड्यावरचे जिणे जगणाऱ्या आणि ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता साखर कारखान्यांवर राबणाऱ्या राज्यातील दहा जिल्ह्यांतील ऊसतोड कामगारांसाठी दहा लाखांचे विमासंरक्षण कायमस्वरूपी करण्यात आले आहे. ही विमा संरक्षण योजना लागू केली आहे.
- डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण.
राज्यात दहा ते अकरा लाख ऊसतोडणी कामगार आहेत. महामंडळाने घेतलेला निर्णय चांगला असला तरी पूर्वी तीन लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येत होते. आता नव्याने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
- गहिनीनाथ थोरे-पाटील, अध्यक्ष, ऊस तोडणी व वाहतूक, मुकादम कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.