
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे (Nashik District Bank) सुरू असलेल्या लिलाव, जप्ती प्रक्रियेविरोधात पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या घरासमोर जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीने (Farmers Rescue Action Committee) केलेल्या बिऱ्हाड आंदोलनाची दखल घेतली आहे.
बँकेने विविध कार्यकारी सोसायट्यांकडून थकबाकीदार सभासदांवर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दराने होणारे सरळव्याजाची आकारणी करून तशी माहिती मागविली आहे. दोन दिवसांत ही माहिती सादर करण्याचे आदेश बँकेने दिले आहेत.
जिल्हा बँकेने ६२ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्याविरोधात जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. १६) सर्वपक्षीय बिऱ्हाड आंदोलन केले.
तत्पूर्वी पालकमंत्री भुसे, माजी खासदार शेट्टी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयात थकबाकीदार सभासदांची बैठक झाली.
बैठकीमध्ये थकबाकीदार सभासदांच्या कर्जवसुलीसाठी व्याजाच्या संदर्भात चर्चा झाली. थकबाकीदारांना संस्था/ बँक आकारणी करीत असलेला व्याजदर मान्य नसल्याने चर्चेदरम्यान थकबाकीदार सभासदांचे थकीत बाकीवर ६ टक्के, ७ टक्के व ८ टक्के दरम्यान व्याज सवलत मिळण्याची मागणी केली.
या अनुषंगाने पालकमंत्री भुसे यांनी थकबाकीदार सभासदावर तशी आकारणी करून माहिती मागविली आहे. याबाबत बँकेने ६, ७ व ८ टक्के व्याज दराची थकीत मुद्दल रक्कम व व्याज आकारणी नमुना सोबत सोसायट्यांना पाठवली आहे.
माहिती एकत्रित करून सरकारला सादर होणार
जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाभरातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी संस्थांना पत्र देत त्याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश काढले आहेत.
ही माहिती एकत्रित करून राज्य शासनाला सादर केली जाणार आहे. त्यावर राज्य शासनाकडून काय निर्णय होतो याकडे आता थकबाकीदार सभासदांचे लक्ष लागले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.