
Maharashtra Budget Session 2023 मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) हा काही आजचा विषय नाही, त्या तर होतच असतात, असे वक्तव्य करणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे आमदार सोमवारी (ता. १३) आक्रमक झाले.
सभागृहात व बाहेर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी निषेध नोंदविला. या वेळी ‘कृषिमंत्र्याचे करायचे काय, खाली डोके वर पाय,’ अशा घोषणा देत विरोधकांनी सत्तार यांना लक्ष्य केले.
सभागृहातही सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला. श्री. भुजबळ यांनी, ‘‘कृषिमंत्री सत्तार यांनी केलेले वक्तव्य अतिशय संवेदनाहीन आहे. राज्यात पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
त्यावर सरकार काहीच बोलत नाही. संभाजीनगर जिल्ह्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तरी कृषिमंत्री हे रोजचेच आहे, असे सांगत आहेत. कृषिमंत्री संवेदनाहीन आहेत,’’ अशी टीका केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले,‘‘शेतकरी आत्महत्यांबाबत असंवेदनशील विधान करून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे.
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे सरकारचे काम आहे, परंतु ते न करता सरकारमधील मंत्री शेतकरी आत्महत्यांबद्दल असे खोडसाळ विधान करतो हे निषेधार्ह आहे. मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री सत्तार यांच्या विधानाची तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.’’
जोरदार घोषणाबाजी
सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी महाविकास आघाडीचे आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन केले.
सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘आत्महत्येची टिंगल करणारे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हाय हाय,’‘कृषिमंत्र्यांचा धिक्कार असो’ ‘या कृषिमंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय...’अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
विधान परिषदेत राजीनाम्याची मागणी
विधान परिषदेतही सत्तार यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या विलास पोतनीस यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अशा प्रकारचा बेजबाबदारपणा बरोबर नाही. सरकार याबाबत गंभीर आहे की नाही? सरकारने कृषिमंत्र्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या : सत्तार
छत्रपती संभाजीनगर : ‘शेतकरी बांधवांच्या आत्महत्या आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव आत्महत्या करतात,’ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या याच वाक्याने विधिमंडळासह राज्यात सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
वाढत्या शेतकरी आत्महत्या व त्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेविषयी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषिमंत्री सत्तार यांनी हे वादग्रस्त विधान केले.
खुद्द कृषिमंत्र्यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठवडाभरात सात, तर त्यांच्या मतदार संघात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावरून प्रश्न विचारण्यात आला होता.
या वेळी सत्तार यांनी पुढे, शेतकरी आत्महत्या या विषयावर उपाययोजनेसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती बनविली असून, ती समिती तंतोतंत अभ्यास करून आपला अहवाल दिल्यानंतर काय उपाय योजायचे ते पाहणार, असल्याचे सांगितले होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.