
Nanded News : शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशी (Shard Joshi) यांच्या मुशीत वाढलेले, तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षात घेऊन राष्ट्रवादी किसान सभेच्या (Rashtrvadi Kisan Sabha) प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविलेले माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (Shankar Anna Dhondge) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.
यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. कंधार व लोहा तालुक्यांतील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
महाराष्ट्रात शेतकरी चळवळीतून शेतकऱ्यांचे सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आलेले शंकरअण्णा धोंडगे हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांचे निकटवर्ती होते. शेतकरी चळवळीत त्यांनी ४० वर्षे घालविली.
या काळात त्यांनी राज्यात शेतकऱ्यांचा एक मोठा दबाव गट निर्माण करून शासनाला सळो की पळो करून सोडले होते. या त्यांच्या झंझावाती कार्याची दखल घेऊन शरद पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेतले.
त्यांच्यावर राष्ट्रवादी किसान सभेच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. या काळात त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडण्याचे काम केले. त्यांना पक्षाने २००९ मध्ये लोहा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी मैदानात उतरविले.
यावेळी त्यांनी त्यात बाजी मारून विजय मिळवला. यानंतर त्यांनी राज्यात पक्ष वाढीसाठी योगदान दिले.
दरम्यान मतदार संघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचा निर्णय धोंडगे यांनी घेतला. सोमवारी (ता. १३) त्यांनी आपला निर्णय जाहीर करून राष्ट्रवादी किसान सभेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठविला.
या वेळी त्यांचे पुत्र शिवराज धोंडगे, कंधार तालुका अध्यक्ष शिवदास पाटील, लोहा तालुकाध्यक्ष संतोष कराळे यांच्यासह कंधार, लोहा तालुक्यांतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
‘बीआरएस’मध्ये प्रवेश शक्य
श्री. धोंडगे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेथे शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांमुळे प्रभावित झाले होते. त्यांनी अनेक कार्यक्रमातून तेलंगणातील योजनांची स्तुती केली होती. या योजना महाराष्ट्रात राबवता येतात, यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, असे ते म्हणत होते.
के. चंद्रशेखर राव यांनी धोंडगे यांना पक्षात येण्याची गळही घातली होती. अशातच त्यांनी हैदराबाद येथे जाऊन के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा केली.
हैदराबाद येथील राव यांच्यासोबत झालेली बैठक पाहता ते लवकरच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.