
मुंबई : ‘‘राज्यात डबल इंजिनचे सरकार (Double Engine Government) असल्यामुळे अनेक विकासकामांना (Mumbai Development Work) गती आली आहे. मध्यंतरी काही जणांनी या प्रकल्पांत खोडा घालायचा प्रयत्न केला. मात्र आता मागे वळून पाहणार नाही.
सामान्य मुंबईकरांचा पैसा त्यांच्यासाठी विकासाला लावला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई आणि महाराष्ट्राचा कायापालट करतील,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गुरुवारी (ता.१९) व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पश्चिम मार्गावरील दोन मेट्रो मार्गिकांसह अन्य विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले.
‘‘जनतेचा पैसा विकासासाठी, मुंबईच्या कायापालटासाठी वापरला नाही तर काय उपयोग. हा पैसा जर भ्रष्टाचाराकडे गेला किंवा बँकांमध्ये पडून राहिला तर विकास कसा होईल,’’ असा सवालही त्यांनी केला.
मोदी म्हणाले, ‘‘मुंबईला नव्या उंचीवर नेण्यासाठी मुंबईकरांच्या हक्काचा पैसा योग्य ठिकाणी वापरला पाहिजे. मात्र तसे होत नसल्याने मुंबईतील लोक हैराण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातही ही व्यवस्था योग्य नाही.
राज्यात डबल इंजिनचे सरकार नसल्याने काही काळ विकासकामे ठप्प झाली. यापुढे शिंदे-फडणवीस मुंबईकरांचे स्वप्न साकारतील.मुंबईत २०१४ पर्यंत केवळ १०-११ किलोमीटर मेट्रो होती.
आता मात्र ३०० किलोमीटर लांबीची मेट्रो उभारणीचे नियोजन आहे. रखडलेला विकास आता पुन्हा शिंदे-फडणवीस यांच्या एकत्र येण्यामुळे वाढेल. दरम्यान, मोदी यांनी मेट्रोतून प्रवास केला.’’
‘काळे-पांढरे उद्योग बंद होणार’
‘‘मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाला विरोध केला जात आहे. डांबरीकरण बंद केल्याने इतरांचे काळे-पांढरे करण्याचे उद्योग बंद होणार आहेत," अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. शिंदे म्हणाले, ‘‘एवढी कामे होत असल्याने अनेकांना धडकी भरली आहे.
सहा महिन्यांत एवढे होत असेल; तर पुढे काय होणार, याची चिंता त्यांना वाटत आहे. ते टीका करतील, आम्ही काम करीत राहू. त्यातही मुंबईतील प्रकल्पांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होऊ नये, अशी काहींची अपेक्षा होती. परंतु नियतीच्या मनात होते तेच झाले.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.