
पुणे ः पणन संचालक पदी (Agriculture Marketing Director) विकास रसाळ (Vikas Rasal) यांची नियमबाह्य नियुक्ती वादात सापडल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत रसाळ यांची नियुक्ती रद्द करण्याची नामुष्की मुख्यमंत्री कार्यालयावर आली होती.
या नियुक्तीमुळे वादात सापडलेल्या पणन मंत्रालयाने आता ताक देखील फुंकून पिण्याची वेळ आली असून, पूर्ण वेळ पणन संचालकपदासाठी अप्पर आयुक्त दर्जाचे अधिकारी सुधीर तुंगार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
या बाबतची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात सादर झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
राज्याच्या पणन संचालकपदावरून सुनील पवार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी सेवाज्येष्ठता डावलून पोलाद बाजार समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले विकास रसाळ यांची विशेष कोट्यातून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ही नियुक्ती वादग्रस्त ठरली होती.
रसाळ यांनी पदभार घेतल्यावर एकाच दिवसांत त्यांची नियुक्ती रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. मात्र रसाळ यांनी मॅट मध्ये दाद मागत, नियुक्ती कायम ठेवली.
मात्र २२ दिवसांनी सहकार आणि पणन विभागाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी पुन्हा रसाळ यांची नियुक्ती रद्द करत सहसंचालक विनायक कोकरे यांच्याकडे तात्पुरत्या नियुक्तीचा आदेश काढला.
दरम्यान पणन संचालकांच्या नियुक्तीवरून नामुष्की आलेल्या सरकारने आता सुधीर तुंगार यांना नियमित नियुक्ती देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या बाबतची तुंगार यांची फाइल पणन विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केली आहे. लवकरच यावर निर्णय होऊन, राज्याला तुंगार यांच्या माध्यमातून पूर्ण वेळ पणन संचालक मिळणार आहे.
तुंगार यांना केवळ सहा महिनेच
सुधीर तुंगार सहकार क्षेत्रातले ज्येष्ठ अधिकारी असून, ते सहा महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहे. यामुळे राज्याला तुंगार यांच्या माध्यमातून केवळ सहा महिनेच पणन संचालक मिळणार असून, सहा महिन्यांनी पुन्हा नव्या संचालकांचा शोध सरकारला घ्यावा लागणार आहे. यामध्ये सहकार आयुक्तालयातील ज्येष्ठ अधिकारी शैलेश कोतमिरे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.