
Turmeric Market Update नागपूर ः राज्यात हळद बाजारात दर (Turmeric Market Rate) दबावात असल्याच्या परिणामी यंदा लागवड (Turmeric Cultivation) क्षेत्र कमी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
एकूण १ लाख १० हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत हे क्षेत्र २० टक्क्यांनी कमी होईल, अशी माहिती हळद उत्पादकता (Turmeric Productivity) क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी दिली.
नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांकडून हळदीला वाढती पसंती मिळत आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात हळद लागवडीखालील क्षेत्र वाढत महाराष्ट्राने देशभरात हळद लागवडीच्या बाबतीत क्रमवारीत पहिले स्थान मिळविले. सध्या राज्यात १ लाख १० हजार हेक्टरपर्यंत हळद लागवडीखालील क्षेत्र आहे.
हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम, यवतमाळ (उमरखेड, दिग्रस) हे जिल्हे हळद लागवडीत पुढारले आहेत. मात्र यंदा हळदीला अवघा ६ हजार रुपये क्विंटलचा दर मिळत असून हंगामाअखेरीस डिसेंबरमध्ये हे दर ९ हजार रुपयांचा पल्ला गाठतील, अशी शक्यता आहे. मात्र त्यानंतरही खर्चाच्या तुलनेत उत्पादकता कमी असल्याने यंदाच्या हंगामात हळद उत्पादक सोयाबीनकडे वळतील, अशी माहिती आहे.
हळद लागवड करताना पहिल्यावर्षी बेणे व ड्रीप यावरील एकरी दीड लाख खर्च होतो. दुसऱ्यावर्षी पासून बेणे व ड्रीपवरील खर्च कमी होत ७५ ते ८० हजार रुपयांवर हा खर्च पोहचतो.
सध्या हळदीची एकरी उत्पादकता २० क्विंटल आणि ६ हजार रुपयांचा दर अपेक्षीत धरता १ लाख २० हजार रुपये मिळतात. परंतू हळदीचे दर कमी असल्याने खर्च वजा जाता हाती राहणारे उत्पन्न जेमतेम ठरते. परिणामी यंदा हळद लागवड क्षेत्र २० टक्के कमी होईल, अशी शक्यता हळद उत्पादक पट्ट्यातील शेतकरी वर्तवित आहेत.
२०१० या वर्षातच हळदीला सर्वाधीक १८-१९ हजार रुपये क्विंटलच दर होता. यंदा हा दर ६ हजार रुपये आहे. तीन, चार निंदण, खत व्यवस्थापनामुळे उत्पादकता खर्च वाढता आहे. त्यामुळे पुढील हंगामात हळदीखालील क्षेत्र कमी करून सोयाबीन क्षेत्रात वाढ करण्याचा विचार आहे.
- डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक, शिरपूर जैन, वाशीम
पिकात पाच वर्ष सातत्य ठेवणे गरजेचे आहे. पहिल्यावर्षी खर्च अधिक झाल्यानंतर दुसऱ्यावर्षी पीक न घेतल्यास नुकसान होते. पीक फेरपालटावर देखील या पिकाच्या लागवडीत सातत्य ठेवताना लक्ष्य दिले पाहिजे. दर कमी झाल्याने यंदा शेतकरी या पिकाखालील क्षेत्र कमी करतील. सरासरी २० टक्के क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.
- जितेंद्र कदम, हळद तज्ज्ञ, रोहा, कृषी विद्यापीठ, दापोली
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.