Farm Road : सोलापुरातील पाणंद रस्त्यांसाठी २० कोटींचा निधी

शेती हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेतशिवार हे गावांना खऱ्या अर्थाने जोडले जाणार आहे.
Panand Road
Panand RoadAgrowon

Solapur News : मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते (Panand Road) या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८० किलोमीटरचे रस्ते तयार होणार असून, यासाठी तब्बल २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांनी दिली.

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत- पाणंद मंजूर रस्त्यांच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित आढावा बैठकीत आमदार देशमुख बोलत होते. या बैठकीला सरपंच मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक उपस्थित होते.

आमदार देशमुख म्हणाले, की शेती हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेतशिवार हे गावांना खऱ्या अर्थाने जोडले जाणार आहे. या योजनेतून रस्ते मजबुतीकरण कामाचा समावेश करण्यात आला आहे.

एका किलोमीटरसाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दक्षिण तालुक्यातील सर्व २९ गावांमधून ८० किलोमीटरचे रस्ते या योजनेच्या माध्यमातून तयार होणार आहेत.

Panand Road
Farm Road : नागपूरमध्ये पाणंद रस्त्यासाठी संघर्ष

शासन स्तरावरून या योजनेच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांची रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे.

मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत, यासाठीचा निधी राज्य रोहयोच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे.

या योजनेतून दक्षिण मधील सर्व गावांतून कमीत-कमी दोन किलोमीटर ते जास्तीत जास्त सहा किलोमीटरचे रस्ते तयार होणार आहेत, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.

या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशदिन शेळके, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार राजशेखर लिंबारे तसेच गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, माजी पंचायत समिती सदस्य रामप्पा चिवडशेट्टी, कार्यकारी अभियंता खराडे, सहायक गटविकास अधिकारी शीतल बुलबुले, उपअभियंता महाजन, उपअभियंता बोधले, यासह सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

Panand Road
Farm Road : अखेर शासनाचा निधी मिळाला; पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार?

सर्व त्रुटी त्वरित दूर करा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रस्त्यांची कामे लवकरच सुरू होत आहेत. शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या, त्रुटी असतील त्या लवकरात लवकर दूर कराव्यात.

मोजणीची मागणी करणे, कोर्टात जाणे यामुळे विनाकारण कामास विलंब होतो, त्यामुळे पुढील रस्ते मंजूर करताना अडचण निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोष्टी टाळाव्यात, असे आवाहनही या वेळी आमदार देशमुख यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com