Abdul Sattar: सत्तारांनी केली अंधारात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी; शेतकरी रागावले

आमच्या भागांची पाहणी अवघ्या काही मिनिटात उरकली. तसेच आमच्या मागण्याही कृषिमंत्र्यांनी ऐकल्या नाहीत, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

Nashik News : अस्मानी संकटाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार मात्र घाईघाईने पाहणी दौरा करत आहेत.  

आमच्या भागांची पाहणी अवघ्या काही मिनिटात उरकली. तसेच आमच्या मागण्याही कृषिमंत्र्यांनी ऐकल्या नाहीत, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

तसेच रात्रीच्या अंधारात पाहणी करून काय करणार आहेत? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार सध्या नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.

सत्तारांनी मात्र शेतकऱ्यांची तक्रार नाकारली आहे. ते म्हणाले, "निगेटिव्ह बातम्याच दाखवल्या जातात. मी रात्री अकरा वाजेपर्यंत नुकसान भागाची पाहणी केली.

त्यानंतर २ वाजता नाशिकमध्ये पोहचलो. सकाळी सात वाजता पुन्हा पाहणीसाठी हजर झालो आहे."  

राज्यात वादळी पावसाने पिकांची नासाडी झाली. कृषिमंत्री नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.

त्यांनी मंगळवारी (ता.२१) नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. कृषिमंत्री दुपारी पाहणीसाठी पोहचणार होते. त्यामुळे शेतकरी वाट पाहत राहिले. परंतु कृषिमंत्री दिवस मावळल्यानंतर नाशिक जिल्ह्यात पोहचले. 

तोवर शेतात काळोख अंधार पसरला होता. कृषिमंत्र्यांनी अंधारात पीक नुकसानीची पाहणी केली.

परंतु अंधारात केलेल्या पाहणीचा काय फायदा होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तसेच कृषिमंत्र्यांच्या लेटलतिफ कारभारावर नाराजी व्यक्त केली.

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे अजून पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे राज्य सरकार मदत जाहीर करत नाही.

शेतकऱ्यांना मात्र तातडीने मदतीची गरज आहे. अशा परिस्थितीत कृषिमंत्रीच अंधारात पाहणी करण्याचा पराक्रम करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. 

दरम्यान, मंत्री दीपक केसरकरांनी कृषिमंत्री सत्तारांची पाठराखण केली आहे.

केसरकर म्हणाले, "संपूर्ण राज्यात फिरत असताना कुठेतरी पोहचायला उशीर होतो. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा संप संपला आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण झाले की, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल." 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे विधानसभेत सांगितले आहे.

परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नुकसानीच्या पंचनाम्यांना उशीर झाला आहे. सरकार मात्र अजूनही मदतीबाबत ठोस निर्णय जाहीर करत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com