
Jalgaon Sustainable Agriculture Update : शाश्वत परवडणारी शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असून, संजीवक शेतीचा स्वीकारही करावा, असा मंत्र गांधी तीर्थ येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित ‘संजीवक शेती’ या कार्यशाळेतून तज्ज्ञांनी दिला.
या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील ४० शेतकरी सहभागी झाले होते. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि. (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम झाला. त्यात एमकेसीएलचे तज्ज्ञ डॉ. सतीश करंडे व गजेंद्र कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाश्वत शेती, विषमुक्त शेती, हवामान आधारित शेती, मिश्रपीक पद्धत, शेतीपूरक व्यवसाय आदी विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व सुती हार अर्पण करण्यात आले. जळगावला केळीचे आगार म्हटले जाते, तर येथे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात.
यासोबतच सोयाबीन, उडीद, मूग ही मिश्रपिकेही घेऊ लागला आहे. ही पिके घेण्यामागे थोड्या महिन्यांच्या अवधीत दोन पैसे मिळतील, हा मुख्य उद्देश असतो.
आपल्या शेतात असलेल्या पिकांच्या ओळीमधील जागेचा सुयोग्य वापर व्हावा, ही पद्धत वापरल्याने मधल्या जागेत तणांची वाढ कमीत कमी होऊन जमीन स्वच्छ ठेवता यावी, असे काही महत्त्वाचे बदल आपल्या शेतात करावे लागतात.
पावसाच्या अनिश्चिततेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कधी जास्त, तर कधी पाऊसच पडत नाही, अशावेळी संजीवक शेती महत्त्वाची ठरते, असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.
या वेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बी. डी. जडे, शेती विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय सोनजे उपस्थित होते. डॉ. आश्विन झाला यांनी प्रास्ताविक केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे सुधीर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत सूर्यवंशी यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.