Agri Tourism : कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय

Agritourism Business : शेतीला जोड म्हणून काही व्यवसाय किंवा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज आहे. त्यामध्ये आपल्या शेतीमध्येच जर पर्यटकांना आकर्षित करता आले, तर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. १६ मे हा दिवस ‘जागतिक कृषी पर्यटन दिन’ म्हणून साजरा केला जातो.
Agri Tourism
Agri TourismAgrowon

डॉ. धनश्री निगडे, डॉ. राजीव साठे

Agritourism Business Update : शहरे व तेथील लोकसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. शहरी लोकांचे जीवन बंदिस्त आणि विविध प्रकारच्या स्क्रीनच्या चौकोनात अडकून पडले आहे. पूर्ण एसी असलेले बंद फ्लॅट, ऑफिसमध्ये टेलिव्हिजन, संगणक किंवा मोबाईलच्या समोर दिवसरात्र काम करण्यामध्ये किंवा मनोरंजनामध्ये गुंतलेल्या लोकांना बाह्य निसर्गाचा स्पर्शही होत नाही.

एकल कुटुंबामुळे नातेवाईकही मर्यादित व शहरी असण्याची शक्यता अधिक असते. आज मध्यमवयीन असलेल्या अनेकांना त्यांचे बालपण आठवत असले तरी त्यांची मुले मात्र त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण जीवनाचा आनंद देणाऱ्या कृषी पर्यटन केंद्र तयार केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार होतील.

कृषी पर्यटन हे सामान्य पर्यटनाच्या तुलनेमध्ये थोडी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. हा शेतीपूरक असा व्यवसाय असून, सामान्य हॉटेलिंग किंवा मनोरंजन पार्कच्या तुलनेमध्ये त्यांचे वेगळेपण लक्षात घेतले पाहिजे. उत्तम शेती पाहणे आणि शेती कामांचा अनुभव, ग्रामीण व नैसर्गिक वातावरण, पाळिव जनावरांशी संबंधित काही कामे यांचा अनुभव लोकांना घेता येतो.

स्थानिक व वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा स्वाद घेता येतो. शेतातून ताजी उत्पादने थेट खरेदी करण्याची संधी मिळते. ग्रामीण लोकांचे दैनंदिन जीवन, तसेच सांस्कृतिक घटक आणि परंपरा यांची माहिती मिळते. यातून ग्रामीण आणि शहरी बागांमध्ये समन्वय निर्माण होऊ शकतो.

शेतकऱ्यांना यातून अतिरिक्त उत्पन्नासोबत विविध उत्पादनांना कायमस्वरूपी ग्राहक मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांना रोजगाराची संधी मिळते. कृषी पर्यटन हे अनेकांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत झाला असल्याची अनेक उदाहरणे दिसू लागली आहेत.

Agri Tourism
Agritourism business : कृषी पर्यटन व्यवसाय घेतोय कोरोनानंतर उभारी

कृषी पर्यटन केंद्र कोण सुरू करू शकतो?

कमीत कमी दोन हेक्टर जमीन, उत्तम शेतघर, पाण्याची उत्तम सोय, एखादा जलस्रोत आणि पर्यटकांना विविध सेवा व मनोरंजन देण्याची इच्छा, थोडा बोलका स्वभाव इतक्या भांडवलावर कोणताही शेतकरी कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो.

वैयक्तिक शेतकरी व्यतिरिक्त कृषी सहकारी संस्था, अशासकीय संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालये येथील अशी केंद्रे सुरू करता येतात. काही वैशिष्ट्यपूर्ण ग्रामपंचायतींही शेतकऱ्यांच्या मदतीने अशी केंद्रे सुरू करू शकतात.

कृषी पर्यटन केंद्राचे ठिकाण :

कृषी पर्यटनातील यशासाठी पर्यटन केंद्राचे स्थान हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. केंद्राचे स्थान पोहोचण्यास सोपे आणि चांगली नैसर्गिक पार्श्‍वभूमीचे असावे. शहरी पर्यटकांना निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचा आनंद लुटण्यात रस असतो.

या केंद्रापर्यंत पोहोचणारे महामार्ग, रस्ते आणि रेल्वे मार्ग असल्यास अधिक उपयुक्त ठरते. कृषी पर्यटनाबरोबरच काही ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळ जवळ असल्यास फायदा होतो.

कृषी पर्यटनाची व्याप्ती : खालील कारणांमुळे सध्या कृषी-पर्यटनाला मोठा वाव आहे.

१) एक स्वस्त पर्याय : कृषी पर्यटनामध्ये अन्न, निवास, मनोरंजन आणि प्रवासाचा खर्च सर्वांत कमी ठेवणे शक्य आहे. त्यामुळे शहरातील श्रीमंत वर्गासोबतच मध्यमवर्गीयही याचा फायदा घेऊ शकतात. कृषी पर्यटनाची व्याप्ती मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचते.

२) शेती उद्योग आणि जीवनशैलीबद्दल कुतूहल : संपूर्ण आयुष्य शहरामध्ये घालवणाऱ्या लोकांना नेहमीच खेड्यांबद्दल, तेथील अन्न, वनस्पती, प्राणी, लाकूड, हस्तकला, ​​भाषा, संस्कृती, परंपरा, पोशाख आणि ग्रामीण जीवनशैली इ. विषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते.

३) आराम आणि करमणूक यांची सांगड : सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी आणि संपूर्ण कुटुंबाला समोर ठेवून मनोरंजनाचे विविध उपक्रम लोकांना आकर्षित करतात. त्यात ग्रामीण खेळ, सण, खाद्यपदार्थ, पेहराव आणि नैसर्गिक घटकांचा समावेश केल्यास विविध प्रकारचे मनोरंजन प्रदान करता येते.

४) ग्रामीण मनोरंजन : गावांकडील सण, परंपरा, संस्कृती, भाषा, हस्तकला, पेहराव यांचे आकर्षण लोकांना असते. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात वैविध्य येते. शेती आणि शेतकऱ्यांच्या सभोवतालचे वातावरण, एखाद्या कृषी उत्पादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येणे इ. लोकांना आवडते. त्यातही सर्वाधिक उत्पादनाचे रेकॉर्ड करणारे शेतकरी, सर्वांत जास्त पशू उत्पन्न देणारी फार्म, प्रक्रिया युनिट्स, नावीन्यपूर्ण शेती पद्धती याकडे तर अन्य शेतकरीही आकर्षित होतात.

ताजी भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य उत्पादने, काही प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सेंद्रिय अन्न निर्मिती व विक्रीलाही मोठा वाव आहे. बैलगाडी स्वारी, उंट स्वार, नौकाविहार, मासेमारी, हर्बल वॉक, ग्रामीण खेळ आणि आरोग्य (आयुर्वेदिक) विषयक सुविधा यांचाही समावेश पर्यटनात करता येतो.

५) तणावापासून शांतता : आधुनिक जीवनामध्ये ताणतणाव प्रचंड वाढलेले असल्यामुळे शांत ठिकाण हेही आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अलीकडे मोबाईलमुळे दिवसरात्र कधीही कामाला जुंपल्यासारखी स्थिती आहे. अशा स्थितीत काही काळ तरी मोबाईल व अन्य स्क्रीनपासून दूर राहण्यालाही लोक प्राधान्य देत आहेत.

त्याला निसर्गाची जोड दिल्यास पर्यटनाला मोठा वाव आहे. नैसर्गिक वातावरण नेहमी व्यस्त जीवनापासून दूर असते. पक्षी, प्राणी, पिके, पर्वत, पाणवठे, गावे शहरी लोकसंख्येला पूर्णपणे भिन्न वातावरण देतात.

६) कृषी पर्यटनाचे शैक्षणिक मूल्य : कृषी पर्यटनामुळे शहरी विद्यार्थ्यांनाही ग्रामीण जीवनाविषयी ज्ञान देणे शक्य होते. शालेय सहलीसाठी उत्तम पर्याय देता येतो. शहरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील अनुभवाची संधी मिळू शकते. उत्तम शेती व उच्चतम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतावर प्रशिक्षण असेही काही कार्यक्रम राबवता येतात. वेगवेगळे सेमिनार, कंपन्याचे छोटे कार्यक्रम यासाठी हॉटेलऐवजी चांगला पर्याय यातून देता येतो.

Agri Tourism
Dairy Business : दूध व्यवसायाच्या गुणात्मक वाढीसाठी अभ्यासगट

फायदे :

-शेतकरी कुटुंबातील सदस्य आणि तरुणांना रोजगाराच्या संधी.

-शेतकऱ्यांसाठी उत्पन्नातील चढउताराला पर्यायी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत.

-सामाजिक नैतिक मूल्यांसह शहरी आणि ग्रामीण लोकांमधील सांस्कृतिक समन्वय.

-ग्रामीण आणि कृषी विकास प्रक्रियेस चालना.

या सुविधांकडे लक्ष द्या...

अ) पायाभूत सुविधा

ग्रामीण स्वरूपाचे सर्व किमान आवश्यक सुविधांसह फार्महाउस असावे.

• शेतीतील समृद्ध संसाधने, झाडे, वेली, औषधी, सुगंधी वनस्पती यांच्या नावानिशी लागवड केलेली असावी.

- पाण्याची सोय, जलस्रोत जवळ असावा.

• पर्यटकांना स्वारस्य शेती काम, स्वयंपाक किंवा अन्य शेतीपूरक कामे करता येईल, अशी सुरक्षित सोयी कराव्यात.

• प्रथमोपचार पेटीसह आपत्कालीन वैद्यकीय सेवा.

• मासेमारी, पोहण्यासाठी विहीर किंवा तलाव, वेगवेगळे खेळ साधने, नेमबाजी इ.

• शेळी फार्म, इमूपालन, रेशीम शेती, ग्रीन हाउस इ.

ब) पुरविल्या जाणाऱ्या सुविधा :

• नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्री अशा तिन्ही जेवणासाठी वेगवेगळा अस्सल ग्रामीण मेनू असावा.

पर्यटकांना ग्रामीण खेळ, कामांमध्ये सहभागी होण्याची संधी.

• संस्कृती, पेहराव, कला, हस्तकला, ​​सण, ग्रामीण परंपरा याबद्दल माहिती देण्याची सोय. काही कलांचे प्रात्यक्षिकही देता येते.

• घोडेस्वारी, बैलगाडी, पाण्यात म्हशीची स्वारी, तुमच्या तलावात किंवा जवळच्या तलावात मासेमारीची सुविधा इ.

• फळे, कॉर्न, शेंगदाणे, ऊस आणि इतर शेतातील ताजी व प्रक्रिया उत्पादने उपलब्ध करावीत.

• लोकनृत्याचा कार्यक्रम, शेकोटी, लोकगीते, भजन, कीर्तन, लेझिम नृत्य, धनगरी गजा, इ. कार्यक्रम पाहणे व सहभागी होण्यास संधी द्या.

डॉ. धनश्री निगडे, ९९७५२९५८००, (सहायक प्राध्यापिका, विस्तार शिक्षण विभाग, भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव, सांगली)

डॉ. राजीव साठे, ९४२३७२१८९४, (सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, काष्टी, मालेगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com