
Water Conservation आपण देवळांच्या सुशोभनाकरिता (Temple Beutification) लाखो रुपये खर्च करतो. तेथील वार्षिक जत्रेमध्ये त्याच्या कितीतरी पट मोठी आर्थिक उलाढालही होते. तीर्थक्षेत्रांकडे (Place Of Pilgrimage) जाण्यासाठी रस्ते पक्के आणि सुशोभित केले जातात.
मात्र प्रत्येक देवस्थानाला उपलब्ध असणारे नैसर्गिक पाणी (Natural Water) आणि त्याच्या व्यवस्थापनाबद्दल (Water Management) कुणी चकार शब्द काढत नाही. पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या शेकडो सामाजिक संस्था आहेत.
मात्र देवस्थानाला भूगर्भातून भूपृष्ठावर थेट पाणी उपलब्ध करणाऱ्या कल्लोळ, कुंड, गोमुख येथील नैसगिक पाण्याच्या संवर्धन (Natural water Conservation) आणि संरक्षणासाठी कार्यरत सामाजिक संस्था माझ्या तरी पाहण्यात नाहीत. शासन तर यापासून कोसो दूर आहे.
प्रत्येक देवस्थानांचे ट्रस्ट आणि त्यांची समिती असते. ती या पाणी व्यवस्थापनामध्ये नक्कीच मोठे कार्य करू शकते. येणाऱ्या यात्रेकरूंकडून प्रत्येकी एक रुपया इतका जरी कर घेतला तरी सुद्धा हे सर्व झरे पुन्हा वाहू शकतात.
पुष्कर (राजस्थान) येथे भारतामधील एकमेव ब्रह्माचे मंदिर असून, तिथे पवित्र असा पुष्कर तलाव आहे. या तलावाचे पाणी आजही आरशासारखे स्वच्छ आहे. कारण तिथे येणारा प्रत्येक यात्रेकरू या तलावाच्या स्वच्छतेसाठी शक्य तितकी आर्थिक मदत करतो.
हे उदाहरण लक्षात घेऊन विविध देवस्थान, मंदिरे येथील पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करावयाचे असतील, तर पुढील सहा नियम तंतोतंत पाळावेत.
देवस्थानांच्या एक कि.मी. परिसरात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन द्यावे.
उताराच्या जमिनीवर चर खोदून पावसाचे पाणी भूगर्भात मुरवणे.
देवस्थानाच्या मालकीच्या चारही बाजूंच्या क्षेत्रावर वृक्ष लागवड करावी.
मंदिराबाहेरचे झरे, कल्लोळ, कुंड, गोमुख, तलाव यांची लोकसहभागातून स्वच्छ करावी. ते कचरामुक्त करून त्यांना संरक्षित कट्टा बांधावा.
मंदिर परिसरामधील एक कि.मी. भागात विंधन विहिरीद्वारे भूगर्भामधील पाण्याचा उपसा करू नये.
प्रतिदिन भेट देणारे भक्तजन आणि यात्रेकरूंकडून येथील पाणी व्यवस्थापनासाठी काही मामुली कर घ्यावा. ज्यांना शक्य आहे, त्यांना अधिक अर्थसाह्यासाठी आवाहन करावे.
महाराष्ट्रभर विखुरलेली हजारो देवस्थाने आहेत. अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणी स्रोत उपलब्ध आहेत. मात्र त्यांची आजची अवस्था आणि व्यवस्थापनाची पद्धती नेमकी काय आहे? ती सुधारण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकेल? या विषयी तज्ज्ञांची समिती नेमून अहवाल तयार करून घ्यावा. त्यावर शासकीय पातळीवर मंथन झाल्यास एक नेमकी दिशा मिळू शकेल.
आव्हान दृश्य पाण्याच्या व्यवस्थापनाचे...
पाणी व्यवस्थापनामध्ये सर्वांत मोठे आव्हान आहे ते दृश्य पाण्याचे. दृश्य पाणी म्हणजेच पाऊस.
‘नेहमीच येतो मग पावसाळा’ या काव्यपंक्तीप्रमाणे त्याकडे आपले दुर्लक्ष होत असते. प्रतिवर्षी भारतवर्षामध्ये जूनपासून सप्टेंबरपर्यंत विविध नक्षत्रांमध्ये मॉन्सूनची वर्षा होत असते. मात्र वातावरण बदलामुळे हे गणित बिघडले आहे.
बऱ्याच भूभागावर पाऊस पडतच नाही आणि जिथे तो बरसतो तो हस्त नक्षत्रामधील हत्तीसारखा. म्हणूनच या दृश्य पाण्याचे व्यवस्थापन करणे अतिशय अवघड बनत चालले आहे.
सद्यपरिस्थितीत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवून त्यास जमिनीत मुरवून भूगर्भ जलसाठा वाढवणे, हा या व्यवस्थापनाचाच भाग आहे.
ईशान्येकडील सातही लहान मोठ्या राज्ये जंगले, डोंगर, दऱ्या आणि पर्वत रांगानी समृद्ध आहेत. म्हणूनच येथे प्रतिवर्षी मुबलक पाऊस पडतो. येथील आदिवासी लोक पर्वत रांगांच्या उतारावर थोडे थोडे सपाटीकरण करून पायऱ्यांची भात शेती करतात.
येथील प्रत्येक शेतांचे बांध भाजीपाल्यांनी समृद्ध असतात. पर्वत माथ्यावर पडणारा पाऊस गुरुत्वाकर्षणाने विविध ओहोळांच्या माध्यमातून खाली भूपृष्ठाकडे धावू लागतो.
त्यांच्या प्रवाहांना जंगलातील मोठमोठे वृक्ष अडवतात, त्यांना दिशा देतात. या प्रवाहांच्या वेगावर मार्गात वाढणारे गवत, लहान झुडपे, बांबूची बेटे त्यावर नियंत्रण ठेवतात.
त्यामुळे काही प्रमाणात वेग कमी होऊन थोडेसे शांत वाहणारे पावसाचे ताजे पाणी शेतकरी ‘सायफन’ पद्धतीने शेतामध्ये झुळझुळ खेळवले जाते.
तेथून ते खालच्या पायरीवर येते. पुढे हा क्रम उतारावरील हजारो पायऱ्यांपर्यंत असाच सुरू राहत शेवटी भूपृष्ठ किंवा दऱ्यातून वाहणाऱ्या नद्यांना मिळतो.
अशा पद्धतीने पावसाचे पाणी पिणाऱ्या नद्या नेहमीच तृप्त आणि आनंदी असतात. त्या शेतकरी आणि त्यांच्या पिकाचे कधीही नुकसान करत नसल्याचे दिसते. ईशान्येकडील सातही राज्याप्रमाणेच सिक्कीममध्ये अशाच प्रकारे पावसाच्या पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले जाते.
त्यातून खरीप आणि रब्बीची शेती, बांबू, केळी, संत्री यांचे भरपूर उत्पादन घेतले जाते. पर्वतराजीमधील वृक्षांच्या रांगा या पाणी व्यवस्थापनामध्ये मोलाचे कार्य करतात. येथेच आर्किड, ॲन्थुरिअम अशा फुलांचे उत्पादन मिळते.
भरपूर मधही मिळतो. पावसाच्या पाण्याचे कसे उत्कृष्ट व्यवस्थापन करावे हे आपण नॉर्थ ईस्ट राज्याकडून शिकले पाहिजे. या उलट या निसर्गाच्या बहुमोल देणगीचे व्यवस्थापन न केल्यास काय होते ते कोकणात दिसते.
सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेल्या या परशुरामाच्या भूमीमध्ये शेकडो लहान मोठ्या नद्या आहेत. त्या सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावून, जेमतेम शंभर सव्वाशे कि.मी. अंतर धावून अरबी समुद्रास मिळतात.
नॉर्थ ईस्ट आणि कोकण दोन्हींकडेही हजारो मिमी पाऊस पडतो. पण तिथे प्रचंड मोठ्या उतारावरून धावत खाली येणारे ओहोळ, नद्या तेवढ्याच शांत आणि शेतकऱ्यांच्या कल्याणामध्ये सहभागी असतात.
अर्थात, यास तिबेटच्या पठारावर उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रेसारख्या काही नद्या निश्चितच अपवाद आहेत. पण इथे मी बोलतोय ते जेमतेम १०० किमी लांबीच्या नद्यांबद्दल.
या नद्या तिथे इतक्या शांत, तर आपल्या कोकणात एवढ्या उग्र का? कोकणामधील नद्या मॉन्सूनच्या धुवाधार पावसात डोंगर माथ्यावरून वेगाने खाली धावत येतात. येताना केवळ पाणीच नाही, तर मोठमोठे दगड, धोंडे, खडकसुद्धा खाली आणतात.
याच मोठमोठ्या दगडांमुळे नद्यांच्या पात्रात बदल होतात. पाणी पसरते, पुराचे संकट उद्भवून त्यात लहान मोठी गावे, शहरे वेढली जातात.
वशिष्ठी, जगबुडी यांसारख्या नद्यांनी चिपळूण, राजापूर, महाड अशा शहरांचे जनजीवन कसे उद्ध्वस्त केले, हे पाहिले की कोकणातील पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, हे आपल्याला पटू शकेल.
कोकणामधील नद्या डोंगरावरून मोठमोठे दगड, धोंडे घेऊन खाली का येतात? येताना शेतकऱ्यांची भात शेती का उद्ध्वस्त करतात?
हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. त्यांची कारणे शोधण्याचा प्रयत्न करताना लक्षात येते, की कोकणामधील बहुतेक सर्व डोंगर व त्यावरील वनसंपत्ती खासगी मालकीची आहे.
मागील तीन पिढ्यांनी या डोंगरावर उभे केलेले घनदाट जंगल आज मुळापासून नष्ट केले गेले आहे. ४०० - ५०० वर्षांपूर्वीचे जुने वृक्ष तोडून तिथे केवळ काजू, आंबा लागवड केली गेली.
दोन दशकांपूर्वी मुंबई बाजारात येणारा हापूस ही याच डोंगरावरील वृक्षांच्या कापलेल्या फळ्यांनी बनविलेल्या बॉक्समधून येत होता. आता ते वृक्ष संपले.
डोंगरावर गवताची काडीसुद्धा दिसत नाही. भाताचे राब करण्यासाठी जमीन स्वच्छ करणार नाही, तितकी डोंगराची जमीन तुम्हाला स्वच्छ (?) दिसेल. अशा उघड्या बोडक्या डोंगरावरून पावसाळ्यात नद्या भूपृष्ठाकडे वेगाने धावत का नाही जाणार?
आज कोकणात या मॉन्सून पावसाचे आणि नद्यांच्या पुराचे व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे. पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे तेथील भातशेती, स्थावर मालमत्तांना नुकसान पोहोचत आहे.
अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली जाऊन अनेक आठवडे संपर्काबाहेर राहतात. म्हणूनच कोकणात फळबागांच्या श्रीमंतीपेक्षाही डोंगर पठारावरील देशी वृक्षांची श्रीमंती महत्त्वाची आहे.
अशा वृक्षांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी शासन, उद्योग समूहांनी पुढे आले पाहिजे. येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रति वृक्ष प्रति वर्ष ठरावीक रक्कम देऊन त्याचे कार्बन क्रेडिट घ्यावे.
गावानेही सामुदायिकरीत्या गवत लागवड करावी. चराई बंदी, कुऱ्हाड बंदी अशा बाबी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कराव्यात. या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.