Onion Planting : काळभोर बंधूंचे कांदा लागवडीत सातत्य

रामकृष्णनगर (जि.सातारा) येथील प्रयोगशील शेतकरी संतोष सर्जेराव काळभोर यांनी ऊस, आले या पिकाला कांदा लागवडीची जोड दिली आहे. जमिनीची सुपीकता जपत गेल्या बारा वर्षांपासून काळभोर बंधू कांदा लागवड करत आहेत.
Onion Planting
Onion PlantingAgrowon

रामकृष्णनगर (ता.जि. सातारा) येथील संतोष सर्जेराव काळभोर यांचे सहा भावांचे मिळून ३५ जणांचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये शहाजी, संतोष हे सख्खे बंधू आणि शिवाजी, धनाजी, सयाजी आणि संभाजी हे चुलत बंधू आहेत. या कुटुंबाची गावशिवारात २५ एकर बागायती शेती (Horticultural Agriculture) आहे. मोठे बंधू शहाजी, शिवाजी आणि संभाजी हे व्यवसायाच्या (Business) निमित्ताने मुंबई येथे असतात.

Onion Planting
Onion Seed Production : कांदा बीजोत्पादनामध्ये लागवड तंत्र महत्त्वाचे

तर संतोष, धनाजी आणि सयाजी हे शेतीची जबाबदारी सांभाळतात. या शेतीमध्ये स्वतःची संकल्पना तसेच पीक उत्पादनवाढीचे प्रयोग करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी तीन भावांकडे प्रत्येकी आठ एकर क्षेत्राची स्वतंत्र जबाबदारी दिली आहे. संतोष यांच्याकडे आठ एकर क्षेत्रात कांदा, ऊस, हळद आणि आले पीक लागवड असते. काळभोर यांच्या शेतीमध्ये पहिल्यापासून कांदा हे महत्त्वाचे पीक आहे.

मात्र त्यावेळी उसामध्ये आंतरपीक म्हणून कांदा लागवडीवर भर होता. संतोष यांनी शेतीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी कांदा पिकाची स्वतंत्र क्षेत्रात लागवड सुरू केली. उसानंतर फेरपालटीसाठी त्यांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे. साधारणपणे बारा वर्षांपूर्वी काळभोर यांनी सुरवातीला एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली.

यावेळी कांद्याचे अपेक्षित उत्पादन मिळाल्याने मिळकत देखील चांगली झाली. सध्या काळभोर यांना उसाचे एकरी उत्पादन ९५ ते १०० टन, कांद्याचे १५ टन, आल्याचे एकरी १० टन आणि हळदीचे (वाळलेली) एकरी २२ ते २५ क्विंटल मिळते. याचबरोबरीने शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालन आहे. सध्या त्यांच्याकडे दहा मुऱ्हा म्हशी आणि दोन खिलार गाई आहेत.

कांदा लागवड क्षेत्रात वाढ ः

संतोष काळभोर यांनी पीक फेरपालटासाठी कांदा लागवडीवर भर दिला आहे. उत्पादन आणि बाजारपेठेचा अंदाज घेत त्यांनी टप्याटप्याने कांदा लागवड क्षेत्रात वाढ करण्यास सुरवात केली. सध्या संतोष काळभोर रब्बी हंगामात चार ते पाच एकर क्षेत्रावर कांदा लागवडीचे नियोजन करतात. कांदा उत्पादनवाढीसाठी पीक व्यवस्थापनाचे त्यांनी गणित बसविले आहे.

Onion Planting
Onion Rate : दरवाढीनंतर पुन्हा कांदा दरात ५० टक्क्यांनी घसरण

गुणवत्तापूर्ण कांदा उत्पादनावर त्यांचा आहे. सुरवातीच्या काळात पारंपरिक पद्धतीनेच कांदा साठवणूक केली जायची. यामध्ये कांदा खराब होण्याचे प्रमाण अधिक होते. यावर मात करण्यासाठी संतोष यांनी कांदा चाळ उभारली. सध्या त्यांच्याकडे १२ टन क्षमतेच्या चार कांदा चाळी आहेत. चाळीतील कांद्याला खेळती हवा मिळावी यासाठी फॅन बसविण्यात आले आहेत.

कांदा रोपवाटिकेची जोड ः

कांदा लागवडीसाठी दर्जेदार रोपांची उपलब्धता होण्यासाठी त्यांनी सात वर्षांपूर्वी वीस गुंठ्यावर रोपवाटिका करण्यास सुरवात केली. पुसेगाव येथील बीजोत्पादकांच्याकडून ते नाशिक गरवा या कांदा जातीचे बियाणे आणतात. स्वतःच्या क्षेत्रापुरती कांदा लागवड झाल्यानंतर उरलेल्या रोपांची परिसरातील शेतकऱ्यांना विक्री केली जाते. रोपवाटिकेमुळे भांडवली खर्चात बचत होऊन दर्जेदार रोपे मिळतात,तसेच उत्पादन वाढ होत असल्याचा संतोष काळभोर यांचा अनुभव आहे.

असे आहे कांदा व्यवस्थापन ः

- दहा वर्षांपासून लागवडीमध्ये सातत्य. प्रयोगशील शेतकऱ्यांकडे भेटी, वाचन आणि अभ्यासाद्वारे पीक व्यवस्थापनात सुधारणा.

- दरवर्षी रब्बी हंगामात नाशिक गरवा जातीची चार ते पाच एकरावर लागवड.

- नाशिक गरवा कांद्याचा रंग फिक्कट लाल, कीड-रोगास प्रतिकारक, चांगली टिकवणक्षमता.

- जमीन सुपिकतेसाठी लेंडी खत, पोल्ट्री खत तसेच शेणखताचा पुरेपूर वापर.

- रोपवाटिकेत १५ ऑक्टोबर दरम्यान बी टाकून रोप निर्मितीस सुरवात.

- २५ नोव्हेंबर ते १० जानेवारीपर्यंत टप्याटप्प्याने लागवड.

- पाट पद्धतीने पाणी व्यवस्थापन.पिकाला पाणी जास्त होऊ नये यासाठी जमिनीला थोडा ताण देऊ पाणी दिले जाते.

- माती परिक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर. जास्तीत जास्त सेंद्रिय खते, कीडनाशकांच्या वापरावर भर.

- फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान टप्प्याटप्प्याने काढणी.

- काढणीनंतर चार दिवस कांदा सावलीत सुकविला जातो. त्यानंतर चाळीत भरला जातो.

- साधारणपणे मार्केट दर पाहून गणपतीनंतर कांदा विक्रीचे नियोजन.

- एकरी सरासरी १२ ते १५ टन उत्पादनात सातत्य.

- रोपांपासून ते काढणीपर्यंत एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च. २०१९ मध्ये तीन एकरात ४० टन उत्पादन, सरासरी दर २० हजार रुपये प्रति टन. २०२० मध्ये चार एकरात ६० टन उत्पादन, सरासरी दर २५ हजार रुपये प्रति टन आणि २०२१ मध्ये तीन एकर क्षेत्रात ४६ टन कांदा उत्पादन, सरासरी दर १८०० रुपये प्रति टन.

- दरातील चढउतार पाहून कराड, सातारा,कोल्हापूर बाजारपेठेत कांदा विक्रीचे नियोजन.

Onion Planting
Crop Damage : निम्न दुधनाच्या कालव्याच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान

कुटुंबाची साथ मोलाची...

संतोष यांच्या बरोबरीने धनाजी व सयाजी हे शेती व्यवस्थापनामध्ये कार्यरत असतात. शेती नियोजनामध्ये चुलते विनायकराव, मोठे बंधू शहाजी, शिवाजी आणि लहान बंधू संभाजी यांचा चांगला पाठिंबा मिळतो. कुटुंबातील एकीमुळेच शेतीमध्ये दरवर्षी प्रगतीची दिशा मिळाली आहे.

कृषी विज्ञान केंद्र,बोरगाव येथील कृषीतज्ज्ञ भूषण यादगीरवार, कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक अनिल यादव, कृषी सहायक सुनीता पोतेकर यांचेही पीक व्यवस्थापनात सातत्याने मार्गदर्शन मिळते. काळभोर कुटुंबीय दैनिक अॅग्रोवनचे वाचक आहेत. यातूनही त्यांना शेती व्यवस्थापनामध्ये दिशा मिळते.

संतोष काळभोर - ९६६५४७३३९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com