Grape Management : पावसाच्या वातावरणाचा द्राक्ष वेलीवर होणारा परिणाम

Cloudy Weather : गेल्या आठवड्यातील वातावरणाचा विचार करता द्राक्ष विभागातील बऱ्याच क्षेत्रात गारांचा पाऊस व काही ठिकाणी नुसताच पाऊस झाला. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले.
Grape Management
Grape ManagementAgrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय, शर्मिष्ठा नाईक, अजयकुमार शर्मा

वेलीची शाखीय वाढीची अवस्था

Grape Farming : खरडछाटणीनंतर वेलीची शाखीय वाढ होण्याकरिता वातावरणात उपलब्ध तापमानानुसार पाण्याचे नियोजन हे महत्त्वाचे असते. वेलीला पाणी देताना नत्राचा वापर तितकाच महत्त्वाचा असेल. ज्या भागामध्ये वाढीच्या या अवस्थेत जोरात पाऊस झाला असेल, तर या वेळी वाढ जोमात होणे शक्य आहे.

वाढीकरिता नत्रयुक्त खतांचा वापर जास्त प्रमाणात केला नसला तरी वाढ मिळणे शक्य आहे. बागेत पावसामुळे कमी झालेले तापमान व वाढलेली आर्द्रता या बाबी शाखीय वाढीसाठी मदत करतात. बागेत पाऊस किती झाला व ढगाळ वातावरण किती काळ टिकून राहिले, यावरही वेलीची पाण्याची गरज ठरेल.

जास्त प्रमाणात पाऊस झालेला असल्यास पुढील एक आठवडा बागेत वेलीची वाढ जोमाने होईल. तितक्या काळात जर सबकेन करून त्यावर बगलफुटी सात ते आठ पानांच्या झालेल्या असल्यास या काळात नत्राचा वापर शक्यतो कमी करावा. वापर करायचा झाल्यास नत्र आणि पालाशयुक्त खतांचा वापर एक ते दोन वेळा करता येईल.

अ) बागेत थोडाफार पाऊस झाला, परंतु ढगाळ वातावरण दोन ते तीन दिवस टिकून राहील, असा अंदाज मिळालेला असल्यास पाणी पूर्ववत ठेवावे. नत्राचा वापर कमीत कमी करावा. अशा स्थितीमध्ये नत्र आणि पाणी दोन्ही नेहमीप्रमाणे दिल्यास वेलीचा जोम आवश्यकतेपेक्षा जास्त वाढेल. त्यामुळे घड निर्मितीमध्ये अडचणी येतील.

ब) ज्या भागात पाऊस एक ते दोन वेळा झाला व ढगाळ वातावरण काही काळाकरिता उपलब्ध असेल, अशा ठिकाणी शेंडा वाढ जास्त होत असल्याचा अनुभव येईल. अशा बागेत फुटीच्या पेऱ्यातील अंतर वाढलेले दिसेल. सूक्ष्म घड निर्मिती होण्याकरिता अशा बागेत अडचणी येतील.

हे टाळण्यासाठी शेंडा वाढीची परिस्थिती पाहून नत्राचा वापर कमी अधिक करावा. काही नत्र काही काळ बंद ठेवावे. शेंडा जोमात चालत असलेल्या बागेत स्फुरद आणि पालाश युक्त खताचा वापर महत्त्वाचा समजावा.

Grape Management
Grape Harvesting : द्राक्ष बागेत एकसारख्या फुटी निघण्यासाठीच्या उपाययोजना

क) काही भागामध्ये गारपीट होऊन निघालेल्या नवीन फुटींचे बऱ्यापैकी नुकसान झाल्याची स्थिती आहे. नवीन फुटींची काडी मोडून थोड्याफार प्रमाणात जखम झालेली असल्यास त्या बागेत कॉपर ऑक्सिक्लोराईड १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करून घ्यावी.

काडीवरील जखमा छोट्या असल्यास तिथे पुन्हा छाटणी घेणे टाळावे. जखम झालेल्या डोळ्याच्या खाली खुडून घेतल्यास नवीन फूट मिळू शकेल. या वेळी मात्र नत्र आणि पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असेल. जखम झाल्यामुळे वेलीला थोडाफार ताण बसला असेल व त्यामुळे फुटी बाहेर निघण्यास त्रास होऊ शकतो.

या करिता थोड्याफार प्रमाणात पाणी वाढवावे. नत्र नेहमीच्या मात्रेपेक्षा २० टक्के जास्त द्यावे. या वेळी युरिया किंवा अमोनिअम सल्फेट किंवा १२-६१-० या सारख्या खताचा वापर फायद्याचा ठरेल.

जास्त जखम झालेल्या काडीवर मात्र पुन्हा रिकट घेणे हाच पर्याय असेल. पाने फाटलेल्या बागेत पुढील काळात फारशी अडचण येणार नसली तरी प्रकाश संश्लेषणाकरिता आवश्यक असलेल्या पानांचे क्षेत्रफळ कमी झाल्यामुळे पुढील काळात काडीमधील अन्नद्रव्यांची साठवण कमी होऊ शकते. बागेत पाने किती टक्के फाटली गेली त्या प्रमाणे काडीवर पुढील पाने वाढवून घ्यावीत.

घडाच्या विकासात एका काडीवर साधारणतः १६० ते १७० वर्ग सेंमी आकाराची सोळा ते सतरा सशक्त पाने आवश्यक असतात. ज्या बागेत कुठल्याही कारणामुळे (उदा. चुनखडीच्या उपलब्धतेमुळे) पानांचा आकार कमी झालेला असल्यास या वेळी तीन ते चार पाने पुन्हा वाढवून घ्यावी.

२) वेलीची सूक्ष्मघड निर्मितीची अवस्था

अ) सूक्ष्म घड निर्मितीची अवस्था सुरू असलेल्या बागेत जर या वेळी पाऊस झालेला असल्यास, वेलीचा जोम वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. बऱ्याच वेळा या अवस्थेतील बागेत पेऱ्यातील अंतर वाढते. फुटींवर बगलफुटींची संख्या वाढते.

कॅनोपीमध्ये गर्दी होऊन सूक्ष्म घड निर्मितीकरिता आवश्यक असलेला सूर्यप्रकाश डोळ्यावर पडत नाही. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. पाऊस जास्त झाल्यास आर्द्रतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे वेलीतील जिबरेलिन्सचे प्रमाण अचानक वाढते. त्याचा विपरीत परिणाम सूक्ष्मघड निर्मितीवर होतो.

या वेळी जोम नियंत्रणात राहण्याकरिता शेंडा पिंचिंग करून घ्यावे. निघालेल्या बगलफुटीही त्वरित काढाव्यात. पाण्यावर काही दिवसांकरिता पूर्णपणे नियंत्रण ठेवावे. सूक्ष्मघड निर्मितीसाठी आवश्यक अन्नद्रव्यांचा वापर करावा. (स्फुरद आणि पालाश असलेल्या ग्रेडचा) आणि संजीवकांचा वापर करावा.

ब) पाऊस पडला नसलेल्या परिस्थितीत सूक्ष्मघड निर्मितीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. जमिनीचा प्रकार पाहून पाण्याचा वापर करावा. भारी जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्यामुळे सूक्ष्मघड निर्मितीच्या कालावधी सुरू होण्याआधी पाच ते सहा दिवसापूर्वीपासून पाणी कमी करावे.

हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधी सुरू होण्याच्या दिवसापासून पाणी कमी करावे. यामुळे सूक्ष्मघड निर्मितीला अडचण येणार नाही.

भारी जमिनीत वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी पालाशयुक्त खतांचा वापर करणे गरजेचे असेल. पाच ते दहा मि.मी. पाऊस झालेल्या परिस्थिती ३ ते ३.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ०-०-५० या खताची फवारणी करावी.

Grape Management
Grape Disease Management : अवकाळीनंतर द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन कसे करावे?

सूक्ष्म घड निर्मितीकरिता फॉस्फरस हे सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) च्या स्वरूपात दिल्यास २५० किलो प्रति एकर इतकी गरज असेल. आधीच तीन बॅग एसएसपीची उपलब्धता केलेली असल्यास आता १०० किलो एसएसपी द्यावे. यापूर्वी काहीच फॉस्फरस दिलेले नसल्यास एसएसपी च्या ऐवजी फॉस्फोरिक ॲसिड (८५ टक्के ) ४७ किलो प्रति एकर या प्रमाणे द्यावे. फॉस्फोरिक ॲसिडचा वापर केल्यामुळे जमिनीचा सामू कमी होण्यास मदत होते.

ज्या बागेत चुनखडी कमी अधिक प्रमाणात आहे, अशा ठिकाणी पाने पिवळी पडण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. अशा ठिकाणी विद्राव्य गंधक ठिबकच्या माध्यमातून देता येईल. फेरस सल्फेट १० ते १५ किलो प्रति एकर ( पाच किलो प्रति एकर या प्रमाणे) तीन वेळा ठिबकद्वारे द्यावे. त्यानंतर १० ते १५ किलो विद्राव्य गंधकाचा वापर करता येईल.

खरडछाटणीच्या ४५ व्या दिवशी काडीवरील तळापासून पाचवे पान काढून त्याचे देठ वेगळे करावे. साधारणपणे एका प्लॉटमधून १०० ते १२० देठ वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतले असल्यास देठाचा प्रातिनिधीक नमुना मिळू शकतो. हे देठ शुद्ध पाण्यामध्ये (डिस्टिल्ड वॉटर) धुवून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठवावेत. यामुळे वेलीची अन्नद्रव्यांची सद्यःस्थिती कळेल. त्यानुसार खतांचा वापर व बचत शक्य होईल.

संपर्क - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com