
Grape Market News Sangli : मणेराजुरी (ता. तासगाव) येथून मणेराजुरी, सोनी, करोली, मतकुणकी, उपळावी येथील शेतकऱ्यांची तब्बल ७० लाख रुपयांची फसवणूक करून उत्तर प्रदेशातील द्राक्ष व्यापारी (Grape Trader) पळून गेल्याची घटना गुरुवारी (ता. २३) उघडकीस आली. '
महिनाभरात द्राक्ष व्यापारी पळून जाण्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, पळून गेलेल्या व्यापाऱ्याच्या सहकाऱ्याला पकडून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणुकीची (Fraud With Grape Farmer) मालिका थांबण्यास तयार नाही. गुरुवारी (ता. २३) सकाळी मणेराजुरी तासगाव रस्त्यावरील ए. के. फ्रूट सप्लायर्स नावाने द्राक्ष खरेदीचा (Grape Procurement) व्यवसाय करणारा सादाब (अलाहाबाद - उत्तर प्रदेश) हा महिन्यापासून द्राक्ष खरेदी करत होता.
त्याने मणेराजुरी, सोनी परिसरातून अनेक शेतकऱ्यांकडून सुरुवातीला रोख पूर्ण पैसे देऊन विश्वास संपादन केला.
आठ दिवसांत शेतकऱ्यांना काही पैसे देऊन उरलेल्या रकमेचे धनादेश दिले. काहींना दोन दिवसांत रोख पैसे देतो, असे सांगितले. दरम्यान, उपळावी येथील एका शेतकऱ्याची मोटारसायकल घेऊन प्रमुख द्राक्ष व्यापारी पळून गेला.
दरम्यान, अकबर (नगर, महाराष्ट्र) याला गाडीतून पळून जात असताना शेतकऱ्यांनी पकडून तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.
महम्मद रफिक (भिवंडी) या कामगाराला शेतकऱ्यांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे व्यापाऱ्याने आधार कार्डची झेरॉक्स, बँकांचे धनादेश काही शेतकऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दिल्याचा दुजोरा तासगाव पोलिसांनी दिला आहे. मात्र कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
या व्यापाऱ्याने मणेराजुरीतील २० शेतकऱ्यांची ४७ लाखांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी उशिरापर्यंत फसवणूक झालेले शेतकरी व्यापारी राहत असल्याच्या ठिकाणी येत होते.
मणेराजुरी, मतकुणकी, सावर्डे, सोनी, करोली, उपळावी भागातील शेतकऱ्यांची सुमारे ७० लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे.
रात्री उशिरापर्यंत मणेराजुरी तासगाव रस्त्यावरील या व्यापाऱ्याच्या राहण्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गर्दी केलेली होती. व्यापारी पळून गेल्याचे समजेल तसे शेतकरी धाव घेत होते.
दोन महिन्यांत तीन कोटींना गंडा
मणेराजुरी व परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करून पळून जाण्याची हंगाम सुरू झाल्यापासून दीड-दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांची अडीच ते तीन कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पळून गेलेल्या व्यापाऱ्याचा पत्ता, पूर्ण नाव, किती दिवसांपासून व्यवसाय करतोय? याची अधिकृत माहिती कोणालाही नाही हे विशेष.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.