
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात हागणदारी मुक्त अभियान सुरू होऊन दीड दशक झाले तर हागणदारीमुक्त जिल्ह्याची घोषणा करून पाच वर्षे झाली तरही जिल्ह्यातील अनेक मोठ्या खेडेगावामध्येही रस्त्यावरच शौचाला बसण्याची प्रथा आहे. यामुळे हागणदारी मुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आहे.
उघड्यावर शौचास जाऊन अनेक आजारांना जन्म घालण्याऐवजी, शौचालये बांधण्याची संकल्पना सरकारने आणली. नागरिकांना लाभाच्या योजना देताना शौचालय बांधणे सक्तीचे केले.
मात्र, नागरिकांनी यातून सोईस्कर पळवाट शोधली. लाभाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शौचालये रातोरात उभी केली. मात्र अशी शौचालये केवळ ‘शो पीस’ ठरल्याचे वास्तव आहे.
विशेष म्हणजे वापरण्यााजोगी चांगल्या दर्जाची शौचालये बांधून त्याच्या वापरामधून आजारांना निमंत्रण न देण्याची मानसिकता नागरिकांची आजतागयत होत नाही.
ग्रामीण भागात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना लाज नाही अन् बघणाऱ्यांना लाज नाही असेच उपरोधिकपणे त्याचे वास्तव वर्णन केले जाते. प्रत्येक गोष्ट मायबाप सरकारनेच करावी, ही नागरिकांची मानसिकता केव्हा बदलणार? हा मुद्दादेखील तितकाच महत्वाचा आहे.
हागणदारी मुक्त अभियानासाठी शासन स्तरावर जनजागृतीसह विविध प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले. यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुड मॉर्निंग पथके तयार करण्यात आली होती.
हागणदारी मुक्त जिल्हा झाल्याची घोषणा ५ वर्षांपूर्वी जिल्ह्यात करण्यात आली. त्यासाठीचे फलकही गावोगावी लावण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात हागणदारी मुक्त अभियान यशस्वी झाल्याचे ग्रामीण भागात कुठेही दिसून येत नाही.
हागणदारीमुक्त जिल्हा परंतु, प्रशासनाच्या उदासीन धोरण आणि लोकसहभागीअभावी गुड मॉर्निंग पथके केवळ कागदावरच राहिली आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गुड मॉर्निंग पथकांची निर्मिती करण्यात आली होती.
मात्र, प्रशासनाचे सहकार्य नसल्याने गावकऱ्यांमध्ये तेढ निर्माण होऊ लागली आहे. सुरवातीला ज्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. ती भीती आता लोकांमध्ये राहिलेली नाही.
ग्रामस्थ बिनधास्तपणे उघड्यावर शौचास बसत असल्याचे चित्र गावोगावी दिसते. गावात प्रवेश करताना किंवा गावातून बाहेर पडताना दुर्गंधी येते, तेव्हा नाकाला रुमाल बांधण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही शोकांतिकाच
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षे झाली. देशातील सजग नागरिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहेत. सोशल मीडियामुळे जणू माहितीचा विस्फोट झाला. ॲपच्या जगाशी नागरिकांची कनेक्टिव्हिटी आहे.
शेताच्या बांधावर बसून शेतकरी सातासमुद्रापार चाललेल्या घडामोडींशी समरुप होतोय. कामाच्या ठिकाणाहून मजुर जगाशी कनेक्ट राहतोय.
जुन्याच्या तुलनेत सगळे काही खूप बदलले आहे. पण उघड्यावर शौचास जाण्याची मानसिकता बदलताना दिसत नाही. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतर देखील ही शोकांतिका कायम राहावी हेच मोठे दुर्दैव.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.