
Nanded Grampanchyat News : आरक्षित जागेतून निवडून आलेले जिल्ह्यातील एक हजार ३८३ उमेदवार आपले जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु शकले नसल्याने त्यांना अनर्ह ठरविण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ही कार्यवाही केली आहे.
महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम दहा (एक - अ) अन्वये जे उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद आहे.
या उमेदवारांना संधी देवूनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करू शकले नसल्यामुळे अशा एक हजार ३८३ उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रद्द केली.
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार ता. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान व ता. १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी पार पडली होती.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास ता. १७ जानेवारी २०२३ पर्यत अंतीम मुदतवाढ दिली होती. तरी देखील अनेकांनी जात वैधता प्रमाणपत्र संधी देऊनही सादर केले नाही.
तालुकानिहाय उमेदवारांची संख्या
जातीचे वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करु शकले नसल्याने अनर्ह केलेल्या तालुकानिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड - १५, अर्धापूर - ५४, भोकर - १३८, मुदखेड - ५३, हदगाव - १०८, हिमायतनगर - ७०, किनवट - ३४, माहूर - १९, धर्माबाद - ९९, उमरी - १४२, बिलोली - ६१, नायगाव - ११२, देगलूर - १२१, मुखेड - १३९, कंधार - ९१, लोहा - १२७ अशी एकूण एक हजार ३८३ अनर्ह उमेदवार आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.