Agriculture Policy : शेतकऱ्यांना गृहीत धरणे बंद करा

२८ सप्टेंबर २०२२ रोजीचा ‘ॲग्रोवन’मधील माझा ‘शेतकरी लुटीची नीती कधी बदलणार?’ हा लेख वाचून आलेल्या असंख्य फोनपैकी तीन शेतकऱ्यांशी झालेले संवाद देशातील शेतीची परिस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणारे असे आहेत. त्यामुळेच त्या फोनवरील संभाषणांचा ऊहापोह येथे या लेखाच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे.
Farmer Suicide
Farmer SuicideAgrowon

शेतकरी एक व्यावसायिक आहे, त्याच्या मर्जीप्रमाणे त्याला शेती हा व्यवसाय (Agriculture Business) करता आला पाहिजे, हे जणू काही सरकार मानायलाच तयार नाही. बेमूर्वतखोरपणे शेतीवर निर्बंध (Restriction On Agriculture) लादणारे कायदे (Farm Law) करायचे, शेतकरीविरोधी घटनादुरुस्त्या करायच्या, शेतीमालाचे भाव (Agriculture Produce Rate) पाडण्याचे उद्योग चालू ठेवायचे, हा सिलसिला थांबवण्याचे संकेत दिसत नाहीत.

पंचाहत्तर वर्षांपासून शेतकऱ्यांना सांगण्यात आले, रासायनिक खते वापरा, कीडनाशके फवारा, बँकेचे कर्ज घ्या, सिंचनाची शेती करा, शेततळे करा, ट्रॅक्टर घ्या, पाइप लाइन टाका, लाइट घ्या, इंच इंच शेती लागवडीखाली आणा आणि उत्पादन वाढवा. किती राबवलं शेतकऱ्यांना गुलामासारखा? देशात ८५ टक्के अल्पभूधारक संख्या असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतीत अचानक बदल करायला सांगितले तर ते त्यांना झेपेल का, याचा विचार केला पाहिजे.

काय परिस्थिती आहे शेतीची?

ॲग्रोवनमध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला, की तो दिवस केवळ फोन घेण्यासाठीच राखून ठेवावा लागतो. फोन करणारे शेतकरी घरच्या माणसासारखे अंतरीचे दुखणे उघडतात. २८ सप्टेंबरचा माझा लेख वाचून आलेल्या असंख्य फोनपैकी तीन शेतकऱ्यांशी झालेले संवाद देशातील शेतीची परिस्थिती समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. त्यामुळेच त्या फोनवरील संभाषणाचा ऊहापोह येथे होणे मला गरजेचे वाटते. त्या तीन फोनपैकी एक पाथ्रीचा, एक कोल्हापूरचा आणि एक नाशिकचा शेतकरी होता.

१) पाथ्रीचा शेतकरी सांगत होता, साहेब मी चार एकराचा अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्या पोरीला शिकायचे होते. तिच्या शिक्षणाचा खर्च मला भागवता येणार नव्हता. पोरीला म्हणालो, बाळा, तुझ्या शिक्षणाचा खर्च मला झेपणार नाही. तू शिकायचा नाद सोड. लगेच ती म्हणाली, ‘बाबा मग यापुढे मी तुम्हाला कधीच दिसणार नाही.’ माझे आणि माझ्या मुलीचे बोलणे तीन वेळा झाले. पोरीचे हे बोल माझ्या जिव्हारी लागले, मी पार हादरून गेलो.

Farmer Suicide
Agriculture Policy : अस्थिर धोरणामुळे अस्तित्व धोक्‍यात!

मग ठरवले काय होईल ते होईल, शक्य होईल तोपर्यंत तिच्या शिक्षणाचा खर्च करीन, ज्या दिवशी शक्य होणार नाही, त्या दिवशी जिवाचं बरंवाईट करून घेईन. सध्या ती पुण्यात इंजिनिअरिंग करते आहे. सांगताना त्याचा जडावलेला आवाज स्पष्ट जाणवत होता. ‘यापुढे मी तुम्हाला दिसणार नाही’ हे पोरीचे बोल ऐकताना माझेही काळीज चिरत गेले. त्याचं बोलणं बराच वेळ शांतपणे ऐकून घेतलं, अंतःकरण मोकळं करू दिलं. शेवटी म्हणालो, हे बघा, जमीन, जायदाद, पैसा या गोष्टी आपल्या मुला-बाळांसाठीच ठेवतो ना? तुमची जमीन आणि जे असेल ते भांडवल मुलाबाळांचं भवितव्य घडवण्यासाठी वापरा.

ते जिवंत राहिले तर तुमच्या जमिनीचा फायदा, तेच नसतील तर जमीन काय उपयोगाची? शेती राहील जाईल, याची चिंता करू नका. मुला-मुलींना स्वतःच्या पायावर उभे करा. तीच तुमची संपत्ती आहे हे लक्षात घ्या. आणि हो जिवंत राहिलात तरच त्यांचं भविष्य घडवाल, उगाच आततायीपणा करू नका, शांतपणे मार्ग काढा. आणखी एक बाब लक्षात घ्या, त्यांनी तुमच्या पोटी जन्म घेण्यासाठी विनंती केलेली नव्हती, तुम्ही त्यांना जन्माला घातलंय, त्यांची जबाबदारी पार पाडा. मग मात्र तो शेतकरी भानावर आला. म्हणाला, साहेब, माझ्या जवळच्या नातेवाइकांनी सुद्धा अशी हिंमत आणि समज मला कधी दिली नाही, जी तुम्ही दिली. मी पुण्यात आल्यावर तुमची भेट नक्की घेईन, असे म्हणून तो थांबला.

Farmer Suicide
Crop Damage : अतिवृष्टीसदृश पावसामुळे पिके मातीमोल

२) कोल्हापूरचा तीन एकर जमिनीचा शेतमालक, शेती आणि मार्केटिंग करतो. त्याने सांगितले, साहेब, माझा मुलगा अकरावीला आहे. लाख संकटे आली तर बेहत्तर पण मी त्याला शेतीकडे फिरकू देणार नाही.

३) नाशिकचा शेतकरी, तीन एकरचा मालक. बराच वेळ अंतःकरण मोकळं करताना म्हणाला, मी भाजीपाला केला, द्राक्षे लावली, जिल्हा बँकेचं कर्ज घेऊन झालं, खासगी बँकांकडून कर्ज घेतलं, मायक्रो फायनान्स पालथे घातले आणि आता खासगी सावकारी काढली. कर्ज तरी किती काढू? खताचे, बियाण्याचे, कीडनाशकांचे भाव दुप्पट- तिप्पट झाले. शेतीचा खर्च तिपटीने वाढलाय. उत्पादन कितीही वाढवलं तर बाजारात मार खावा लागतोय. कोरोनाच्या काळात आम्ही घरात बसलो नाय. कोरोनानंतर तर आपत्ती हात धुऊन पाठीमागे लागलीय. बायको म्हणते सोनंनाणं गेलं, पोरं म्हणत्यात शाळेच्या फीस द्या, शेताचे खर्च भागवावे का घराचे? काही सुधरंना गेलंय, जगणं मुश्कील झालंय. शब्दापलीकडे मी तरी काय देणार, माझ्या सांत्वनाने त्यांच्या परिस्थितीत फरक थोडाच पडणार आहे?

कर्जाच्या भाराखाली पिचलेला शेतकरी

डोक्यावरच्या कर्जाचा डोंगर, थकलेल्या जन्मदात्याचे ओझे आणि मुलाबाळांच्या भविष्याच्या जबाबदाऱ्यांनी त्रस्त, जगण्याची उमेद हरवलेल्या, हताश, ८५ टक्के अल्पभूधारक खातेदार, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि कथा थोड्या बहुत फरकाने अशाच आहेत. त्या सांगतात की त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. एखाद्या छोट्या धक्क्याने यांपैकी किती शेतकरी मरणाला कवटाळतील सांगवत नाही.

अशी भयावह परिस्थिती असताना सरकार आणि त्याचे अर्थनीतीकार शेतकऱ्यांना गुलाम समजून आणि गृहीत धरून काहीही तुघलकी निर्णय लादत असतात. शेतकरी शेतीत आपले भांडवल घालतात, घरातील सर्व सदस्य राबतात, धोका पत्करतात म्हणून तर एकशे चाळीस कोटी लोकांना तीन तीन वर्षे पुरेल इतके धान्य उत्पादित होत असते. असे असताना एकीकडे शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नाही, तर दुसरीकडे सरकारच्या निर्णयांनी पण शेतीमालाची माती होत आहे. निविष्ठांच्या वाढत्या किमतीवर सरकारचे नियंत्रण नाही, शेतीमाल बाजारात येण्यापूर्वीच सरकार त्याचे भाव पाडण्याचे नियोजन करून ठेवते. म्हणूनच सांगावेसे वाटते, शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या व्यवसायाचे संपूर्ण स्वातंत्र्य द्या, त्यांच्या मर्जीप्रमाणे व्यवसाय करू द्या.

(शेतकरी संघटना आंबेठाणचे विश्‍वस्त आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com