Galyukta Shiwar Scheme : तलाव गाळमुक्त अन् शेती सुपीक करण्याचे ध्येय

Galyukta Shiwar : तलाव व जलस्रोत गाळमुक्त करण्यासाठी खोदाईसाठी लागणाऱ्या यंत्राच्या डिझेलचा खर्च आणि गाळ वाहून नेणे या दोन्हींमध्ये अनुदान देण्याचे शासनाच्या वतीने जाहीर केले आहे. ही योजना येण्याआधीपासूनच गाळाचे महत्त्व लोकांना पटविण्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत. चक्क, शेतकरी गाळ विकत घेत आहेत.
Galyukta Shiwar Scheme
Galyukta Shiwar Scheme Agrowon

सतीश खाडे

Indian Agriculture : अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथील काही गावात शेतकऱ्यांचा प्रतिसादही मोठा असल्याचा अनुभव येत आहे. या गाळ काढण्याच्या पर्यायाने जलसंवर्धन मोहिमेचे नेतृत्व करताहेत ‘लोकजागर संघटन’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे काही उत्साही कार्यकर्ते. या परिसरातील एक उद्योजक अशोक सारडा या सामाजिक कामामध्ये या गटाला सल्ला देण्याचे काम करत आहेत.

लोकखर्चातूनच ओढे व तलावांतील गाळ काढण्याचा हा अभिनव उपक्रम राबवला जातो. हा गाळ शेतामध्ये वापरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गाळाचे फायदे, त्याची शास्त्रीय माहिती त्यांच्यापर्यंत पोचवली जात आहे. त्यासाठी जाहिरातीही तयार करण्यात आल्या आहेत.

बहुतांश जाहिरातीमध्ये मोठमोठे दावे केले जातात. मात्र त्यांच्या खरे खोटेपणाविषयी काहीच सांगता येत नाही. मात्र या जाहिरातीतील सर्व बाबी शास्त्रीय असून, गेल्या दोन वर्षातील स्वतःच्या अनुभवावर आधारित असल्याचा या कार्यकर्त्यांचा दावा आहे. हा दावा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू.

जलस्रोतातील गाळ मुळात कशासाठी काढायचा, तर पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी. हाच गाळ पुढे जमिनीत टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढते, हे सर्वांनाच ढोबळमानाने माहिती असते. पण त्या पलीकडेही या उपक्रमाचे अगदी महत्त्वपूर्ण फायदे आहेत.

Galyukta Shiwar Scheme
Galyukta Shiwar Scheme : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेस भोगाव येथे सुरवात

१. साठवलेले ताजे पाणी त्वरित वापरता येते.

२. साठा वाढण्यासोबतच पाणी सावकाश जमिनीतून परिसरातील विहिरी व बोअरवेल यांचे पाणी वाढते.

३. जमिनीत पाणी साठल्यामुळे बाष्पीभवन शून्य होते. म्हणजेच त्याद्वारे होणारा पाण्याचा अपव्ययही शून्य राहतो.

४. बोअरवेलमधील पाण्यात असलेल्या अधिक क्षारांमुळे ते आरोग्य आणि पिके दोन्हींसाठी हानिकारक असते. पण अशा क्षारयुक्त पाण्यात पावसाचे पाणी मुरून मिसळल्यामुळे त्याचीही क्षारता कमी कमी होत जाते. ते मानव, जनावरे यांच्यासह पिकांच्याही आरोग्यासाठी फायदेशीर असते.

५. पाणी साठवण क्षमता वाढल्याने पुढे उद्भवणाऱ्या पुराच्या स्थितीवर नियंत्रण मिळते. संभाव्य धोका कमी होतो.

६. पाण्याची पातळी वाढल्याने उचलण्यासाठी विजेचा वापर कमी होतो.

७. शेतीमध्ये गाळ टाकल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण लक्षणीय वाढते.

८. जमिनीची सुपीकता वाढल्याने पिकाच्या उत्पादनात व गुणवत्तेत मोठी वाढ होते.

९. रासायनिक वा सेंद्रिय खताची गरज कमी होते. तितकी पैशांची बचत होते.

१०. गाळामध्ये मुरूम अधिक असल्यास त्यापासून पाणंद रस्ते तयार करता येतात. हे शेती साहित्य किंवा मालाच्या वाहतुकीसाठी उपयोगी ठरतात.

११. जमिनीच्या वाढलेल्या सेंद्रिय गुणधर्मामुळे जमिनीची जलधारण क्षमता व पाणी मुरण्याची क्षमताही वाढते. कारण कार्बनयुक्त मृदा सहा पट पाणी धरून ठेवते. त्यातूनच भूजल वाढण्यास मदत होते.

१२. सुपीक जमिनीचे मूल्य बरड जमिनीच्या तुलनेमध्ये कितीतरी अधिक असते.

हे सर्व फायदे नीट लक्षात जाणून घेतले तर गाळ काढून शेतात वापरणे हा खर्च नाही तर दीर्घकालीन गुंतवणूक आहे, हे कुणाच्याही लक्षात येईल. या थोड्या गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न मिळते, हेच वेगवेगळ्या जाहिरातीद्वारे सांगण्याचा या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्याला हळूहळू यश मिळत आहे. अशाच प्रकारची माहिती पूर्ण विदर्भातच नव्हे, तर महाराष्ट्रात आणि भारतात पोचवणे शक्य झाले

तरी भूजल संवर्धनाच्या चळवळीत सामान्य शेतकरीच सर्वात पुढे असेल, हे नक्की.

‘लोकजागर संघटन’ आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी नोव्हेंबर २१ ते जुलै २२ पर्यंत अंजनगाव सुर्जी आणि अचलपूर या तालुक्यातील सहा गावात ४ मोठ्या ओढ्यातील गाळ काढून ओढ्यातच दोनशे डोह तयार केले आहेत. एकत्रित तीन लाख घनमीटर मातीचे खोदकाम करताना सर्व प्रकारच्या शास्त्रीय, तांत्रिक व आर्थिक बाबींचा अंतर्भाव केला.

सर्व बाबींची निरीक्षणे व निष्कर्ष नोंदवले. त्या आपल्या कामाचे परिणाम पावसाळ्यानंतर लगेच व पिकांवरील परिणाम खरीप हंगामाच्या शेवटी मोजले. या कामासाठी काही तज्ज्ञांची मदत घेतली. पाण्याविषयीचे परिणाम मोजण्यासाठी जलधरांचे सीमा निश्चिती ( Aquifer Mapping) आधीच करून घेतले होते.

नोंदवलेले परिणाम पुढील प्रमाणे...

- तीन लाख घनमीटर खोदकामामुळे पाणी साठवणुकीमध्ये तेवढीच भर पडली.

- या पाणी साठवणीतून मुरलेले पाणी म्हणजेच जलधरात झालेली वाढ. ही होती ७०० पट अधिक. हे मोजण्यासाठी त्यांनी जलधराच्या सीमा जिथपर्यंत जातात, त्याची लांबी -रुंदी मोजली. ती भरली नऊ चौरस किलोमीटर.

- गाळ काढलेल्या ओढ्यालगतच्या आणि जलधर जिथे संपत होता, त्या परिसरातील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणी पातळीत झालेली वाढही मोजली. पाणी पातळीत किमान दीड मीटर व कमाल अडीच मीटरपर्यंत वाढ झालेली होती. त्यातून सरासरी उंची दोन मीटर व नऊ चौरस किलोमीटर यांच्या गुणाकारातून पाण्याचे घनफळ मिळाले.

त्यातून निश्चित झाले की केलेल्या खोदकामाच्या आकारमानाच्या ७०० पट पेक्षाही अधिक पाणी मुरलेले आहे. खरेतर भूजल शास्त्रातील ही लोक खोदकामाच्या दहापट पाणी वाढले तर तो अतिउत्तम परिणाम समजतात.

Galyukta Shiwar Scheme
Agriculture Scheme : गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू

- येथील पाण्याची क्षारता काम करण्यापूर्वी ३०० पीपीएम होती. पाणी मुरल्यानंतरची क्षारता दीडशे पीपीएमपर्यंत खाली आली होती. या पाण्याने अकरा हजार एकर क्षेत्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ओलिताखाली आणले. एकेकाळी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावात इतकी जमीन सिंचनाखाली आली.

- २०० एकर जमिनीत गाळ पसरवला गेल्यामुळे तिची सुपीकता वाढली. त्यातून कपाशी, सोयाबीन, संत्रे, केळी, भाजीपाला, हरभरा, तूर, आले, मुसळी, पानवेली अशा सर्व पिकांचे उत्पादन वाढले. एकट्या सोयाबीनच्या उत्पादनात ७० टक्के वाढ नोंदवली गेली.

- १०० एकरापेक्षा अधिक जमीन क्षारपडपासून सुपीक झाली. वीस एकर पडीक असलेली जमीनही पूर्णपणे उपजाऊ झाली.

- निघालेल्या मुरुमातून सहा किलोमीटर पाणंद रस्ते तयार झाले.

- या ट्रस्टने या गाळाचे माती परिक्षण करून त्यातील घटकांची माहिती घेतली. त्यातील क्षारता, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद, पालाश मोजून ती माहितीही सर्व लोकांसाठी उपलब्ध केली आहे. या वर्षी या गाळात कमी असलेले घटक प्रति ट्रॉलीमध्ये मिसळून त्यापासून परिपूर्ण सेंद्रिय गाळखत तयार केले.

खताच्या किमतीची तुलना ही लोकांसमोर ठेवून त्याच्या वितरणाचेही नियोजन झाले आहे. त्यानुसार गाळाचे हे सकस खत फक्त पन्नास पैसे किलो इतक्याच किमतीत पडते आहे.

- या एकत्रित फायद्यामुळे सुपीक जमिनीची वाढलेली किंमत ( asset value) ही निदर्शनास आणली आहे.

- गाळासाठी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा शेकडो पट असल्याचे आकडेवारीतून सिद्ध केले आहे.

- यासोबतच पूर नियंत्रण, पुरामुळे होणारे सार्वजनिक नुकसानीला चाप बसणार आहे.

-पाणी वरच्यावर उपलब्ध झाल्यामुळे उपसण्यासाठीच्या विजेचा वापर कमी होणार आहे. यात शेतकरी आणि वीज मंडळ दोघांचाही फायदा आहे.

- गेल्या वर्षाच्या अनुभवावरून ट्रस्टने चोपण जमीन असलेल्या ठिकाणी तळे किंवा डोह शक्यतो न करण्याचा निर्णय घेतला आहे.

- जिथे कमाल पाणी मुरू शकते, अशा जागा तज्ज्ञांकडून माहीत करून घेऊन खोदकाम करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिक पाणी जमिनीत मुरवले जाईल.

-जे शेतकरी आपल्या शेताची बांध-बंदिस्ती करतील, त्यांनाच गाळ विकत देण्याची अट आहे. बांधबंदिस्तीमुळे पावसाळ्यात गाळ व माती वाहून पुन्हा तलावाकडे येणार नाही. पाऊस किंवा वाऱ्यामुळे एक इंच मातीचा थर वाहून गेला तर एका एकरातून शंभर घनमीटर सर्वाधिक सुपीक माती वाहून जाते.

१०० घ.मी. माती म्हणजे ३० ते ३५ ट्रॉल्या माती. यावरून मातीची किंमत कुणालाही काढता येईल. केवळ बांधबंदिस्तीमुळे आपली हजारो रुपयांची बचत होते हे शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजे. या सुपीक मातीमुळेच जमिनीची उत्पादकता टिकून राहते.

अशी आहे जाहिरात

‘गाळ वापरा, शेती सुधारा’

‘गाळ म्हणजे सोन्याची खाण’

‘एकरी पंधरा-वीस ट्रॉली गाळ टाका, पुढील दहा वर्षेपर्यंत एक लाख रुपये प्रति वर्षी नफा कमवा.’

‘ सर्व पिकांसाठी उत्तम परिणाम’

‘गाळ वापरा पैसे कमवा, पैसे वाचवा!’

‘चोपण जमीन होईल सर्वात भारी जमीन ! एकरी ५० ते १०० ट्रॉली गाळ टाका!!

सेंद्रिय कार्बन सरासरी - जमीन ०७५ टक्के तर गाळामध्ये १.३५ टक्के (म्हणजेच ८० टक्के जास्त)

रासायनिक खत - १५ रुपये प्रति किलो

गांडूळखत - ८ ते १० रुपये प्रति किलो

शेणखत, सोनखत, कंपोस्ट - २००० रुपये प्रति ट्रॉली

गाळ - कमाल २००० रुपये प्रति ट्रॉली. सरासरी आठ आणे प्रति किलो फक्त.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com