डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, व्ही. आर. पवार
Indian Agriculture : जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्यक आहे. यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, गोठ्यातील वाया गेलेला चारा, मलमूत्र, शेतातील तण, पिकाची धसकटे, पाने , देठ, भाज्यांचे टाकाऊ भाग, पेंढा इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा.
बेड पद्धत :
१. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वर उल्लेख केलेले टाकाऊ पदार्थ एकत्र करावेत
२. सेंद्रिय पदार्थ आकाराने मोठे असल्यास त्याचे लहानात लहान तुकडे करावेत.
३. कंपोस्ट बेड शक्यतो सपाट जागी असावा. बेडची खोली २ फूट, रुंदी ४ फूट आणि लांबी १२ फूट असावी. बेडचा तळाच्या बाजू ठोकून टणक कराव्यात.
४. खताकरिता वापरावयाच्या सेंद्रिय पदार्थात (काडीकचरा किंवा पालापाचोळा) दगड, काचा, खिळे प्लॅस्टिकच्या पिशव्या यांसारखे घटक वेचून बाजूला काढावेत.
५. बेड भरताना प्रथम वितभर जाडीचा (६ ते ८ इंच) बारीक केलेल्या पदार्थांचा आणि त्यावर शेणकाल्याचा (१ भाग शेण व ५ भाग पाणी) थर द्यावा. असे आलटून पालटून थर रचून बेड भरावा.
६. शेणकाल्यामध्ये प्रति टन सेंद्रिय पदार्थास तीन किलो याप्रमाणात कंपोस्ट कुजविणारे जिवाणू संवर्धक मिसळावे.
७. बेड भरताना जनावरांचे मूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण, कचऱ्याच्या प्रत्येक थरावर शिंपडावे.
८. जुने कुजलेले शेणखत वापरल्यास खत लवकर कुजण्यास मदत होते.
९. अशा प्रकारे आलटून पालटून थरावर थर देऊन बेडवरून साधारण एक ते दीड फूट उंच गेल्यावर बेड भरणे बंद करावे.
या पद्धतीने ४ ते ५ महिन्यांनी कंपोस्ट खत तयार होते. बेडमधील थर १६ दिवसांनी, एक महिन्यांनी व दोन महिन्यांनी खाली-वर केल्यास कुजण्याच्या प्रक्रियेस मदत होते. बेडमधील ढिगाऱ्यामधील काडीकचऱ्याचे आकारमान कुजल्यानंतर जवळजवळ १/४ होते. सर्वसाधारण बारा फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट खोल आकाराच्या बेडमधून सुमारे २०० किलो कंपोस्ट खत तयार होते.
कंपोस्ट खताची वैशिष्ट्ये :
- खतास मातकट वास येतो. रंग गर्द काळा असतो.
- खत वजनाने हलके असून, त्याचे तापमान कमी असते.
- खताचा स्पर्श मऊ असून, ते हाताने चुरगळ्यास त्याचा भुगा होतो.
कंपोस्ट खताचे फायदे :
१. स्वतःच्या शेतामध्ये तयार करता येते.
२. कंपोस्ट खतनिर्मिती आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखी आहे. टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर होतो.
३. कंपोस्ट खताच्या वापरामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने धूप कमी होते.
४. कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
संपर्क - डॉ. व्ही. जे. गिम्हवणेकर, ८३९०७१७३६५, व्ही. आर. पवार, ७७९८७२३७५५
(कृषी महाविद्यालय आचळोली, ता. महाड, जि. रायगड)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.