Asia Drought Update : दुष्काळाची सर्वात जास्त दाहकता आशिया खंडात?

आपत्ती कोणतीही असो तिच्यामुळे नुकसान होणारच! त्यामुळे ती येऊच नये अन् आलीच तर काय करायला पाहिजे किंवा तिचा सामना करण्याची पूर्वतयारी आपली कशी असावी, हे या लेखात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Drought
DroughtAgrowon

संजय शिंदे

Drought : दुष्काळ दर सात ते दहा वर्षांनी येतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु मागील तीन दशकांपासून आपल्याकडे दर चार-पाच वर्षांनीच दुष्काळी परिस्थिती तयार होत आहे. हे आपल्याला माहीत असताना सुद्धा आपण गाफील का राहतो, असा प्रश्‍न माझ्यासारख्या अनेक लोकांना पडतो.

दुष्काळाबाबत गाफील अवस्थेमुळे आपल्याला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागते. हे आपण मागील २०१२ च्या तसेच २०१५-१६ च्या भीषण दुष्काळात अनुभवलेले आहे.

आपत्ती कोणतीही असो तिच्यामुळे नुकसान होणारच! त्यामुळे ती येऊच नये अन् आलीच तर काय करायला पाहिजे किंवा तिचा सामना करण्याची पूर्वतयारी आपली असली पाहिजे, तर नुकसान थोडेफार कमी होऊ शकते.

मागील दुष्काळात आपण होरपळून निघालोत त्याचे परिणाम आजही भोगत आहोत. त्यातच परत एकदा जगावर अल निनोचा प्रभाव जास्त वाढल्याने भारतात कोरडा दुष्काळ पडू शकतो, असे एका विदेशी हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेतील तज्ज्ञांचे भाकीत आहे.

दुष्काळाची सर्वांत जास्त दाहकता आशिया खंडात असेल. त्यामुळे आपल्या देशात चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

कारण आपल्याकडे काही भागात मार्च महिन्यातच पिण्याचे पाणी टँकरने देणे सुरू झालेले आहे. जर येणाऱ्या पावसाळ्यात पाऊस कमी पडला तर खूप मोठ्या संकटांना सर्वांना तोंड द्यावे लागेल.

Drought
Drought : दुष्काळाची परिस्थिती आपणच ओढावून घेतली?

दुष्काळाच्या दाहकतेचे परिणाम

दुष्काळ म्हटलं, की निसर्ग चक्रात बदल होऊन त्याचा विपरीत व दूरगामी परिणाम सर्व सजीवांच्या जीवनावर होत असतो. सर्व सजीवांना जगण्यासाठी लागणारे साधन यांचा तुटवडा निर्माण होतो.

कोरडा दुष्काळ असेल तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाणी कमी होईल. ज्या भागात पाण्याची पातळी अगोदर ३०० फुटांपेक्षा जास्त खोल गेलेली आहे त्यांनी पाणी आणायचे कोठून अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे जंगली प्राणी, पक्षी, किडे हे पाण्यावाचून तडफडून मरतील.

मोठमोठे वृक्ष जळतील, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उभा केलेल्या फळबाग पाण्याअभावी जाळून जातील. पाळीव जनावरांना पाणी व चारा याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहील.

या वर्षी मराठवाड्यात व इतर भागात ज्वारी किंवा इतर चारा पिके कमी घेतलेली आहेत. त्यामुळे चाऱ्याचा मोठा प्रश्‍न उभा राहू शकतो. भाजीपाला, फळं, दूध यांचा मोठा तुटवडा निर्माण होईल. महागाई अजून वाढेल.

मजुरांना रोजगार उपलब्ध होणार नाही व त्यामुळे स्थलांतराचे प्रमाण वाढेल. शहरात वाढलेल्या गर्दीने विविध समस्या निर्माण होतील. एकंदरीत येऊ घातलेल्या कोरड्या दुष्काळामुळे ग्रामीण जीवनावर गंभीर व दूरगामी परिणाम होतील व त्याचे चटके शहरी समुदायाला सुद्धा बसतील.

दुष्काळ पूर्वउपाययोजना

येणाऱ्या दुष्काळाची दाहकता कमी करायची असेल तर आपल्याला आत्तापासूनच उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने कृती देखील करायला हवी. शासन कामाला लागलेलेच आहे त्यासोबतच आपण सुद्धा सर्वांनी पुढील कार्य केले तर दुष्काळ दाहकतेचे चटके कमी बसतील.

पहिली खबरदारी म्हणजे सर्वांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. मराठवाड्यासारख्या अति दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी उन्हाळ पिके घेऊ नयेत. कारण उन्हाळ्यात पिकांना दुप्पट-तिप्पट पाणी लागते ते आपण जमिनीतील उपसून दिल्याने भूगर्भात पाणी राहणार नाही.

जिथे मोठे तलाव, धरणे आहेत अशा भागातील शेतकऱ्यांनी पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी. शेतीला पाणी हे सूक्ष्म सिंचनाद्वारे द्यावे. आपले विहीर, बोअर यांचा उपसा होणार नाही, हेही पाहायला हवे.

कारण जेवढे जमिनी खाली पाणी आहे ते आपल्याला बचत ठेवून येणाऱ्या अडचणीच्या काळात वापरता येईल. येणाऱ्या खरीप हंगामात कमी पाण्यावरील ज्वारी, बाजरी या पिकांचा जास्तीत जास्त पेरा करावा म्हणजे अन्नधान्य व चाऱ्याचा प्रश्‍न सुटेल.

ज्या शेतकऱ्यांनी विहीर-बोअर च्या पाण्यावर ऊस, केळी लागवड केलेली आहे ती कमी करावी. विहीर, बोअरच्या पाण्याची शाश्‍वती नसल्याने ही अधिक पाणी लागणारी पिके घेऊ नयेत. घेतली तर कधी आपल्याला धोका होईल, हे सांगता येत नाही.

Drought
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करण्याची ‘आप’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शासनाने लवकरात लवकर मराठवाडा आणि इतर कमी पर्जन्यमान असलेला तालुका- जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना प्रभावीपणे अंमलबजावणीचे धोरण आखणे गरजेचे आहे. तसेच मनरेगा व इतर योजनांमधून जास्तीत जास्त मृद्संधारणाची कामे हाती घ्यावेत.

त्यामध्ये प्रामुख्याने बांध बंदिस्ती, सलग समतल चर अशी कामे करावेत म्हणजे कमी पाऊस पडला तरी पाणी शेतात आडून राहील व शेतात ओलावा टिकल्याने पीक चांगले येईल. सध्या ज्या तलावात पाणी आहे त्याचा उपसा न करता ते पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करावे.

तसेच जे तलाव व बंधारे कोरडे पडलेले आहेत त्यातील गाळ काढण्यासाठी ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ अभियान याची प्रभावी अंमलबजावणी करावी. म्हणजे कमी पाऊसमान काळातही पाणीसाठा वाढण्यास मदत होईल.

तसेच हलकी, मुरमाड शेती बागायती होईल, यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी. धरण क्षेत्रात गाळपेरा कार्यक्रम राबविणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे गुरांसाठी चारा तयार होईल. चारा पिके व भरडधान्य पिके पेऱ्यावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे.

कारण ही पिके कमी पाण्यावर येतात व अन्नधान्य आणि गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न कमी होईल. वन्यपशू, पक्षी यांच्यासाठी पाणवठे तयार करून पाणी देण्याचे कार्य करावे. सर्व आमदार, खासदार यांचा निधी दुष्काळी कामासाठी उपयोगात आणावा.

या काळात कोणत्याही निवडणुका घेऊन खर्च करू नये. निवडणूक खर्च हा आपत्ती व्यवस्थापन निधी म्हणून वापरात आणावा. दुष्काळी कामांना महत्त्व न देता इतर कामावर जास्त लक्ष केंद्रित करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी.

आपण सर्वांनी मिळून येणाऱ्या संकटाला दोन हात केले तर आपल्याला त्रास होणार नाही. आपणा सर्वांना आतापासून या कामाला लागावे लागेल. राज्यात यापूर्वी अनेकदा दुष्काळ पडला परंतु त्याचे पूर्वनियोजन नसल्याने त्याचे चटके सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना अधिक बसले, हे विसरुन चालणार नाही.

(लेखक शेती-पाणी प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com