Sugarcane Cultivation : मॉन्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा; आडसाली ऊस लागवड खोळंबली

Monsoon Update : मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने याचा नकारात्मक परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. यामुळे रोपांची मागणी ही थंडावली आहे.
Sugarcane Cultivation
Sugarcane CultivationAgrowon

अभिजित डाके/राजकुमार चौगुले

Kolhapur/Sangli : मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारल्याने याचा नकारात्मक परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे. यामुळे रोपांची मागणी ही थंडावली आहे. ऊस लागवड न झाल्यास यंदा दक्षिण महाराष्ट्रात ऊस क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

दक्षिण महाराष्ट्रात आडसाली ऊस लागवड सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यानुसार शेतकरी पूर्व मशागत करून लागवड करण्यासाठी सरी सोडून ठेवतात.

उन्हाळी पाऊस झाल्यानंतर शेतकरी ऊस लागवड करण्याचे नियोजन करत असतो. कृष्णा आणि वारणा नदी काठ आणि विहिरी आणि कूपनलिकांमधील उपलब्ध पाण्यावर ऊस लागवडीचे धाडस शेतकरी करतो. गेल्या पाच वर्षांपासून उन्हाळी पाऊस वेळेत पडत होता.

त्यामुळे शेतकरी रोहिणी नक्षत्र सुरू होण्यापूर्वी ऊस लागवड करायचा. त्यानंतर मॉन्सूनचा पाऊस वेळेत पडत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता.

यंदा शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्यासाठी पूर्व मशागत करून सरी सोडल्या आहेत. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात यंदा उन्हाळी पाऊस अपेक्षित झाला नाही. त्यातच वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्या भागात पाणी आहे, त्या ठिकाणी वीज खंडित होत आहे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Crushing : देशात केवळ १७ कारखान्यांचे ऊस गाळप सुरु

कमी दाबाने वीजपुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी मोटार आणि डीपी जळण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे उभा ऊस वाळू लागला आहे. पावसाचे रोहिणी नक्षत्र कोरडे गेले आहे.

येत्या दोन दिवसांत मृग नक्षत्र सुरू होईल. पण अजून पावसाचा पत्ता नाही. तापमान अजून कमी नाही. लागवड करून अडचणी येणार असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्याचे धाडस केले नाही.

अलीकडच्या काळामध्ये रोपांची अधिक मागणी असते. पाण्याची कमतरता आणि उन्हाळी पावसाची दडी यामुळे ऊस रोपांच्या मागणीतसुद्धा घट झाली असल्याचे ऊस रोपवाटिका मालकांनी सांगितले. मे महिन्याच्या मध्यानंतर ६० टक्के रोपांची विक्री होते, परंतु सध्या रोपांना उठाव नाही.
कैलास माळी, जे. के. ऊस रोपवाटिका, पलूस.
शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्ण तयारी केली आहे. उन्हाळी पाऊस अपेक्षित झाला नसल्याने शेतकरी ऊस लागवडीचे धाडस करत नाहीत. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
विलास जाधव, ऊस विकास अधिकारी, क्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com