
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः महिलांचा शेतीक्षेत्रात सर्वाधिक राबता असला तरी त्यांना निर्णय प्रक्रियेत अपेक्षित स्थान मिळत नाही.
कुटुंब म्हणून शेतीमध्ये पीक निवड (Crop Sellection) आणि व्यवस्थापनात महिलांनाही सहभागी करून घेतल्यास निश्चितच शेतीचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही, असे मत शेतीक्षेत्रात कार्यरत महिलांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सकाळ-ॲग्रोवनच्या वतीने शेतीक्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
सकाळ कार्यालयात बुधवारी (ता.८) पार पडलेल्या या कार्यक्रमाला भंडारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच रामेती प्राचार्य डॉ.अर्चना कडू, कोहळी येथील प्रयोगशील शेतकरी आरती पदमवार, आनंद मळा कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका भावना हस्तक यांची उपस्थिती होती.
‘सकाळ’च्या वतीने विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, मुख्य वितरण व्यवस्थापक विजय वरफडे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अर्चना कडू यांनी ग्रामीण भागात आजही शेती क्षेत्रात महिलांचे अधिक वेळ शेतीत राबतात. परंतु निर्णय प्रक्रियेत मात्र त्यांचा सहभाग फार कमी किंवा शून्य असतो.
पीक निवड, कीड व्यवस्थापन इतकेच काय तर कृषी विभागाच्या वतीने आयोजित शेती विषयक कार्यशाळांमध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. आरती पदमवार (वानखेडे) यांची कोहळी शिवारात शेती आहे.
शेतीची आवड असल्याने आठवड्यातील तीन दिवस शेतीला देत असल्याचे त्यांनी सांगितले. इंडो-इस्राईल पद्धतीने केलेली संत्रा लागवड, त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन त्याच बळावर अनेक स्पेन व इतर देशातील तज्ज्ञांनी बागेला भेट देत केलेले कौतुक असे अनेक बारकावे त्यांनी यावेळी उगडले.
भावना हस्तक यांनी नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर शेतीची आवड असल्याने त्यांनी जामठा नजीक आनंद मळा नावाने कृषी पर्यटन फुलविले. त्याविषयीचा अनुभव कथन त्यांनी केला. त्यांच्या कृषी पर्यटनाची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी खास आदिवासी संस्कृतीला या ठिकाणी साकारण्यात आल्याची माहिती दिली.
सूत्रसंचालन ॲग्रोवनचे सुनील धांडे यांनी केले, तर प्रास्ताविक ॲग्रोवन बातमीदार विनोद इंगोले यांनी केले. यावेळी अमोघ हस्तक, अजय आत्ते, ॲग्रोवनच्या वितरण शाखेचे सहव्यवस्थापक शशांक पावडे या वेळी उपस्थित होते.
महिलांची सर्वच क्षेत्रात झेप घेतली असली तरी शेतीविषयक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. त्याशिवाय शेतीमध्ये अपेक्षित सुधारणा होणे शक्य नाही.
- डॉ.अर्चना कडू,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा
कुटुंबीयांच्या सहकार्यातूनच शेती या आवडीच्या विषयात लक्ष्य देता आले. त्यातूनच इंडो-इस्राईल पद्धतीने संत्रा बाग फुलविली आहे.
बागेचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याने अनेक तज्ज्ञांनी भेट देत पाहणी केली आहे.
- आरती पदमवार (वानखेडे), कोहळी, नागपूर
प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्ती घेत कृषी पर्यटन विकसित केले. त्यात वेगळेपण जपल्याने भेट देणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. यातून वेगळा आनंद मिळतो तसेच रोजगार निर्मितीचा उद्देशही साधला आहे.
- प्रा. भावना हस्तक,
संचालिका, आनंद मळा कृषी पर्यटन केंद्र, खसरमारी नागपूर
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.