सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) पंढरपूर - टेंभुर्णी महामार्गावर भोसे (ता. पंढरपूर) हे दहा हजार लोकसंख्येचे बाजारपेठेचे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतभाऊ पाटील यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वीपासूनच शेती आणि ग्रामविकासामध्ये ते आघाडीवर आहे.
त्यांचे चिरंजीव राजूबापू पाटील आणि आता तिसऱ्या पिढीकडे ॲड. गणेश पाटील यांच्याकडे गावचे सरपंचपद आले आहे. ऊस (Sugarcane), द्राक्षाच्या (Grape Production) एकरी उत्पादनात सरासरीच्या पुढे उत्पादन घेणारे शेतकरीही गावात आहेत. बेदाणा उत्पादनात इथल्या शेतकऱ्यांचे नाव आहे.
विविध विकासकामे
विविध विकासकामांमध्येही गावाची चांगली आघाडी आहे. नळपाणी पुरवठ्यासाठी ५० हजार लिटर, तर सुगावभोसे जवळ २५ हजार लिटर अशा दोन सुसज्ज टाक्या उभारल्या आहेत. दोन सार्वजनिक विहिरी व ५३ ठिकाणी हातपंप आहेत. ग्रामपंचायतीने आरओ प्लान्ट उभारला आहे.
सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे तर प्रमुख चौकांसह महत्त्वाच्या ठिकाणी हायमास्ट दिवे आहेत. विविध भाग तसेच गावठाणात सौरऊर्जेवर चालणारे सुमारे २८ दिवे बसविले आहेत.
आरोग्य स्वच्छता व्यवस्थापन
गावात ३५०० मीटर लांबीची भुयारी गटार योजना राबविली आहे. गावात एकूण १४९६ कुटुंबे आहेत. पैकी जवळपास ९४० कुटुंबांकडील सांडपाणी या योजनेशी जोडले आहे. ५५६ कुटुंबांकडे शोषखड्डे आहेत.
सर्व कुटुंबांना ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी कचराकुंड्यांचे वाटप केले आहे. सार्वजनिक ठिकाणीही कुंड्यांची व्यवस्था आहे. सन २०१७-२०१८ मध्ये स्वच्छ भारत अभियानात गावाने सहभाग घेतला. त्या वर्षी शंभर टक्के शौचालये सुविधांमुळे हागणदारीमुक्त गाव असा सन्मान प्राप्त झाला.
शेती व पूरक व्यवसायात आघाडी
उजनी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी गावशिवारात फिरल्याने खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामांत पाणी गावाला मिळते. गावाचे भौगोलिक क्षेत्र साडेतीन हजार हेक्टर असून, २४१० खातेदार शेतकरी आहेत.
सुमारे २५०० हेक्टर सर्वाधिक ऊस, २४० हेक्टर द्राक्ष, २१० हेक्टरपर्यंत केळी, ६५ हेक्टर डाळिंब व २० हेक्टरपर्यंत सीताफळ यासह पेरू, आंबा, चिकू, पपई, चिंच, बोर, लिंबू आदींचा समावेश आहे. गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यात गाय किंवा म्हैस दिसतेच. गावातील एकूण जनावरांची संख्या ३१ हजारांपर्यंत असावी.
जलसंधारण
शेतीच्या पाण्याची गावाला तशी चिंता नाही. पण उन्हाळ्यात टंचाई भासू नये यासाठी गावाच्या पश्चिम बाजूने जाणाऱ्या पाच किलोमीटर अंतराच्या ओढ्याचे लोकसहभागातून खोली- रुंदीकरण केले. सहा ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. त्याची साठवण क्षमता २२०.५६ सघमी आहे.
गावातील ठळक विकासकामे
-जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीला ‘सिल्व्हर कार्ड’.
-शेतकऱ्यांसाठी सुसज्ज बाजारतळ.
-कुस्तीसाठी भव्य लाल मातीचा आखाडा.
-सर्व जाती-धर्मासाठी सामाईक स्मशानभूमी.
-डिजिटल बोर्ड मुक्त गाव.
-शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत प्रमुख चौक आणि मार्गांवर दहा हजार वृक्षांची लागवड.
-तरुणांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने ११३ व्यापारी गाळ्यांची निर्मिती.
सन्मान
ग्रामपंचायतीचे कार्यालय सुसज्ज, सर्व सोयींनी युक्त आहे. सर्व कामकाज संगणकीकृत आहे. वाय-फाय सुविधा आहे. कार्यालयातील वीज सौरऊर्जेवर तयार होते. या ‘स्मार्ट’ कामकाजामुळेच ग्रामपंचायतीला आयएसओ-९००१- २०१५ हे प्रमाणपत्र मिळाले.
राज्य शासनाचा जिल्हास्तरावरील स्मार्टग्राम, जलयुक्त शिवार आणि तंटामुक्त गाव अभियानात उत्कृष्ट कामगिरी, शिवाय संस्था, संघटनांकडूनही उत्कृष्ट प्रशासन, सरपंच आदी पुरस्कारांनी गावाला सन्मानित करण्यात आले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.