
डॉ. अनिकेत चंदनशिवे, डॉ. भगवान ढाकरे
Tomato Disease Management : राज्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड (Tomato Cultivation) केली जाते. महाराष्ट्रातील हवामान या पिकास पोषक आहे. जमीन, पीक, हवामान, पाणी, खत, तसेच रोग व किडींचे योग्य व्यवस्थापन (Tomato Pest Disease Management) महत्त्वाचे आहे.
टोमॅटोवरील विविध रोगांचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. जेणेकरून दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.
१) रोप कोलमडणे (डॅम्पिंग ऑफ) ः
लक्षणे ः
- हा बुरशीजन्य रोग रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा किंवा पिथियम या बुरशीमुळे होतो.
- रोपवाटिकेत प्रादुर्भाव दिसून येतो.
- बियाणे पेरल्यानंतर गादीवाफ्यावर रोप उगवून जमिनीवर येण्यापूर्वीच रोगाचा प्रादुर्भाव होऊन मरते.
- बियांतून बाहेर येणारा अंकुर कुजतो. रोपाचे मूळ व खोडाचा जमिनीलगतचा भाग कुजतो व रोपे उन्मळून पडते.
व्यवस्थापन ः
- रोपवाटिकेसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
- गादीवाफ्यांना कमी प्रमाणात पाणी नियमित पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी.
- बियाणे जास्त दाट पेरू नये.
- चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करावा.
- प्रति किलो बियाण्यास,
कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
रासायनिक नियंत्रण (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)
- मेटॅलॅक्झिल एम (३१.८ टक्के ई.एस) २.५ ग्रॅम किंवा
- थायोफेनेट मिथिल (३८ टक्के) अधिक कासुगामायसिन (२.२१ टक्के एससी) (संयुक्त) २.५ मिलि किंवा
- कॉपर ऑक्सिक्लोराइड (०.३ टक्का) २.५ ते ३ ग्रॅम
या प्रमाणे प्रति झाड ५० ते १०० मिलि या प्रमाणात आळवणी करावी.
२) भुरी ः
लक्षणे ः
- पानांखाली आणि वरील बाजूस पिठाप्रमाणे पांढऱ्या बुरशीची वाढ झालेली दिसते.
- पाने, फुले, फळांवर पांढऱ्या बुरशीची पावडर डागांच्या स्वरूपात दिसते. अशी पाने कालांतराने पिवळी होऊन वाळतात, गळून जातात.
नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- कार्बेन्डाझिम (७० टक्के) अधिक हेक्साकोनॅझोल (५ टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त) १.५ ग्रॅम किंवा
- थायोफेनेट मिथिल (३८ टक्के) अधिक कासुगामायसीन (२.२१ टक्के एस.सी.) २.६ मिलि
याप्रमाणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
३) पर्णगुच्छ किंवा लीफकर्ल (चुरडा मुरडा) ः
- या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो.
- पाने वेडीवाकडी, बारीक होऊन वरच्या बाजूस वळालेली दिसतात.
- पानांचा रंग फिकक्ट हिरवा पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते. फळे आकाराने लहान राहतात.
- फांद्यांचे गुच्छ किंवा झुपके तयार होतात. झाड खुजे राहून पर्णगुच्छासारखे दिसते.
व्यवस्थापन ः
- विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण रोगावर प्रभावी नियंत्रण मिळविणे अवघड होते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रसशोषक किडींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.
- रोपांचे संरक्षण करण्यासाठी, रोप उगवल्यानंतर ६० ते १०० मेशच्या नायलॉन जाळीने किंवा मच्छरदाणीसारखे पांढरे मलमलचे कापड गादीवाफ्यावर टाकावे.
- रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
४) लवकर येणारा करपा
- रोगाचा प्रसार माती व पाण्यातून होतो. सिंचनाच्या पाण्यातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- पाने पिवळी पडतात. त्यावर तपकिरी व काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात. हे ठिपके झाडाच्या खोड, फांदीवर दिसून येतात.
व्यवस्थापन ः
- लागवडीसाठी निरोगी बियाणे वापरावे.
- पिकाची फेरपालट करावी.
- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास
ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रमाणे चोळावे. त्यानंतर कार्बेन्डाझिम (१५ डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
रासायनिक नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २ ग्रॅम
याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने फवारावे.
- अझॉक्झिस्ट्रॉबीन (२३ टक्के एस.सी.) १ मिलि किंवा
- मॅन्डीप्रोपॅमीड (२३.४ टक्के एससी ०.८ मिलि किंवा
- पायराक्लॉस्ट्रोबीन (२५ टक्के डब्ल्यूजी) ०.५ ग्रॅम किंवा
- थायफ्लूक्झामाइड (२४ टक्के एससी) १ मिलि किंवा
- झायनेब (७५ टक्के डब्ल्यूपी) १.५ ग्रॅम
१० ते १५ दिवसांच्या अंतराने आलटून-पालटून फवारावे.
५) मर रोग ः
-हा रोग फ्युजॅरियम किंवा व्हर्टिसिलियम नावाच्या बुरशीमुळे होतो.
- पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होतो.
- कमी सूर्यप्रकाश आणि २१ ते ३३ अंश सेल्सिअस तापमान पोषक ठरते.
- सुरुवातीला पानाचे देठ गळणे, शिरा रंगहीन होणे ही लक्षणे दिसतात. त्यानंतर झाडाची जुनी खालच्या बाजूची पाने पिवळी पडतात. नवीन पाने तपकरी होऊन कुजतात. त्यामुळे झाडांचा अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी, झाडाची वाढ खुंटते. झाड कोलमडून मरते.
- प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडावर बुरशीचा गुलाबी थर दिसतो.
व्यवस्थापन ः
- पिकाची फेरपालट करावी.
- वांगी, मिरची व बटाटा या पिकांव्यतिरिक्त इतर पिकांची लागवड करावी.
- रोगग्रस्त झाडे, पीक अवशेष गोळा करून नष्ट करावीत.
- नत्रयुक्त खतांचा वापर योग्य प्रमाणात करावा.
- बी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
- निचऱ्याची जमीन निवडावी.
- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी.
- चांगल्या कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करावा.
- लागवडीवेळी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक ५ किलो प्रति हेक्टर प्रमाणे शेणखतात मिसळून जमिनीतून द्यावे.
- पुनर्लागवड करताना रोपांची मुळे ट्रायकोडर्माच्या द्रावणात बुडवून लावावीत.
रासायनिक नियंत्रण ः (प्रमाण ः प्रतिलिटर पाणी)
- थायोफेनेट मिथिल (३८ टक्के) अधिक कासुगामायसिन (२.२१ टक्के एससी) (संयुक्त) २.५ मिलि वाफ्यात ओळीलगत आळवणी करावी.
- कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम
प्रति झाड ५० ते १०० मिलि या प्रमाणे आळवणी करावी.
७) फळसड ः
- रोगकारक बुरशी ः अल्टरनेरिया सोलॅनी
- फळधारणेच्या अवस्थेत प्रादुर्भाव जास्त दिसतो.
- हवेतील वाढलेली आर्द्रता, जास्त तापमान, सतत पाऊस, २४ ते ३० अंश सेल्सिअस तापमान या बाबी रोगाच्या वाढीस पोषक ठरतात.
- फळाच्या वरील बाजूस गोल आकाराचे तपकिरी डाग एकमेकांत वलये असल्यासारखे दिसतात.
- सुरुवातीला डाग लहान आकाराचे दिसतात. नंतर पूर्ण फळांवर पसरतात.
- फळे रंगहीन होते. फळे सडतात.
व्यवस्थापन ः
- झाडांना आधार द्यावा. जेणेकरून फळांचा जमिनीशी संपर्क येणार नाही. सडलेली पाने व फळे गोळा करून नष्ट करावीत.
- पाण्याचा चांगला निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
- पिकांची फेरपालट करावी.
- जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति एक किलो बियाण्यास चोळावे. लागवडीवेळी ट्रायकोडर्मा पावडर एकरी २ किलो प्रमाणे शेणखतात मिसळावी.
रासायनिक नियंत्रण ः (फवारणी ः प्रतिलिटर पाणी)
- कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) अधिक हेक्साकोनॅझोल (५ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त) १ ग्रॅम किंवा
- क्रेसॉक्सिम मिथाईल (१८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५४ टक्के डब्ल्यूपी) १.५ ग्रॅम (संयुक्त)
८) बॅक्टेरियल कँकर (देवी रोग)
- रोगकारक बुरशीचा प्रसार माती व पाण्यातून होतो.
- बुरशीचा प्रसार पावसाचे थेंब आणि सिंचनाच्या पाण्याद्वारे होतो.
- पानांवर, खोडावर तसेच देठावर फिक्कट हिरवे ठिपके दिसतात.
- पाने अर्धवट करपलेली आणि वाकडी दिसतात.
- खोडावर देठावर तपकिरी रेषा दिसतात. खोडाच्या आतील भाग सुरुवातील पिवळा आणि नंतर लालसर होतो.
- फळावर गर्द तपकिरी ते काळे उंचवट्याप्रमाणे खडबडीत डाग दिसतात.
व्यवस्थापन
- पिकांची फेरपालट करावी.
- रोगग्रस्त फांद्या, पाने, फळे तोडून नष्ट करावेत.
रासायनिक नियंत्रण ः
- पेरणीपूर्वी बियाणांवर रासायनिक प्रक्रिया करावी. त्यासाठी
स्ट्रेप्टोमायसीन (५०० पीपीएम) ५०० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून बियाणे त्यात ३० मिनिटे बुडवून ठेवावे. नंतर पेरणी करावी.
- कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन १ ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून २ ते ३ वेळा फवारणी करावी.
डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७९१११५, (भाजीपाला संशोधन संकुल, उद्यानविद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.