Sesame Cultivation : तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे

तिळाची प्रत विशेषतः रंग पांढराशुभ्र राहिल्यामुळे दरही चांगला मिळतो. या पिकाचे सुधारित वाण आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ मिळू शकते.
Sesame Plantation
Sesame PlantationAgrowon

डॉ. भरत मालुंजकर, डॉ. संजीव पाटील

महाराष्ट्रात तिळाचे पीक (Sesame Crop) खरीप, अर्ध रब्बी व उन्हाळी हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात (Kharif Season) मॉन्सूनच्या लहरीपणामुळे नुकसान होत असल्याने शेतकरी उन्हाळी हंगामातील पिकाला प्राधान्य देतात.

तसेच या तिळाची प्रत (Sesame Quality) विशेषतः रंग पांढराशुभ्र राहिल्यामुळे दरही चांगला मिळतो. या पिकाचे सुधारित वाण (Sesame Verity आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात नक्कीच वाढ मिळू शकते.

तीळ हे प्राचीन काळापासूनचे महत्त्वाचे तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. तिळाच्या बियाण्यात सर्वसाधारणपणे तेलाचे प्रमाण ५० टक्के, तर प्रथिने २५ टक्क्यांपर्यंत असतात.

तिळाच्या तेलामध्ये असलेल्या सिसमालीन, सिसमॉल यांसारख्या विशेष घटकांमुळे ते दीर्घकाळ टिकते, खवट होत नाही. तिळाचे तेल अनेक औषधी गुणांनी उपयुक्त आहे.

पेंडीत प्रथिने ३५ ते ४५ टक्के आणि कॅल्शिअम, फॉस्फरस यांसारखे खनिज पदार्थ मुबलक प्रमाणात असल्याने कोंबडी व पशुखाद्यासाठी उत्तम ठरते.

Sesame Plantation
Farmer Planning: शेतकरी नियोजन पीक : केळी

हवामान :

तीळ हे अत्यंत नाजूक व संवेदनशील पीक आहे. तापमान, सूर्यप्रकाश आणि पावसाचे वितरण यांचा पीकवाढीवर परिणाम होतो. उगवणीनंतर किमान १५ अंश सेल्सिअस, कायिक वाढीसाठी २१ ते २६ अंश से., तर फूल व फुलधारणा काळात २६ -३२ अंश से. तापमान आवश्यक आहे.

तापमान ४० अंश से.च्या वर गेल्यास फुलगळ होते. पीक फुलांवर असताना अतिपावसामुळे फुलांची गळ होते.

वाणांनुसार फुलधारणेची सुरुवात प्रकाशाच्या कालावधीला संवेदनशील असते. प्रकाशाचा कालावधी जास्त असल्यास बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढते, तर प्रथिनांचे कमी होते.

जमीन :

मध्यम ते भारी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. वालुकामय पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास हे पीक चांगले येते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.० इतका असावा. आम्लयुक्त, क्षारपड, जमीन लागवडीसाठी निवडू नयेत.

मशागत :

तिळाचे बी बारीक असते, तर सुरुवातीची वाढ हळू होते म्हणून जमीन भुसभुशीत करून घट्ट दाबून घ्यावी. त्यासाठी खोल नांगरट केल्यानंतर कुळवाच्या साह्याने जमीन भुसभुशीत करावी किंवा रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन तयार करावी.

त्यानंतर पेरणीपूर्वी जमिनीवर लाकडी फळी फिरवून जमीन दाबून सपाट करून घ्यावी, म्हणजे उगवण चांगली होण्यास मदत होईल.

सुधारित जाती :

हे पीक हवामानातील विविध घटकांस अतिशय संवेदनशील असल्यामुळे विभाग व हंगामनिहाय शिफारशीत वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी. उन्हाळी तिळासाठी फुले पूर्णा, ए.के.टी.- १०१ या वाणांची लागवड करावी.

शिफारशीत वाण : वैशिष्ट्ये

नाव --- पक्वता कालावधी--- दाण्याचा रंग --- रोग प्रतिकारक क्षमता --- तेलाचे प्रमाण --- उत्पादन

जे.एल.टी -४०८-२ (फुले पूर्णा ) --- ८४-९७ दिवस --- पांढरा --- मूळ व खोड कुजव्या रोगास साधारण प्रतिकारक --- ४९ टक्के --- ७ ते ८ क्विंटल

ए.के.टी. १०१ --- ९०-९५ दिवस --- पांढरा --- पर्णगुच्छ, मूळ व खोडकुजव्या रोगास सर्वसाधारण प्रतिकारक --- ४८-४९ टक्के --- ७.५ ते ८ क्विंटल

Sesame Plantation
Farmers Planning शेतकरी नियोजन: हळद

बियाणे :

तीळ पेरणीसाठी २.५ ते ३.० किलो प्रति हेक्टर उत्तम प्रतिचे बियाणे वापरावे. पाभरीने पेरणी करण्यासाठी बियाण्यात बारीक वाळू/

चाळून घेतलेले शेणखत /गांडूळ खत किंवा वाळलेल्या गोवऱ्या कुटून बारीक पावडर तयार करून घ्यावी. कुटलेल्या गोवऱ्यांची पावडर चाळणीने गाळून घ्यावी. साधारणपणे १ किलो बियाण्यासाठी ५ किलो गोवऱ्या कुटलेली पावडर एकत्रित करून पेरणीसाठी वापरावे.

बीजप्रक्रिया :

बियाण्यापासून व जमिनीमधून बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम ४ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर पेरणीपूर्वी अॅझोटोबॅक्टर + पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रति किलो प्रत्येकी याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणी ः

उन्हाळी तीळ पिकाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करावी. पेरणी शक्यतो बैल पाभरीने ३० बाय १५ सें.मी. किंवा ४५ बाय १० सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे २.५ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे जास्त खोलवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो.

विरळणी :

पेरणीनंतर ८-१० दिवसांनी पहिली विरळणी, तर दुसरी १५-२० दिवसांनी करावी. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या २.२२ लाख प्रति हेक्टर इतकी ठेवावी.

त्यासाठी ४५ सें.मी. अंतरावर पेरणी केलेली असेल तर दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवावे तर ३० सें.मी. अंतरावर पेरणी केलेली असेल तर दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. इतके ठेवून विरळणी करावी.

खत व्यवस्थापन :

अ) सेंद्रिय खत ः तीळ पिकास चांगले कुजलेले शेणखत ५ टन प्रति हेक्टरी द्यावे किंवा एरंडी पेंड १ टन प्रति हेक्टरी शेवटच्या कुळवणी अगोदर जमिनीत मिसळून द्यावे.

ब) रासायनिक खते :

तीळ पिकास नत्र ५० किलो प्रति हेक्टर द्यावे. नत्राची अर्धी मात्रा २५ किलो (५४ किलो युरिया) पेरणी करताना द्यावा जर उर्वरित अर्धी मात्रा पेरणीनंतर २१ दिवसांनी द्यावी. नत्राची दुसरी मात्रा दिल्यानंतर पिकास पाणी द्यावे.

अधिक उत्पादनासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना युरिया (२ टक्के) म्हणजेच युरिया २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

Sesame Plantation
Fertilizer Planning कटेकोर करण्याच्या Agriculture Commissioner च्या सूचना | Agrowon

आंतरमशागत :

तिळाचे पीक सुरुवातीला फार हळू वाढते. रोपावस्थेत हे पीक अत्यंत नाजूक असून पिकाबरोबर वाढणाऱ्या तणांबरोबर पाणी, अन्नद्रव्यासाठी स्पर्धाक्षम असते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तण नियंत्रण करणे आवश्यक आहे.

त्यासाठी पेरणीनंतर १५ -२० दिवसांनी पहिली कोळपणी व निंदणी करावी. तर ३०-३५ दिवसांनी दुसरी कोळपणी करावी. गरजेनुसार निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

तीळ पिकाची मुळे ही तंतुमय प्रकारची असून, जमिनीच्या वरच्या थरात वाढतात. त्यामुळे आंतरमशागतीमुळे मुळांना इजा पोहोचू शकते. ते टाळण्यासाठी पीक लहान असतानाच आंतरमशागत करावी.

पाणी व्यवस्थापन : तीळ पीक पाण्यासाठी फारच संवेदनशील आहे. तिळाचे पीक हे पाण्याचा ताण सहन करणारे असले तरी उन्हाळी हंगामात पाण्याचा ताण पडू देऊ नये. पीक उगवणीसाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे.

जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकास फुले येण्याच्या तसेच बोंडे धरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडू देऊ नये. तीळ पिकास उन्हाळी हंगामामध्ये पाण्याच्या ५ -६ पाळ्या द्याव्यात.

पीक संरक्षण :

अ) कीड ः यावर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी अळी, व गादमाशी तसेच रसशोषक किडी, तुडतुडे, कोळी, पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीच्या बंदोबस्तासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी

निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ ते ४ मिलि.

क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २ मिलि

पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.

ब) रोग -

प्रामुख्याने पर्णगुच्छ, मर, खोड व मूळकुजव्या, भुरी हे रोग आढळून येतात.

रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.

रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम.

भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, गंधक २.५ ग्रॅम.

रोगग्रस्त झाडे अथवा भाग गोळा करून नष्ट करावा.

काढणी व मळणी ः

पीक पक्व झाल्यावर बियाण्याची गळ होऊ नये म्हणून ७५ टक्के बोंडे, पाने पिवळसर दिसू लागल्यावर पिकाची कापणी करावी. कापणी झाल्यावर पेंड्या बांधाव्यात.

बांधलेल्या पेंड्या शक्यतो शेतात ताडपत्रीवर किंवा खळ्यावर ५ ते ६ पेंड्यांची खोपडी करून उन्हात चांगल्या वाळू द्याव्यात. त्यानंतर पेंड्या ताडपत्रीवर उलट्या करून बियाण्यांची झटकणी करावी. नंतर बियाणे उफणणी करून स्वच्छ करावेत. चांगले वाळवून साठवावे.

उत्पादन :

सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास उन्हाळी तिळापासून ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

लेखक - डॉ. भरत मालुंजकर, ९४०४०४९७११ (तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com