Vineyard Management : बदलत्या वातावरणाचे मण्यांवर होणारे परिणाम

Grape Management: येत्या आठवड्यात दिवसा जास्त गरम व रात्री जास्त थंडी अशी परिस्थिती राहणार नाही. यामुळे द्राक्ष बागेमध्ये सध्या मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेनंतर कोणत्या अडचणी येऊ शकतात, याची माहिती घेऊ.
Grape Rate
Grape RateAgrowon

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. शब्बीर अहमद

Climate Effect On Grape गेल्या आठवड्यात द्राक्ष विभागात (Grape Region) दिवसाच्या तापमानात (Temperature) वाढ झाली होती, तसेच रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याची स्थिती होती. हवेतील आर्द्रता (Humidity) कमी होऊन, वारेसुद्धा वाहताना दिसून आले.

येत्या आठवड्याचा विचार करता तापमानात वाढ होऊन आर्द्रता कमी आणखी होईल. तसेच बागेतील वाऱ्याचा वेगही वाढेल. येत्या आठवड्यात दिवसा जास्त गरम व रात्री जास्त थंडी अशी परिस्थिती राहणार नाही.

यामुळे द्राक्ष बागेमध्ये (Vineyard) सध्या मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेनंतर कोणत्या अडचणी येऊ शकतात, याची माहिती घेऊ.

मणी डागाळणे

मण्यात पाणी उतरण्याच्या कालावधीमध्ये किमान व कमाल तापमान कमी असते. यामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग पाहिजे तसा नसतो. त्यानंतर जसजसे तापमान वाढते, तसे घडामध्ये पाणी उतरण्याची अवस्था जवळ येते. या वेळी घडाच्या विकासात आवश्यक असलेला कालावधी कमी पडतो व त्यामुळे मण्याचा आकार कमी राहतो.

आपल्या हातात जो काही वेळ आहे, त्या वेळेमध्ये मण्याचा आकार जलद रितीने वाढावा, यासाठी बागायतदार वेगवेगळ्या प्रकारच्या संजीवकांचा वापर करतात. वाढत्या तापमानात मिलीबगसारख्या किडींचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असल्यामुळे सुद्धा विविध किडनाशकांची फवारणी केली जाते.

Grape Rate
Vineyard Management : कमी तापमानामुळे बागेत उद्‍भविणाऱ्या समस्या

यामुळे पाणी उतरण्याच्या आधीच्या अवस्थेत मण्याच्या पेशींवर या वेगवेगळ्या फवारणीचा मारा बसून जखम होते. त्या वेळी तापमान कमी (३० अंशापर्यंत) असल्यामुळे व बागेत साधारण आर्द्रता (४० ते ५० टक्के) असल्यामुळे या जखमा दिसत नाहीत.

मात्र उन्हे वाढत असताना तापमान वाढून आर्द्रता कमी होईल. त्यामुळे वातावरण कोरडे झाल्यामुळे मण्यावर झालेल्या जखमांचे रूपांतर मण्यावर चट्ट्याच्या स्वरूपात दिसून येते. बागेत जर कॅनोपी कमी असेल, वारे वाहत असेल व तापमानात अचानक वाढ झालेली असल्यास हे लवकर दिसून येते.

यावर उपाययोजना फारशा नाहीत. मात्र बागेत पाणी पुरेसे असेल, द्राक्ष घड कॅनॉपीमध्ये झाकून राहील व बागेत पुरेशी आर्द्रता निर्माण होईल याची काळजी घेतल्यास पुढील काळात येणारे मण्यावरील चट्टे टाळता येतील. बऱ्याच वेळा बागायतदारांना संजीवकांची फवारणी केल्यामुळे चट्टे कमी होतील, असे सल्ले दिले जातात. मात्र याला बळी पडू नये.

Grape Rate
Vineyard Management : वाढत्या तापमानात द्राक्षघडांचा विकास

मण्यांचा सुकवा

द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर वेलीवर घडांची संख्या जास्त असेल. आपण आपल्या उद्देशानुसार यापैकी एकसारख्या आकाराचे, सशक्त असे मोजकेच द्राक्षघड राखतो. बाकीच्या घडांची विरळणी करतो.

यानंतर घडाच्या विकासामध्ये आवश्यक असलेल्या अन्नद्रव्ये व पाण्याचा वापर करून सोर्स आणि सिंकचे संतुलन टिकवतो.

घडाच्या विकासासाठी आवश्यक तितक्याच अन्नद्रव्यांची मात्रा देणे व ते त्या वेलीच्या मुळांमध्ये उचलून घेण्याची क्षमता असणे आणि त्यासोबत त्या अन्नद्रव्याचा पुरेपूर उपयोग होऊन द्राक्षघडाचा विकास होणे म्हणजेच सोर्स सिंक संबंध मजबूत होणे होय.

बऱ्याचदा ही परिस्थिती व्यवस्थित असल्यास फळकाढणीपर्यंत द्राक्ष घडाचा तजेलदारपणा टिकून राहतो. मात्र बागेत अचानक तापमान वाढले असल्यास वेलीची अन्नद्रव्याची व पाण्याची गरज आणि त्यांची उपलब्धता यामध्ये ताळमेळ बसत नाही.

Grape Rate
Vineyard Management : वाढत्या तापमानामुळे उद्‍भविणाऱ्या समस्या

पुरवठा कमी पडल्यामुळे अचानक वेलीवर ताण पडतो. त्याचा परिणाम घडाच्या सुकव्यामध्ये दिसून येतो. आपण बागेत नियोजनाप्रमाणे नियमित पाणी देत असलो तरी वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे हा पुरवठा कमी पडतो.

यामुळेही घडाचा सुकवा दिसून येतो. दुसऱ्या परिस्थितीत वेलीवर जर घडाची संख्या गरजेपेक्षा किंवा वेलीने सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त राखल्यास तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे पाण्याची उपलब्धता व पुरवठा याचा समतोल बिघडतो.

फळकाढणीच्या आधी आठ ते दहा दिवस बागायतदार मण्यात गोडी चांगली येण्याच्या उद्देशाने पाण्याचा पुरवठा कमी करतात. वाढत्या तापमानामुळे वेलीच्या पानांद्वारे बाष्पीभवनाने पाणी जास्त निघून जाते. वेलीची पाण्याची गरज तितकीच वाढते. अशा परिस्थितीत सुकवा सहज येताना दिसून येईल.

Grape Rate
Vineyard Management : द्राक्ष मण्यात कमी साखर येण्याची कारणे व उपाययोजना

उपाययोजना ः

फळकाढणीपर्यंत पाण्याचा वापर करताना जमीन वाफसा स्थितीत राहील, असे नियोजन करावे.

बागेत पाणी कमी असल्यास बोदावर मल्चिंग करून फायद्याचे ठरेल.

पाणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी द्यावे.

बागेत कुठेतरी एखादा घड सुकताना दिसून आल्यास मुळाच्या कक्षेत पाणी आहे की नाही, याची खात्री करावी. त्यानुसार पाणी द्यावे.

त्यासोबत कॅल्शिअम २ किलो व मॅग्नेशिअम ३ किलो प्रति एकर या प्रमाणेत वापरही करता येईल.

०-४०-३७ हे खत एक ते सव्वा किलो प्रति एकर या प्रमाणे चार ते पाच वेळी ड्रीपद्वारे द्यावे.

मण्यांचे देठ काळे पळणे

द्राक्ष बागेत मण्यात पाणी उतरतेवेळी बागायतदार एकतर मोकळे पाणी देतात किंवा पाण्याची मात्रा वाढवतात. या वेळी बागेत अचानक आर्द्रतेचे प्रमाण वाढते. वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढण्याचीही परिस्थिती निर्माण होते.

जमिनीत पाणी जास्त प्रमाणात दिल्यामुळे वेलीची मुळे ही कार्य करू लागते. अन्नद्रव्ये उचलण्याची प्रक्रिया वाढून घडाच्या विकासाकडे जाते. जर नुकतेच पाणी उतरलेले असल्यास घडाचा विकास जलद गतीने होताना दिसून येतो.

याचाच अर्थ मण्याची जाडी वाढलेली दिसते. मात्र मण्यात पाणी उतरून साधारणतः वीस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस असल्यास मण्याच्या पेशी जुन्या झालेल्याअसतात. जास्त पाणी दिल्यानंतर ते शोषून घेण्याची क्षमता त्यांची तितकी नसते.

त्यावेळी वेलीवर अचानक दाब निर्माण होतो. या पू्र्वीच्या अवस्थेत नियंत्रणात असलेल्या डाऊनी मिल्ड्यूचे बीजाणू आता आर्द्रता वाढल्यामुळे पुन्हा सक्रीय होतात. घड एकसारखा हिरवा राहावा, यासाठी आपण कॅनॉपीच्या आत घेतो.

वर शेडनेटही टाकतो किंवा घड पेपरने झाकून सावली निर्माण करतो. नेमक्या या अवस्थेत असलेल्या बागेतच मण्याचे देठ काळे पडल्याचे दिसून येते. याचाच अर्थ एकतर डाऊनी मिल्ड्यूचा झालेला प्रसार किंवा वातावरणात अचानक बदल या गोष्टीमुळे देठ काळे पडताना दिसून येतात.

उपाययोजना ः

फळकाढणीच्या जवळपास असलेल्या कालावधीतील बागेत फारशा उपाययोजना नसल्या तरी जैविक नियंत्रण हा महत्त्वाचा पर्याय ठरतो. तेव्हा ट्रायकोडर्मा, बॅसिलस स्युडोमोनास इ. ची फक्त फवारणी फायद्याची ठरेल.

जमिनीतील मुळे काळी पडलेली असल्यामुळे यावेळी जमिनीतून ट्रायकोडर्मा देण्याची फारशी आवश्यकता नाही.

मांजरी वाईनगार्ड २ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार ते पाच फवारण्या एक दिवसाआड कराव्यात. फवारणी शक्यतो सायंकाळी सहानंतर केल्यास परिणाम चांगले मिळण्याची शक्यता वाढेल.

डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८

(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com