
Jalgaon News : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात (Jalgaon District Cooperative Milk Producers Union) दोन्ही काँग्रेस व ठाकरे गटाची सत्ता उलथावल्यानंतर राजकारण पेटले आहे. संघाचे अध्यक्ष मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी खडसे परिवाराचा उल्लेख करीत दूध संघात अपहार करण्यात आला.
याबाबत लवकरच पोलिसात फिर्याद दिली जाईल, असेही म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी चौकशी होऊन जाऊ द्या, असे सांगून चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात शिवसेना नेत्यांची नुकतीच दूध संघाचे अध्यक्ष चव्हाण यांनी भेट घेतली. या वेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
चव्हाण म्हणाले, दूध संघात अतिरिक्त कर्मचारी घेण्यात आले. हे कर्मचारी काही नेत्यांकडे काम करीत होते. कुणी चालक म्हणून काम करायचे तर कुणाला इतर कामांत संबंधित नेत्यांनी गुंतविले होते.
दूध संघाचा उत्पादन खर्च कमी करायचा आहे व दूध उत्पादकांना अधिकाधिक लाभ द्यायचा आहे. त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी कपात करण्यात आली आहे. तसेच वित्तीय बाबी, गत काळातील व्यवहार, अभिलेख्यांची तपासणी सुरू आहे.
त्यात ज्या तक्रारी दूध संघातील अपहारासंबंधी प्राप्त झाल्या होत्या, त्यामध्ये तथ्यही दिसत आहे. याबाबत लवकरच पुरावे, सर्व माहिती सादर केली जाईल.
तसेच मी स्वतः पोलिसात फिर्याद देईल. यात कोण दोषी असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता, दूध संघातील अपहारांमध्ये खडसे परिवार आहे. इतर कोण असू शकते, असाही मिश्किल प्रश्न त्यांनी केला.
त्यावर पत्रकारांनी खडसे यांच्याशी संवाद साधला असता, आरोप होतच आहेत. ज्याची चौकशी करायची आहे, ती होऊन जाऊ द्या. पाहू काय होते, असाही प्रतिसवाल खडसे यांनी केला.
दूध संघात सत्तांतर झाल्यानंतर चव्हाण यांनी पुन्हा अपहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे राजकारण तापले असून, खडसे - चव्हाण यांच्यात जुंपल्याचे दिसत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.