निशिगंधाची लागवड कशी करावी?

कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय आहे, तेथे याची लागवड फायदेशीर ठरते.
Tuberose Cultivation
Tuberose CultivationAgrowon

निशिगंधाची (Tuberose) फुले पांढरीशुभ्र असून सुवासिक असल्याने फुले वेणी, गजरा, पुष्पहार, फुलांच्या माळा किंवा फुलदांडे, फुलदाणी व पुष्पगुच्छ करण्यासाठी वापरले जातात. निशिगंध फुलांपासून ०.०८ ते ०.११ टक्का सुगंधी द्रव्य मिळते. निशिगंध पिकास उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. कोरड्या हवामानात जेथे पाण्याची बारमाही सोय आहे, तेथे याची लागवड फायदेशीर ठरते. अति थंड हवामान व अति पाऊस या पिकास हानिकारक आहे.

Tuberose Cultivation
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला निशिगंध 

) पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन चांगली मानवते. जमिनीचा सामू साधारणपणे ६.५ ते ८ च्या दरम्यान असावा. हलक्या जमिनीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा किंवा लागवडीपूर्वी हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ते जमिनीत कुजण्यासाठी गाडावे.
२) हे पीक बहुवर्षीय असून एकदा लागवड केल्यास त्या जमिनीत सतत तीन वर्षे ठेवता येते किंवा प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते.लागवडीसाठी २० ते ३० ग्रॅम किंवा त्याहून अधिक वजनाचे कंद वापरावेत. हे कंद ०.२ टक्का तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशक द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून लागवडीस वापरावे.
३) सपाट वाफे किंवा गादीवाफ्यावर ३० × ३० सेंटिमीटर अंतरावर ५ ते ७ सेंटिमीटर खोलीवर लागवड करावी. एका ठिकाणी एकच कंद लावावा. हेक्‍टरी ७० ते ८० हजार कंद पुरेसे होतात.
४) हेक्‍टरी ४० ते ५० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, ३०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद आणि ३०० किलो पालाश द्यावे. लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत चांगले मिसळावे. लागवडीच्या वेळी ६० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. उरलेले २४० किलो नत्र तीन समान भागात लागवडीनंतर ३०, ६० आणि ९० दिवसांनी द्यावे.

Tuberose Cultivation
Sugar Export: श्रीलंकेतून भारतीय साखर, गहू पीठ, तांदळाला मागणी घटली

५) लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी १० किलो ॲझोटोबॅक्‍टर किंवा ॲझोस्पिरिलम १०० किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे स्फुरद विरघळणारे जिवाणू खत आणि ट्रायकोडर्मा प्रत्येकी दहा किलो १०० किलो ओलसर शेणखतात वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्‍टर क्षेत्रास मिसळून द्यावे.
६) कंद लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. हिवाळ्यात आठ ते दहा दिवसांनी, तर उन्हाळ्यात पाच ते सहा दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे नियमित पाणी द्यावे. फुलांचे दांडे येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमितपणे पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो.

Tuberose Cultivation
देशातील नारळ तेल उद्योगाला दिलासा?

निशिगंधाचे प्रकार आणि जाती ः
फुलांच्या पाकळ्यांची संख्या व पानांच्या रंगानुसार सिंगल, डबल, सेमीडबल, व्हेरीगेटेड असे चार प्रकार आहेत.
सिंगल प्रकार ः स्थानिक सिंगल, अर्का शृंगार, अर्का प्रज्वल, फुले रजनी.
डबल प्रकार ः स्थानिक डबल, सुवासिनी, वैभव, फुले रजत.
व्हेरीगेटेड प्रकार ः सुवर्णरेखा, रजत रेखा, सिक्किम लोकल आणि स्थानिक जाती.

फुलांची काढणी ः
१) लागवडीनंतर तीन ते चार महिन्यांनी फुले काढणीस योग्य होतात. पूर्ण वाढ झालेल्या कळ्या आणि उमललेल्या फुलांची काढणी नेहमी सकाळी पाच ते आठ किंवा संध्याकाळी सहा ते सात वाजता करावी.
२) फुलदाणीत किंवा पुष्पगुच्छ यासाठी सर्वांत खालची दोन-तीन फुले असतात. उमलत असलेले फुलदांडे जमिनीलगत पानाच्या वरील बाजूस छाटावेत. अशा अशा छाटलेल्या फुलदांड्यांच्या एक डझनच्या जोड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून बांबू किंवा कागदामध्ये भरून लांबच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावी.
३) साधारण हेक्‍टरी ८ ते १० लाख फुले मिळतात, तर सुक्‍या फुलांचे
उत्पादन हेक्‍टरी सात ते आठ टन मिळते. सुट्ट्या फुलांना भारतीय बाजारपेठेत भरपूर व नियमित मागणी असल्यामुळे अशी फुले बाजारपेठेत ५ ते ७ किलो क्षमतेच्या बांबू किंवा कागदाच्या बॉक्समध्ये भरून बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत. सुट्या फुलांपासून गुलछडी अर्क हे सुगंधी द्रव्य ०.०८ ते ०.११ टक्का काढता येते. यास परदेशातून चांगली मागणी आहे.
-
संपर्क ः ०२०-२५६९६७५०
(विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेश खिंड, पुणे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com