
डॉ.जी.एस.सोनवणे, डॉ.व्ही.एम.साळुंके,डॉ.आर.आर.शेलार
Buffalo Management Update : तापमान आणि हवामानातील बदलामुळे, बहुतेक दूध देणाऱ्या जनावरांच्यामध्ये उष्णतेच्या ताणाचा परिणाम होतो, अशा स्थितीमध्ये ते अंतर्गत उष्णता पुरेशा प्रमाणात विसर्जित करू शकत नाहीत.
उष्णतेचा ताणतणाव हा रक्तातील घटक, पुनरुत्पादन कार्यक्षमतेवर आणि दुधाचे उत्पन्न आणि त्याची गुणधर्म यावर नकारात्मक परिणाम करतो. जास्तीच्या उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांच्या आहारात अँटिऑक्सिडेंट पदार्थ समाविष्ट करून, आहारातील तंतुमय आणि प्रथिनांच्या घटकांमध्ये तसेच व्यवस्थापनात बदल करावा लागतो.
सामान्यतः म्हशी उष्णतेच्या ताणास संवेदनशील असतात, कारण त्वचेचा काळा रंग अधिक सौर किरणे शोषून घेतो. शरीरावर विरळ केसांचा थर, जो उच्च तापमानापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अपुरा ठरतो. म्हशीच्या त्वचेमध्ये देशी गाईपेक्षा कमी (जवळपास १/६) घाम ग्रंथी असतात, ज्या त्वचेच्या खोलवर असतात, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग संथ होतो. यामुळे शरीरातील तापमान वाढीस मदत होते.
म्हशीची शारीरिक रचना आणि असाधारण वैशिष्ट्यांमुळे इतर जनावरांपेक्षा अल्प तापमान नियंत्रक बनतात. ज्यामुळे शरीरातील अंतर्गत उष्णता वाढते, खाद्य सेवन, उत्पादकता तसेच पुनरुत्पादन कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात दुधाची टंचाई निर्माण होते. रेडकू पावसाळा आणि हिवाळ्यात जन्मतात.
उष्णतेच्या ताणावर नैसर्गिक संरक्षण यंत्रणा:
१) म्हशीत काळी त्वचा असते. यामध्ये असंख्य मेलेनिन रंगद्रव्य असतात, जे सूर्यप्रकाशातील अतिनील किरण घटकांपासून संरक्षण देतात. उष्ण कटिबंधातील विशिष्ट उष्ण हवामानात अतिनील किरणांचे प्रमाण थोडे जास्त असते.
२) म्हशीच्या त्वचेच्या बाहेरील अंगात सेबेशियस ग्रंथी चांगल्या प्रकारे विकसित असतात. त्यांच्या तेलकट स्रावांमुळे त्वचा पाणी आणि चिखलासाठी निसरडी बनते. या ग्रंथी सूर्यकिरणांना अधिक प्रभावीपणे परावर्तित करण्यासाठी उन्हाळ्यात त्वचेतील तेल स्राव अधिक तेजस्वी बनवतात.
३) उन्हाळ्यात म्हशी चिखलात लोळतात, ही बाष्पीभवनापेक्षा अधिक प्रभावी उष्णतेच्या ऱ्हासाची प्रक्रिया आहे. यामुळे उच्च उष्णता, आर्द्रतेच्या तणावाखाली उष्णता कमी करण्याची प्रमुख यंत्रणा म्हणून काम करते.
४) सामान्यत: म्हशींची त्वचा काळी असते. त्यावर अतिशय विरळ घामाच्या ग्रंथी असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या तणावाच्या नकारात्मक प्रभावांना तोंड देण्यासाठी घामापेक्षा पाण्यात डुंबणे किंवा चिखलात लोळणे म्हशी पसंत करतात.
जास्त तापमानाचे दुष्परिणाम:
१) जास्त उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे म्हशींमधील जैविक कार्यामध्ये बदल होतात. खाद्य कमी खातात.आहाराची कार्यक्षमता आणि त्याचा वापर, पाणी, प्रथिने, ऊर्जा आणि खनिज संतुलन, एंझाइमॅटिक प्रतिक्रिया, संप्रेकातील बदल, चयापचयातील व्यत्यय तसेच रक्तातील घटक बाधित होतात.
२) दूध उत्पादन आणि गुणवत्ता कमी होते.
३) शरीरातील उष्णतेच्या उत्सर्जनात घट होते. त्यामुळे प्रजननक्षमता बाधित होते.
४) उष्ण हवामानामुळे स्नायू दुखणे, थकवा जाणवतो.
५) उष्माघाताची लक्षणे दिसतात. शरीराच्या उष्णता रोधक प्रणालीमध्ये बिघाड झाल्याने घाम न येता अंतर्गत तापमान वाढते. लगेच उपचार न केल्यास मृत्यू होतो.
उष्णतेचा ताण
१) शुद्ध हरपते. जलद आणि कमकुवत नाडीचे ठोके, जलद उथळ श्वास.
२) हृदयाची गती, श्वसनाचा दर तसेच गुदाशयाच्या तापमानात वाढ.
३) मोठ्या प्रमाणात लाळ गळते.
४) शरीराचे तापमान काहीवेळा ते १०६ ते १०८ अंश फॅरानाईट पर्यंत जाते.
उष्णतेच्या ताणतणावाचे व्यवस्थापन:
१) उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी आणि दूध देणाऱ्या म्हशींमध्ये उच्च उत्पादन पातळी राखण्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
२) उष्माघात हा जीवघेणा असतो. त्यामुळे म्हशीला थंड जागी हलवताना, थंड पाण्याने अंघोळ घालताना किंवा ओल्या पोत्याने गुंडाळताना आणि पंखा लावताना तत्काळ पशुवैद्यकांची मदत घ्यावी.
३) झाड किंवा शेडच्या सावलीत बांधावे. शरीर थंड पाण्याने वारंवार ओले करावे.
४) म्हशीच्या सभोवतालची हवेची हालचाल वाढवावी. उष्ण हवामानात मुबलक थंड, स्वच्छ पाणी उपलब्ध असावे.
५) योग्य आहार व प्रथिने व्यवस्थापन करून ऊर्जेची गरज भागवावी.
६) खनिज चयापचयातील बदल देखील उष्ण हवामानात म्हशीच्या इलेक्ट्रोलाइट स्थितीवर परिणाम करतात. त्यामुळे उष्ण हवामानात खनिजांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.
७) उष्णता सहिष्णुतेसाठी विशिष्ट आनुवंशिक मार्करद्वारे म्हशींची निवड करावी. यामुळे उष्णतेचा ताण सहन करणाऱ्या म्हशींची ओळख होईल.
संपर्क : डॉ.जी.एस.सोनवणे,८७९६४४८७०७, (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ,जि.सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.