
शेतकरी : सुरेश विश्वनाथ पाटील
गाव : बुदिहाळ, ता. निपाणी, जि. बेळगाव
एकूण शेती : अडीच एकर
चारा लागवड : एक एकर
एकूण जनावरे : बारा जनावरे
बेळगाव जिल्ह्यातील बुदिहाळ (ता. निपाणी) येथील सुरेश पाटील यांची अडीच एकर शेती आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून वडील विश्वनाथ यांच्यासोबत शेतात नवनवीन प्रयोग करत एकात्मिक पद्धतीने शेती करत आहेत.
शेतीला शाश्वत उत्पन्नाची जोड म्हणून दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. २००१ मध्ये दोन एचएफ गाईंपासून दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. मात्र दुधाला अपेक्षित दर मिळत नसल्याने गाईंची संख्या कमी करून म्हशींचे संगोपन करण्याचे ठरविले.
त्यासाठी हरियानातून मुऱ्हा जातीच्या ५ म्हशी आणल्या. सध्या त्यांच्याकडे ८ मुऱ्हा म्हशी, ४ रेड्या, एक एचएफ गाय व १ बैल अशी जनावरे आहेत.
जनावरांना मुबलक प्रमाणात दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी एक एकर क्षेत्रावर सुपर नेपिअर या चारा पिकाची लागवड केली आहे. याशिवाय उर्वरित दीड एकरावर आडसाली ऊस लागवड केली आहे.
व्यवस्थापनातील बाबी
- जनावरांसाठी त्यांनी ५० बाय ५० फूट आकाराचा मुक्त संचार गोठा उभारला आहे. यासह बंदिस्त गोठादेखील उभारला आहे.
- गोठ्यामध्येच जनावरांना चाऱ्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी स्वतंत्र गव्हाण बांधली आहे.
- गोठ्यात हवा खेळती राहील याची विशेष काळजी घेतली जाते.
- जनावरांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी गोठ्यामध्ये स्वतंत्र सुविधा केली आहे. त्यासाठी सुमारे १५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे. या टाकीला मुक्त संचार गोठ्यातील पाण्याचा हौद वाॅटर बाॅलच्या साह्याने जोडलेला आहे. त्यामुळे जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध होते.
खाद्य व्यवस्थापन
- जनावरांना हिरवा चारा, वाळलेला चारा आणि मुरघास यांच्यासह पूरक खाद्य दिले जाते.
- हिरव्या चाऱ्यासाठी १ एकरावर नेपिअर गवताची लागवड केली आहे.
- गहू आणि हरभरा भरणीनंतर मिळणारे काड काही ठिकाणी गोळा केले जाते. उर्वरित विकत घेऊन ३० बाय ३० फूट आकाराच्या शेडमध्ये व्यवस्थित भरून घेतले जाते. पावसाच भिजणार नाही अशा पद्धतीने हे काड ठेवले आहे.
- मुरघास तयार करून त्याच्या बॅग भरून ठेवल्या जातात.
- दुभत्या जनावरांना दूध उत्पादनाच्या प्रमाणानुसार सरकी पेंड आणि गोळी पेंड ५०० ग्रॅम प्रति जनावर याप्रमाणे दिली जाते. मोठ्या आणि लहान जनावरांना शरीर पोषणासाठी प्रति जनावर १ किलो खाद्य दिले जाते. मोठ्या जनावरांना खाद्यातून खनिज मिश्रण ५० ग्रॅम आणि मीठ १५ ग्रॅम प्रमाणे दिले जाते.
चारा पिकांची लागवड
- एक एकरात साडेचार फुटी सरी मारून उसाप्रमाणे सुपर नेपिअर या बहुवार्षिक चारा पिकाची लागवड केली आहे.
- योग्य व्यवस्थापनाद्वारे वर्षभरात नेपिअर गवताच्या ४ ते ५ कापण्या केल्या जातात. त्यातून १०० ते ११० टनांपर्यंत हिरवा चारा उपलब्ध होतो.
- याशिवाय उसाचा खोडवा गेल्यानंतर मका पिकांची लागवड केली जाते. मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आल्यानंतर संपूर्ण पिकाची एकाचवेळी कापणी केली जाते. त्यापासून मुरघास बनविला जातो. साधारणपणे १० ते १२ टनांपर्यंत मुरघास वर्षभर हिरव्या व कोरड्या चाऱ्यासोबत जनावरांना खाद्य म्हणून दिला जातो.
नवजात रेड्यांची काळजी
- गाभण म्हशींची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो.
- नवजात रेड्यांना सुरुवातीच्या काळात त्यांच्या वजनाच्या १० टक्के इतक्या प्रमाणात चीक पाजला जातो.
- त्यानंतर दररोज पूरक खाद्याचा पुरवठा केला जातो.
- साधारण १ महिन्यानंतर लहान रेड्यांना हळूहळू चारा खाण्याची सवय लागण्यासाठी चारा दिला जातो.
- सुरुवातीसच्या काळात जंतनाशकाच्या नियमित मात्रा दिल्या जातात.
आरोग्य व्यवस्थापन
- दर चार महिन्यांनी प्रत्येक जनावराला जंतनाशकाची मात्रा दिली जाते.
- वर्षातून दोन वेळा घटसर्प आणि लाळ्या खुरकूतचे लसीकरण केले जाते.
- मुक्त संचार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अत्यंत कमी राहते.
- पिण्याचे शुद्ध पाणी आणि पूरक खाद्याच्या वापरामुळे जनावरे सुदृढ राहण्यास मदत झाली.
- दैनंदिन व्यवस्थापन बाबी
- दररोज सकाळी पहाटे पाच वाजता गोठ्यातील कामांस सुरुवात होते.
- सर्वप्रथम जनावरांना हिरवा चारा ५० टक्के, सुका चारा ३० टक्के आणि मुरघास २० टक्के हे सर्व एकत्रित करून दिले जाते. त्यासोबतच पशुखाद्य आणि खनिज मिश्रणे मिसळून दिली जातात. हे मिश्रण मोठ्या जनावरांना साधारणपणे ३५ ते ४० किलोपर्यंत दिले जाते.
- त्यानंतर गोठ्यातील शेण, मलमूत्र साफ करून गोठ्याची स्वच्छता केली जाते.
- त्यानंतर हाताने दूध काढले जाते. आणि जनावरे मुक्त संचार गोठ्यात सोडली जातात.
- योग्य व्यवस्थापनामुळे जनावरे जास्तीत जास्त दिवस दूध देतात.
- भाकड काळ कमी होण्यासाठी व्यवस्थापनावर अधिक भर दिला जातो.
- सध्या ४ म्हशी दुधावर असून, त्यापासून दोन्ही वेळचे प्रतिदिन ४० ते ५० लिटर दूध उत्पादन मिळते.
- घरगुती रतीबाने ६५ रुपये लिटर प्रमाणे विक्री होते. विशेषतः ग्राहक गोठ्यामध्ये येऊन दूध खरेदी करतात.
- गोठा स्वच्छ केल्यानंतर उपलब्ध होणारे शेण आणि मलमूत्र हे चारा पिकांच्या लागवडीत जाण्याची सोय केलेली आहे. यासह घरगुती इंधनासाठी गोबरगॅसची उभारणी केली आहे.
संपर्क - सुरेश पाटील, ९७४१६२१६५०, (शब्दांकन : राजकुमार चौगुले)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.