
बाजारातून उत्तम प्रतीच्या जनावरांची निवड (Animal Selection) करणे ही एक कला आहे. एक जागरूक पशुपालक (Dairy Farmer) आपल्या गोठ्यातील जनावरे उत्तम पैदास व्यवस्थापनातून तयार करत असतो. आपल्याकडे दूध उत्पादनासाठी (milk production) प्रामुख्याने संकरित आणि देशी गायी आणि म्हशींचे संगोपन केले जाते. ज्या भागात दुग्धव्यवसाय सुरु करायचा आहे तेथील स्थानिक वातावरण लक्षात घेऊनच जनावरांची निवड करावी.
जास्तीत जास्त दुधाळ जनावरे संभाळण्यापेक्षा उत्तम वंशावळीची चांगल्या दुधाचे उत्पादन देणारी जनावरे पाळावीत. दुग्धव्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील जनावरांची निवड करावी. जनावरांचे वय तीन ते चार वर्षे इतके असावे.
दुधाळ जनावरांची निवड तीन गुणांवरून केली जाते, पूर्व नोंदीवरून, बाह्य गुणावरून आणि प्रत्यक्ष दर्शनीय गुणावरून.
कोणत्याही नवीन जनावरांची खरेदी करताना ब्रुसेलोसिस, टी. बी., आय. बी. आर. या रोगांची तपासणी करून घ्यावी. जनावरांची खरेदी करताना त्याची जात आणि दूध देण्याची क्षमता विचारात घ्यावी. जास्त दुधाचे उत्पादन देणे, नियमित माजावर येणे हे गुण गायीच्या आनुवंशिकतेवर आधारलेले असतात. म्हणून गाय, म्हैस निवडताना जातीचा विचार करणे फायद्याचे ठरेल.
जातिवंत दुधाळ गायी, म्हशी निरोगी व तरतरीत दिसतात. दुधाळ गाय किंवा म्हैस शांत आणि कोणालाही धार काढू देणारी असावी. सडातून दूध काढताना चारही सडातून दूध काढून बघावे. जड गायी, म्हशी पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळे दुधही कमी निघते. म्हणून धारेला पिळण्यासाठी हलके असणाऱ्या गायी म्हशीची निवड करावी.
स्वभावाने रागीट असलेल्या गायी-म्हशी उत्तेजित झाल्यावर पान्हा चोरतात. त्यामुळे निवड करताना शांत स्वभाव असणाऱ्या गायी, म्हशींची निवड करावी.
कासेवर अनेक फाटे असणारे शिरांचे जाळ असावे. या शिरा जाड असाव्यात. कासेचे चारही भाग समान असावेत, सड समान अंतरावर सारखेच असावेत. कास पिळल्यानंतर कासेच्या कातडीभोवती सुरकुत्या पडाव्यात. ज्या गायीं, म्हशींची माजावर येण्याची क्षमता उत्तम असते अशी गाय, म्हैस लवकर वयात येऊन गाभण राहते.
डोळे पाणीदार असावेत, अवयवांची ठेवण प्रमाणबद्ध असावी. शरीराचा आकार वरून, मागून- पुढून निरीक्षण केले असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती असावा. वरून पाहिले असता, कमरेची हाडं दूरवर असावीत. बाजूने पाहिले असता शेपटीवरील दोन्ही हाडं आणि कास यामध्ये जास्त अंतर असावे. कंबर रुंद असावी, मागील भागही रुंद असावा. पाय मजबूत असावेत, पुढील पाय सरळ रेषेत, पायाचे खुर चौडे व सपाट असावेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.