
Mango Market नागपूर ः कळमना बाजार समितीत कच्च्या आंब्यांची (कैरी) आवक (Unripe Mango Arrival) वाढती आहे. २५ फेब्रुवारीपासून बाजारात नजीकच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश या भागातून कैरी आवक (Mango Arrival) होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
सरासरी १०० क्विंटलची ही आवक असल्याचे सांगण्यात आले. मात्र ढगाळ वातावरणामुळे (Cloudy Weather) सध्या कैरीला अपेक्षित मागणी नसल्याने दरात चढउतार अनुभवले जात आहेत.
ढगाळ वातावरणाचे मळभ दूर होताच खवय्यांकडून मागणी वाढेल त्यासोबतच विदर्भाच्या आमराईतील कैरीदेखील दाखल होईल, असे सांगण्यात आले.
कळमना बाजारात वर्षभर फळांची आवक राहते. त्यामध्ये कर्नाटकातून येणाऱ्या अननसाचा समावेश आहे. अननसाची रोजची आवक ५०० क्विंटलच्या घरात राहते. याच बाजारातून नंतर विदर्भासह नजीकच्या मध्य प्रदेशात अननसाचा पुरवठा केला जातो. अननसाप्रमाणे इतरही फळांची हंगामी आवक वाढती राहते.
यंदा पोषक वातावरणामुळे आंबा मोहर चांगलाच बहरात होता. परंतु आता ढगाळ वातावरण, पाऊस याचा फटका आंबा बागांना बसण्याची शक्यता आहे. परिणामी, यंदा महाराष्ट्र, विदर्भातून आंब्याची आवक मर्यादित राहिली, असे व्यापारी सांगतात.
अशा स्थितीत सध्या तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश या भागातील कच्चा आंबा बाजारात दाखल होत आहे. २५ फेब्रुवारीपासून बाजारात कच्च्या आंब्याची आवक होण्यास सुरुवात झाली.
ही आवक सरासरी १२० क्विंटलची असून, फेब्रुवारी महिन्यात आंब्याला सुरुवातीला ३००० ते ४००० रुपये असा दर होता.
त्यानंतर हे दर ४५०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. सद्या ३००० ते ३५०० रुपयांप्रमाणे आंब्याला दर मिळत असल्याची माहिती बाजारातील व्यापारी सूत्रांनी दिली. आवक मात्र १०० क्विंटलप्रमाणे स्थिर आहे, येत्या काळात आवक वाढेल, असेही सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.