
अनिल जाधव
पुणेः देशातील शेतकरी सोयाबीन दर वाढीची वाट पाहत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार राहीले. सोयाबीन बाजारात काही घडामोडी घडत गेल्या. त्याचा परिणाम सोयाबीन बाजारावर होत आहे.
सोयाबीन बाजाराचा विचार करता मागील तीन आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार सुरु आहेत. तर देशातील बाजारात सोयाबीन स्थिर होते. नोव्हेंबरमध्ये सोयाबीनने जवळपास ६ हजारांचा टप्पा गाठला होता. मात्र डिसेंबरमध्ये बाजार नरमला. दर सरासरी ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळं शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र मागील तीन आठवड्यांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित दरपातळी झाली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरवाढीसाठी काहीवेळ परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात चीनमध्ये काही शहरांमधील कोरोना निर्बंध शिथिल केल्याने सोयाबीनला मागणी वाढली होती. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात जाणवला होता. तसंच अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादक काही राज्यांमध्ये पावसानं ओढ दिली. त्यामुळं अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन यंदा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. याही घटनेचा सोयाबीन बाजारावर काहीसा परिणाम जाणवला.
मात्र यंदा ब्राझीलमध्ये विक्रमी सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त होतोय. ब्राझीलमध्ये यंदा १ हजार ५२० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे. मात्र ब्राझीलमधील काही भागांमध्येही पाऊस कमी आहे. मात्र युएसडीएने येथील उत्पादनाच्या अंदाजात बदल केले नाहीत. याचा दबाव बाजारावर आला आहे.
दुसरीकडे अमेरिकेने जैवइंधन धोरणात बदल करणार असल्याचं म्हटलंय. मात्र जैवइंधनात सोयातेलाचा वापर वाढवणार की कमी करणार, हे स्पष्ट केले नाही. मात्र यानंतर सोयातेलाचा बाजार तुटला. अमेरिका वापर कमीच करेल हे गृहित धरून बाजाराने प्रतिक्रिया दिली. आता यापेक्षा दर कमी होणार नाहीत. मात्र अमेरिकेने वापर वाढवला तर मात्र सोयातेलाचे दर वाढतील. याचा आधार सोयाबीन बाजारालाही मिळू शकतो.
…………
इंडोनेशियाचे जैवइंधन धोरण
तर इंडोनेशियाने जैवइंधनात पामतेलाचा वापर ३० टक्क्यांवरून ३५ टक्क्यांवर नेण्याचे उद्दीष्ट ठेवले. जानेवारी २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते. असं झाल्यास पामतेलाचे दर वाढतील. पामतेलाचे दर वाढल्यानंतर सोयातेलाचेही दर सुधारू शकतात.
……………
हे घटक उभारी देणार
सोयाबीन बाजारावर परिणाम करणारे घटक बदलत गेले. त्यामुळं सोयाबीन बाजारात चढ उतार झाले. मात्र आता इंडोनेशिया आणि अमेरिकेचे जैवइंधन धोरण, चीनची वाढती मागणी, अर्जेंटीनातील उत्पादन घटण्याचा अंदाज आणि सोयापेंडचे वाढते दर याचा सोयाबीन बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशातील सोयाबीन दरही पुढील काही दिवसांमध्ये काहीशी सुधारणा दाखवू शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.