Cotton, Soybean Rate Update : कापूस, सोयाबीन उभारी घेणार; तुरीतील तेजी कायम राहणार?

यंदा सोयाबीन बाजारात अर्जेंटिनातील उत्पादन घटीमुळे मोठ्या घडामोडी घडल्या. सोयापेंडच्या दरात यामुळे तेजी आली. जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर असला तरी सोयापेंड निर्यात आणि उत्पादनात अर्जेंटिना आघाडीवर आहे.
Soybean Rate Update
Soybean Rate UpdateAgrowon

शेतकरी यंदा नाशीवंत शेतीमाल वगळता नेहमीसारखं लगेच विक्री करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन, कापूस आणि तुरीचा स्टाॅक केला. हरभऱ्याचीही विक्री काही प्रमाणात का होईना अशीच होण्याची शक्यता आहे.

सोयाबीन (Soybean) आणि कापसाचा हंगाम (Cotton Season) सुरू होऊन आता सहा महिने झाले. तूरही बाजारात येऊन तीन महिने होत आहेत. हरभरा आवकेचा (Chana Arrival) दबाव पुढील काही दिवसांमध्ये जास्त वाढेल. शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस दरवाढीच्या आशेने माल मागे ठेवला.

पण मागील दोन महिन्यांपासून दर दबावात आहेत. शेतकऱ्यांनी विक्री वाढवण्यासही त्याला आणखी अनेक घटक कारणीभूत आहेत. तरही अनेक शेतकऱ्यांकडे अजूनही स्टाॅक आहे. त्यामुळे पुढील काळात सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभरा बाजार कसा राहील, त्याचा घेतलाला हा आढावा.

कापूस कशामुळे भाव खाईल?

देशात यंदाही कापसाचे उत्पादन कमीच राहील, हे जवळपास ऑक्टोबरमध्येच स्पष्ट झाले होते. शेतकरी उत्पादकता कमी आल्याचे सांगत होते. पण उद्योगांनी याच काळात विक्रमी उत्पादनाची टिमकी वाजवली.

त्यामुळे बाजार दबावात ठेवण्याचा प्रयत्न झाला. पण मागील हंगामात कापसाचा तुटवडा होता. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १२ हजारांपर्यंत दर पाहायला मिळाले. परंतु हा भाव शेवटच्या टप्प्यात मोजक्या मालाला मिळाला.

पूर्ण हंगामाचा विचार करता प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांना ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळाला होता. गेल्या वर्षीचे भाव बघता यंदा किमान १० हजारांचा भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे शेतकरी सुरुवातीच्या टप्प्यात कापूस विकत नव्हते. पण उद्योगांना कापसाची गरज होती. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कापसाचे भाव ९ हजारांच्याही पुढे गेले.

डिसेंबर आणि जानेवारीतही बाजारातील आवक कमी राहीली. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांनी विक्री वाढवली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सरासरीच्या तुलनेत आवक दुप्पट राहीली.

Soybean Rate Update
Cotton Market : एप्रिलमध्ये कापूस दरात किती वाढ होईल?

याचा दबाव बाजारावर आला. त्यामुळे कापसाच्या सरासरी भावात एक हजार रुपयांपर्यंत घट झाली. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातही बॅंकिंग संकटामुळं मंदी आली होती. पण ही स्थिती जास्त काळ राहणार नाही, असे ‘ॲग्रोवन’ने त्या वेळीच सांगितले होते. तसेच कापसाचे दर वाढतील असाही अंदाज तज्ज्ञांच्या हवाल्याने दिला होता. त्यानुसार चालू आठवड्यात कापसाचे दर वाढल्याचे दिसून आले.

देशात यंदा ३१३ लाख गाठी कापूस उत्पादनाचा सध्याचा अंदाज आहे. त्यात पुढील काळात आणखी कपातही होऊ शकते. आजघडीला जवळपास २०० लाख गाठी कापूस बाजारात आल्याचा अंदाज आहे. म्हणजेच फक्त ११३ लाख गाठी कापूस बाहेर आहे.

हा सर्व कापूस शेतकऱ्यांकडे नाही. व्यापारी, स्टाॅकिस्ट, शेतकरी, जिनिंग आणि खेडा खेरदीवाले छोटे शेतकरी यांच्याकडे हा स्टाॅक आहे. शेतकऱ्यांकडे सध्या केवळ २० ते २५ टक्के कापूस असल्याचं सांगितलं जातं.

यापैकी आणखी काही कापूस पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये बाजारात येईल. त्यानंतर आवक कमी होईल. या काळात उद्योगांना दर वाढवल्याशिवाय कापूस मिळणार नाही. त्यामुळे चालू महिन्यात कापूस दरात सुधारणा दिसेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

कापूस भाववाढीसाठी पोषक घटक

- देशातील घटलेले उत्पादन

- शेतकऱ्यांकडील कमी झालेला स्टाॅक

- येत्या हंगामात कापूस लागवड कमी होण्याचा अंदाज

- आंतरराष्ट्रीय पातळीवरही लागवड घटण्याची शक्यता

- देशातील उद्योगांची वाढलेली क्षमता

- बांगलादेशसह शेजारच्या देशांमधील घटलेले उत्पादन

- देशातील लग्नसराई आणि समारंभामुळे कापडाला उठाव

चालू हंगामातील सरासरी कापूस दर (रुपये प्रति क्विंटल)

महिना…सरासरी दर

ऑक्टोबर…८०००

नोव्हेंबर….८६००

डिसेंबर…८४५०

जानेवारी…८२००

फेब्रुवारी…८१००

मार्च…७८००

सोयाबीन वाढेल की नाही?

यंदा सोयाबीन बाजारात अर्जेंटिनातील उत्पादन घटीमुळे मोठ्या घडामोडी घडल्या. सोयापेंडच्या दरात यामुळे तेजी आली. जगात सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर असला तरी सोयापेंड निर्यात आणि उत्पादनात अर्जेंटिना आघाडीवर आहे. अर्जेंटिनात मागील हंगामात ३४९ लाख टन उत्पादन झाले होते. ते यंदा २५० लाख टनांवर स्थिरावू शकते.

त्यामुळे अर्जेंटिनातून होणारी सोयापेंड निर्यात कमी राहणार आहे. तसेच अर्जेंटिनाला जवळपास १०० लाख टन सोयाबीन आयात करावी लागेल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड तेजीत होते. बॅंकिंग क्षेत्रातील संकटामुळे सोयाबीन आणि सोयापेंड घसरले होते.

पण चालू आठवड्यात दरात सुधारणा होत आहे. ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पण ब्राझील सोयाबीनचे गाळप कमी करते. ब्राझीलमधून थेट सोयाबीनची निर्यात होत असते. त्यामुळं सोयापेंडचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.

तसेच बांगलादेशह भारताच्या शेजारील देशांना ब्राझीलमधून सोयापेंड आयात करण्यात अडचणी असतात. डिलिव्हरी पोहोच होण्यास विलंब होतो. त्यामुळे बांगलादेश, जपान, व्हिएतनाम आदी देश भारताकडूनच सोयापेंड घेत असतात.

Soybean Rate Update
Kabuli Chana Export : काबुली हरभरा निर्यात दुप्पट; भाव टिकून राहणार

भारताचं सोयापेंड महाग असलं तरी त्यांची मागणी असते. अर्जेंटिनातील सोयापेंड उत्पादन घटल्याचा भारताला फायदा मिळत आहे. भारताने चालू हंगामात महिन्याला सरासरी २ लाख टन सोयापेंड निर्यात केल्याचं उद्योगांकडून सांगण्यात आलं.

चालू हंगामात शेतकऱ्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोयाबीनची मर्यादित विक्री केली. पण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारातील आवक वाढली. मार्च महिन्यातील आवक जास्त होती. त्यामुळे सोयाबीनचे भाव दबावात येऊन हंगामातील निचांकी पातळीवर पोहोचले.

तसेच यंदा बाजारातील आवक गेल्या वर्षीपेक्षा जास्तच राहिली. त्यामुळे दरावर दबाव आहे. खाद्यतेल दरातील घटीचाही दबाव सोयाबीनवर आहे. त्यामुळे खाद्यतेल आयातशुल्कात वाढ करण्याची मागणी केली जात आहे. तसेच देशातून सोयापेंड निर्यातीला मागणी कायम आहे.

उद्योगांना सौदे पूर्ण करण्यासाठी सोयाबीन खरेदी करावी लागेल. तसेच शेतकऱ्यांकडील बऱ्यापैकी स्टाॅक बाजारात आला. त्यामुळे शिल्लक मालाचे प्रमाणं कमी झालं. सोयाबीनची आवक पुढील काही दिवस जास्त दिसू शकते. पण त्यानंतर आवक कमी होईल.

सोयाबीनला कशाचा आधार?

- शेतकऱ्यांकडील साठा कमी झाला

- सोयापेंड निर्यात जवळपास दुप्पट झाली

- एप्रिलमध्ये निर्यात विक्रमी होण्याची शक्यता

- बाजारातील आवक कमी होण्याचा अंदाज

- सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्क वाढीचा अंदाज

- आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर पूर्वपातळीकडे

- सोयापेंड दरही मंदीतून सावरले

- शेजारील देशांची सोयापेंडसाठी भारताला पसंती

चालू हंगामातील सरासरी सोयाबीन दर (रुपये प्रति क्विंटल)

महिना…सरासरी दर

ऑक्टोबर…४७००

नोव्हेंबर….५६००

डिसेंबर…५३५०

जानेवारी…५२००

फेब्रुवारी…५१००

मार्च…५०००

तूर यंदा तेजीतच राहणार

चालू हंगामात तूर बाजारात येण्याच्या आधीपासूनच तेजीत आहे. तुरीने नवा माल बाजारात येण्याच्या आधीच ७ हजारांचा टप्पा गाठला होता. त्याला मुख्य कारण होतं देशातील घटलेली लागवड आणि उत्पादकता.

भारताला दरवर्षी ४५ ते ४६ लाख टन तुरीची आवश्यकता असते. मागील हंगामात देशात ४३ लाख ५० हजार टन उत्पादन झाले होते. तर आयात ८ लाख ६० हजार टन होती. त्यामुळे देशात अतिरिक्त पुरवठा राहून दर दबावात होते. शेतकऱ्यांना हमीभावही मिळाला नाही.

त्यामुळं यंदा लागवड कमी झाली. त्यातच बदलते वातावरण आणि पावसाचा पिकाला फटका बसला. त्यामुळे उत्पादन ३६ लाख टनांवर राहील, असा सरकारचा अंदाज आहे. पण व्यापारी आणि उद्योगाच्या मते ३० ते ३२ लाख टनांवरच उत्पादन स्थिरावेल.

मागील हंगामातील स्टाॅकही कमी आहे. सरकारने १० लाख टन आयातीचे उद्दिष्ट ठेवले, तरी आयात ८ लाख ५० हजार टनांवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात तुरीचा पुरवठा कमी झाला. परिणामी तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला सरासरी ८ हजार ते ९ हजार रुपये भाव मिळत आहे. सरकारने मात्र दरवाढीची धास्ती घेतली. कारण तुरीमुळे हरभरा बाजारालाही आधार मिळत आहे.

Soybean Rate Update
Tur Market Rate : खानदेशात तूर दर ८५०० रुपयांवर

पण तूर दरातील ही तेजी सरकारला खुपत आहे. शेतकरी देशोधडीला लागला तरी चालेल पण महागाई कमी झाली पाहिजे, असे सरकारचे धोरण दिसते. काहीही करून तुरीचे दर कमी करण्याचा सरकारचा मनसुबा आहे.

त्यासाठी सरकारने आयातशुल्क काढले, राज्यांकडून स्टाॅकची माहिती घेतली, तूर बाजारावर लक्ष ठेवण्यासाठी समितीही नेमली. त्यानंतर सरकारने एक बैठक बोलावून व्यापारी, स्टाॅकिस्ट, आयातदार आणि मिलर्स यांना तंबी दिली. तुमच्याकडील तुरीच्या खऱ्या स्टाॅकची माहिती द्यावी, असं सरकारने सांगितले.

त्यानुसार व्यापारी आणि इतर घटकांनी आपल्याकडे २९ मार्चपर्यंत १२ लाख ६४ हजार टन स्टाॅक असल्याची माहिती दिली. पुढील काळात सरकारकडून स्टाॅक लिमिटही लावली जाऊ शकते. पण तुरीचा जास्त स्टाॅक शेतकऱ्यांकडे आहे. त्यामुळे त्याचाही बाजारावर जास्त परिणाम होणार नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली.

हरभरा यंदा मंदीतून बाहेर येईल?

मागील वर्षभर हरभरा भाव मंदीत होते. रब्बीतील मला बाजारात येण्याच्या आधी हरभरा दर ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. यंदा हरभरा लागवड तीन टक्क्यांनी कमी होऊन ११२ लाख हेक्टरवर पोचली. सरकारने विक्रमी १३६ लाख टनांचा अंदाज जाहीर केला होता.

पण हरभरा पिकाला यंदा बदलत्या वातावरणासह पावसाचा फटका बसला. मार्च महिन्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळेही पिकाचे नुकसान झाले. शेतकरी यंदा ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नवा माल बाजारात येण्याच्या काळातच हरभरा दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली.

नाफेडची खरेदी सुरू झाल्याचा आधार बाजाराला मिळत आहे. नाफेडने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात खरेदी सुरू केली. या चार राज्यांमध्ये आतापर्यंत ३ लाख ४१ हजार टनांची खरेदी झाली. घटलेले उत्पादन आणि नाफेडच्या खेरदीचा हरभऱ्याला आधार मिळत आहे.

नाफडने यंदा १५ लाख टनांची खरेदी केली तरी खुल्या बाजारात हरभरा दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. तर बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असेही जाणकारांनी सांगितले. पण नंतरच्या काळात हरभरा दर नाफेडच्या विक्रीवर अवलंबून राहतील, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com