Agriculture Commodity Market : कमोडिटी बाजार आर्थिक मंदीच्या छायेत

एकंदर पाहता जागतिक कल मंदीकडे झुकू लागला असला आणि सहा महिन्यांनंतरचे चित्र वायदे बाजारावर आपला प्रभाव दाखवू लागले असले, तरी एप्रिल ते जुलै या चार महिन्यात जागतिक बाजारात सोयाबीनचा पुरवठा मर्यादितच राहणार आहे.
Soybean Market
Soybean Marketagrowon

Agriculture Commodity Market मागील आठवड्यामध्ये आपण या स्तंभातून कमोडिटी बाजारात निर्माण झालेल्या परस्परविरोधी घटनांचा ऊहापोह केला होता.

तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाजारात गोंधळाची परिस्थिती कायम राहणार असल्याची कल्पना दिली होती.

आठवडाभरात त्या परिस्थितीत फार काही फरक पडण्याची शक्यता नाही. परंतु याच काळात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यांचा कमोडिटी बाजारावर (Commodity Market) काय परिणाम होऊ शकेल हेही पाहणे गरजेचे आहे. (Latest Agriculture News)

मागील सप्ताहात अमेरिकेच्या सीबॉट एक्स्चेंजवर सोयाबीन, सोयातेल (Soybean) आणि क्वचित सोयामिलचे (Soymeal) वायदे बऱ्यापैकी डळमळीत राहिले. यामध्ये सोयातेल (Soya Oil) शुक्रवार अखेर दोन वर्षांमधील सर्वांत कमी भावपातळीवर बंद झाले आहे.

ही निश्‍चितच चिंतेची गोष्ट आहे. त्यामानाने सोयाबीन (Soybean Rate) १५ डॉलर प्रतिबुशेल ही पातळी राखताना दिसत आहे. सोयामिल वायदा जरी डळमळीत दिसत असला, तरी २०२२ मधील सरासरी किंमतीपेक्षा १० टक्के अधिक म्हणजे ४८६ डॉलरवर स्थिर आहे.

त्यामुळे एकंदर गोळाबेरीज करता असे दिसून येईल की सोयामिल पुरवठ्याबाबतचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे आणि ते पुढील दोन महिने तरी कायम राहील, असे चित्र आहे.

Soybean Market
Soybean Rate : आज १० मार्चला सोयाबीनला सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला?

याला कारणही तसेच आहे. अमेरिकी कृषी खात्याने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या मार्च महिन्याच्या अहवालात अर्जेंटिनाच्या या वर्षीच्या सोयाबीन उत्पादन अनुमानामध्ये मागील महिन्यापेक्षा दणदणीत २० टक्के कपात केली आहे.

त्यामुळे डिसेंबरच्या अहवालाच्या तुलनेत सोयाबीन उत्पादनात चक्क ३३ टक्के एवढी मोठी कपात होऊन उत्पादन अनुमान ३३० लाख टनांवर आले आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अमेरिकेचे नवीन सोयाबीन बाजारात येईपर्यंत अर्जेंटिनाचे सोयाबीन बाजाराला दिशा देण्याचे काम करत असते. या पार्श्‍वभूमीवर सोयामिल या सोयाबीनपासून मिळणाऱ्या प्रमुख उत्पादनाची चणचण जाणवत राहील, असे तर सीबॉट सोयामिल वायदे बाजार सांगत नसावा?

साधारणपणे बाजाराची दिशा ठरवण्यासाठी अमेरिकी वायदे बाजाराचे नियंत्रक असलेल्या सीएफटीसीचा अहवाल उपयोगी पडतो. तो अहवाल अलीकडे उपलब्ध होत नसल्यामुळे एकंदर बाजारात अनिश्चितता वाढली आहे.

सीएफटीसीचे संकेतस्थळ सायबर चोरांकडून हॅक झाल्यामुळे गेले काही दिवस हा अहवाल मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी सोयाबीनच्या नजीकच्या काळातील किमतीसाठी सोयामिल दिशादर्शक ठरत आहे.

सोयाबीन वगळता अमेरिकेतील इतर शेतीमाल बाजारपेठांमध्ये मागील आठवड्यात मंदीवाल्यांचे अधिक्य राहिलेले दिसून आले आहे.

यापैकी कापूस वायदे बाजारात मात्र शुक्रवारी सुमारे ५ टक्के एवढी मोठी पडझड झाली असून, किमती पाच महिन्यांतील सर्वांत कमी पातळीवर घसरल्या आहेत. याहूनही चिंतेची गोष्ट म्हणजे गहू आणि मका.

राज्यात रबी हंगामातील या पिकांची काढणी होत असताना जागतिक बाजारातील घसरणीमुळे येथील किमतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सीबॉटवर दोन वर्षांतील नीचांक गाठला तर मका १५ महिन्यांतील नीचांकावर बंद झाला आहे.

शुक्रवारची बाजारातील घसरण ही केवळ कमोडिटी बाजारातच नव्हती. तर शेअर बाजारातील मागील दोन-तीन दिवसांतील जोरदार विक्री आणि डॉलरमधील तेजी यामुळे सगळीकडेच मंदी आहे.

तसेच अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ही स्टार्टअपना कर्जपुरवठा करणारी बँक बुडाल्यामुळे देखील शुक्रवारी भारतीय आणि जागतिक बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली आहे.

Soybean Market
Chana MSP : हरभरा यंदा तरी हमीभावाचा टप्पा गाठेल का?

त्यातही मागील लेखात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेतील व्याजदर वाढ अपेक्षेपेक्षा मोठी असण्याच्या चिंतेने सध्या सर्वच बाजारांना ग्रासले आहे.

त्यामुळे संभाव्य जागतिक आर्थिक मंदीची शक्यता अधिकच बळावली आहे. याचाच परिणाम कमोडिटीची मागणी कमी होण्यात होईल, या चिंतेने शेतीमाल बाजारात मंदीचे वारे अधिक वेगाने वाहू लागले असावेत.

असे म्हणतात बाजार आपल्यापेक्षा नेहमीच चार-सहा महिने पुढे असतो. म्हणजे पुढील चार- सहा महिन्यांत काय घडेल याची कल्पना बाजाराला असते आणि त्याचेच प्रतिबिंब चालू बाजारात पडत असते. असे असेल तर सध्याच्या मंदीसदृश परिस्थितीची कारणे काय असतील ही पाहूया.

Soybean Market
Cotton Arrival : तूर, हरभरा, कापसाची वाढती आवक

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे अमेरिकेतील २०२३-२४ साठी पेरणीक्षेत्र अहवाल महिनाअखेरीस प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये पुढील वर्ष कमोडिटी बाजारासाठी कसे राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

सतत तीन वर्षे दुष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर या वेळी तिकडे एल-निनोमुळे चांगला पाऊस होण्याची शक्यता गृहीत धरता या अहवालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून याबद्दलच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.

सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये विशेष वाढ होण्याची शक्यता दिसली नसली, तरी प्रतिहेक्टरी उत्पादकतेमध्ये मोठी वाढ अनुमानित केली जात आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन निदान ५ टक्के तरी वाढेल असे म्हटले जात आहे.

तर मक्याच्या उत्पादनात १० टक्के वाढ अपेक्षित आहे. गव्हाच्या उत्पादनात तर १५ टक्के एवढी मोठी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच कापसाचे उत्पादनदेखील वाढण्याची चिन्हे आहेत.

अमेरिका, ब्राझील यांचे कापूस उत्पादन आणि निर्यातीमधील स्थान बघता बाजारावर या गोष्टीचा परिणाम होणारच. एकंदर पाहता युक्रेनमधील गहू उत्पादनातील अपेक्षित तूट वगळता जागतिक बाजारातील एकूण पुरवठा पुढील पीकवर्षात चांगलाच वाढेल, असे चित्र दिसते.

मात्र पुढील वर्षातील जागतिक अर्थकारण पुरवठावाढीला पूरक असेल का याबाबत साशंकता वाढत आहे. वाढते व्याजदर, महागाईमुळे लोकांची घटती क्रयशक्ती आणि त्यामुळे येणारी मंदी बाजाराने याआधीच अपेक्षित केली असली तरी आता ही मंदी अधिक काळ टिकेल, असे वाटू लागल्यामुळे बाजारामध्ये विक्रीचे दडपण वाढत आहे.

भारतीय शेतीमाल बाजाराचा विचार करता सध्या कापसात जागतिक कल दिसून येऊ लागला आहे. तर सोयाबीन आणि मका तुलनेने स्थिर आहेत.

हरभरा, तूर इत्यादी स्थानिकदृष्ट्या महत्त्वाची पिके हमीभाव खरेदीच्या बातम्यांमुळे अपेक्षेपेक्षा बरा भाव मिळवून देत आहेत. परंतु एल-निनोच्या पार्श्‍वभूमीवर साठेबाज सक्रिय झालेले दिसून येत असून, पुढील काळासाठी ही चांगली गोष्ट आहे.

एकंदर पाहता जागतिक कल मंदीकडे झुकू लागला असला आणि सहा महिन्यांनंतरचे चित्र वायदे बाजारावर आपला प्रभाव दाखवू लागले असले, तरी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत जागतिक बाजारात सोयाबीनचा पुरवठा मर्यादितच राहणार आहे.

त्यामुळे या काळात तेजीच्या छोट्या लाटा येतच राहतील. कापसाच्या बाबतीत भारतातील उत्पादनात यापुढे अजून किती घट अनुमानित केली जाईल, हे पाहावे लागेल.

मक्यात देखील निर्यात मागणी चांगली राहिली असली, तरी वाढणारे तापमान, घटणारे पोल्ट्री उत्पादनांचे भाव आणि सोयामिल व गव्हातील नरमाई यामुळे मक्याच्या भावावरही दबाव राहण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com