
अनिल जाधव
पुणेः मागील आठवड्यापासून कापसाचे भाव पुन्हा कमी झाले. अनेक बाजारांमध्ये (Cottom Market) कापूस दरात क्विंटलमागं ३०० ते ५०० रुपयांपर्यंत घट झाली.
त्यामुळं दरवाढीची प्रतिक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. पण कापूस दरात जास्त नरमाई येणार नाही.
कापसाचे दर (Cotton Rate) पुन्हा वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले.
देशातील बाजारात मागील आठवड्यात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये दर मिळत होता. पण त्यानंतर दरात नरमाई येत गेली.
सध्या कापसाल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. म्हणजेच दरात जवळपास ५०० रुपयांपर्यंत घट झाली.
नेक बाजारांमध्ये कापसाचा किमान भाव ८ हजार रुपयांपेक्षाही कमी झाला.
कापसाचे भाव नरमल्याने दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली. त्यातच सध्या बाजारातील आवक जास्त असून दर वाढणार नाहीत, कापूस दरात आणखी घसरण होईल, अशा अफवाही काहीजण पसरवत आहेत.
पण जाणकारांच्या मते, कापूस दरात जास्त घसरण होणार नाही. पुढील आठवडाभरानंतर कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी यंदा कापूस विक्री मर्यादीत ठेवली. त्यामुळं बाजारात आवक वाढली नाही. परिणामी शेतकऱ्यांकडून यंदा कमी भावात कापूस काढता आला नाही.
कापसाचे भाव टिकून आहेत. बाजारात कापूस दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रीही कमी केली. त्यामुळं दर पुन्हा वाढत आहेत.
सध्या बाजारात अफवा असली तरी कापसाचे भाव पडणार नाहीत. शेतकऱ्यांनी विक्री मर्यादीत ठेवल्यास कापसाचे दरही टिकून राहतील.
त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजारातील अफवांना बळू पडू नये, असं आवाहन जाणकारांनी केलंय. यंदा शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला त्यामुळं कापसाचे भाव टिकून आहेत, असं काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी एका मुलाखतीत म्हटलंय.
कापूस ८५०० रुपयांपेक्षा कमी दरात विकू नये
याचाच अर्थ असा की सध्या कापूस दर काहीसे कमी झाले तरी कापसाच्या दरात जास्त नरमाईची शक्यता नाही.
तर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते. यंदा कापसाला चांगला दर मिळू शकतो.
त्यामुळं शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये. तसंच मार्च महिन्यापर्यंत कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते.
कापूस दर ९ हजार रुपयांच्या पुढे गेल्यानंतर शेतकरी कापूस विक्रीचा निर्णय घेऊ शकतात, असं आवाहनही कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.
प्रतिक्रिया
देशातील कापूस उत्पादनात घटीचा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला. तसंच शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री मर्यादीत ठेवली. चीनकडूनही कापसाला मागणी वाढणार आहे. त्यामुळं कापूस दरात मोठी घसरण होणार नाही. तसेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यानंतर कापूस दरात सुधारणा होऊ शकते. शेतकऱ्यांनी ८ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात कापूस विकू नये.
- राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक
सीएआयने देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज १० लाख गाठींनी कमी केला. देशात आता ३३० लाख ५० हजार गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. पण शेतकऱ्यांनी यंदा कापूस रोखून धरला. उद्योगाला गरजेप्रमाणं कापूस मिळत आहे. मात्र स्टाॅक करता येत नाही. शेतकरी टप्प्याटप्प्यानं कापूस विकत असल्यानं दर टिकून आहेत. कापूस दर कमी होणार नाहीत. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यास देशातही कापूस दर सुधारतील.
- अतुल गणात्रा, अध्यक्ष, काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.