Agrowon Podcast : बाजारातील कापूस आवक वाढली

फेब्रुवारी महिन्यात सरासरी कापूस आवक सव्वा लाख गाठींच्या दरम्यान होती. मात्र आता कापूस आवक दीड लाख गाठींच्या पार पोचली.
Cotton
CottonAgrowon

१) सोयाबीन दरात सुधारणा (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारात आज सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात आज क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा झाली. सोयाबीनची सरासरी दरपातळी आज ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती.

सीबाॅटवर शुक्रवारी सोयाबीनचे वायदे वाढून १५.१९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले. तर सोयापेंड वायद्यानं ४८२ डाॅलरचा टप्पा गाठला होता.

देशात सोयाबीन दर सुधारण्यास अनुकूल स्थिती असून सरासरी दर पुढील काही दिवसांमध्ये ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, अशा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) हरभरा दर दबावातच (Chana Rate)

देशातील हरभरा पिकाला वाढलेल्या उष्णतेचा फटका बसत आहे. उत्पादकता कमी येत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. तर दुसरीकडे नाफेडची खरेदी प्रक्रिया सुरु झाली. लवरकरच प्रत्यक्ष खरेदी सुरु होईल.

सध्या हरभऱ्याला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. नाफेडची खरेदी सुरु झाल्यानंतर मात्र हरभरा बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

३) तुरीला दराचा आधार कायम (Tur Market, Tur Rate)

तुरीच्या दरातील तेजी कायम आहे. वाढलेल्या उन्हामुळं आणि ढगाळ हवामानामुळे तुरीची काढणी वेगाने सुरु आहे. पण बाजारात त्या प्रमाणात तुरीची आवक होत नाही. तर दुसरीकडे तुरीला चांगला उठाव मिळत आहे. त्यामुळं दर टिकून आहेत.

सध्या तुरीला ७ हजार ५०० ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा देशातील घटलेले तुरीचे उत्पादन, शेतकऱ्यांची मर्यादीत विक्री आणि चांगला उठाव यामुळे तुरीचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Cotton
Chana Procurement : हरभरा विक्रीपूर्व नोंदणीचे पोर्टल अद्याप सुरू नाही

४) टोमॅटो आवक काहिशी घटली

बाजारातील टोमॅटो आवक सध्या काहिशी मर्यादीत होत आहे. वाढलेल्या उन्हाचाही टोमॅटो आवकेवर परिणाम होत असल्याचं व्यापारी सांगत आहेत. त्यामुळं सध्या टोमॅटो दर टिकून आहेत.

सध्या बाजारात टोमॅटोला सरासरी १ हजार ते १ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात टोमॅटो आवक आणखी कमी होण्याची शक्यता. त्यामुळं दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत.

५) सध्या कापसाला काय भाव मिळत आहे?

मार्च महिना उजाडल्यानंतर बाजारातील कापूस आवक वाढलेली दिसते. फेब्रुवारी महिन्यात सरासरी कापूस आवक सव्वा लाख गाठींच्या दरम्यान होती. मात्र आता कापूस आवक दीड लाख गाठींच्या पार पोचली. बाजारात कापूस आवक वाढल्यानंतरही रुईचे भाव टिकून आहेत.

खंडीचे भाव मागील अनेक आठवड्यांपासून ६१ हजार ते ६३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. रुईचे दर स्थिर असले तरी सरकी आणि सरकी पेंडेचे दर नरमले आहेत. सरकीकडून कापसावर दबाव येत असल्याचं सांगितलं जातं.

Cotton
Weather Update : राज्यात पावसाला पोषक हवामान

सरकी आणि सरकी पेंडेचे दर क्विंटलमागं २०० ते ३०० रुपयाने नरमले आहेत. सरकीची उपलब्धता वाढल्याचा परिणाम दरावर होत असल्याचं प्रक्रियादारांनी सांगितलं. उन्हाचा चटका वाढल्यानं बाजारातील कापूस आवकही वाढत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.

सध्या साठवणीची जागा नसलेले आणि आर्थिक नड असलेले शेतकरी कापूस विकत आहेत, असे शेतकरी सांगत आहेत. बाजारातील आवक वाढल्यामुळं दरावरही दबाव आला.

मागील काही दिवसांपासून कापूस दर सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाची आवक वाढल्यास दरावरील दबाव कायम राहू शकतो. तसचं आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसेल, असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com