Agrowon Podcast : देशातील काबुली हरभरा उत्पादन घटणार?

जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातून काबुली निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली.
Chana Rate
Chana RateAgrowon

१) कापूस बाजार स्थिरावला (Cotton Market)

कापूस बाजार आज स्थिर दिसला. आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८३.२५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन ६१ हजार ७२० रुपये प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमधील दरही आज स्थिर दिसले.

कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार ३०० रुपये भाव मिळाला. कापसाच्या दरात पुढील काही दिवसांमध्ये सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये काहीसे चढ उतार सुरु होते. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १४.७२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४५६ डाॅलर प्रतिटनावर होते.

देशातील सोयाबीन दरात मात्र काही ठिकाणी आज क्विंटलमागं ५० रुपयापर्यंत सुधारले होते. सोयाबीनला आज सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये दर मिळाला. सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) कांद्यावर आवकेचा दबाव (onion Arrival)

सरकारने ३१ मार्चपर्यंत विक्री केलेल्याच कांद्याला अनुदान जाहीर केले. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीची घाई करत आहेत. परिणामी बाजारात कांदा आवक वाढून दर दबावात आहे. मागील चार दिवसांमध्ये कांदा दरात क्विंटलमागं २०० रुपयांची घट आली.

सध्या कांद्याला सरासरी ४०० ते ६०० रुपये दर मिळतोय. पुढील आठवडाभरात कांदा आवक काहीशी मर्यादीत होऊन लाल कांद्याचेही दर स्थिरावतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Rate
Onion Subsidy : कांदा अनुदान नोंदणीसाठी २० एप्रिलपर्यंतची मुदत

४) हरभऱ्याला नाफेडचा आधार (Nafed Chana Procurement)

नाफेडने देशात आतापर्यंत ३ लाख २१ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक १ लाख ६३ हजार टन तर गुजरातमध्ये ७९ हजार टनांची खरेदी झाली. नाफेडची खरेदी सुरु असल्याने बाजारातील दरालाही आधार मिळत आहे.

त्यातच देशातील पिकाला फटका बसल्याने उत्पादनात घट आली. त्यामुळे हरभरा दर ४ हजार ७०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील हरभरा आवक मर्यादीत झाल्यानंतर दरात आणखी सुधारणा दिसू शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) काबूल हरभरा निर्यात टिकून राहील का? (Kabuli chana Rate)

जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातून काबुली निर्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली. देशात काबुली हरभरा पिकावर बदलते वातावरण आणि पावसाचा परिणाम झाला.

यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. देशात सुरुवातीच्या काळात ४ लाख ५० हजार टन काबुली हरभरा उत्पादनाचा अंदाज होता. पण आता उत्पादन ४ लाख टनांवरच स्थिरावेल, अशी शक्यता आहे.

Chana Rate
Chana Production : हरभऱ्याने बिघडविले शेतकऱ्यांचे अर्थचक्र

भारतीय काबुली हरभऱ्याला युएई आणि श्रीलंकेतून मोठी मागणी आहे. भारताने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात १ हजार १२० लाख डाॅलरची निर्यात झाली. गेल्या आर्थिक वर्षात याच काळातील निर्यात ४६७ लाख डाॅलरवर होती, अशी माहिती विदेश व्यापार महासंचालनालयाच्या आकडेवारीवरून मिळाली.

रमजानमुळेही काबुली हरभऱ्याला चांगलीच मागणी आहे. जागतिक पाईपलाईन खाली आहे. जगात भारत आणि मेक्सिको या दोन देशांमध्ये मोठ्या आकाराच्या म्हणजेच १२ एमएमच्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन होते. मेक्सिकोतील पीक पुढील महिन्यात बाजारात येईल. त्यातच यंदा मेक्सिकोतील उत्पादन यंदा कमी राहणार आहे.

मेक्सिकोत मागील हंगामातील शिल्लक साठा नाही. त्यामुळे भारताला काबुली हरभरा निर्यातीची संधी आहे. लहान आकाराच्या म्हणजेच ८ एमएमच्या काबुलीलाही मागणी आहे. सध्या काबुली हरभऱ्याला बाजारात ७ हजार ते १० हजार रुपये दर मिळतोय. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात तेजी येऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com