Agrowon Podcast : हरभरा दरात मोठ्या पडझडीची शक्यता नाही

देशात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय. अर्थात रब्बी पिकांचं नेमकं किती नुकसान झालंय, याबद्दल केंद्र सरकारनं अजूनही सावध पवित्रा घेतलाय.
Chana Production
Chana ProductionAgrowon

१) सोयाबीनचे दर वाढते राहणार (Soybean Rate)

गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा झालीय. परंतु हा ट्रेन्ड किती दिवस राहील, दर वाढतील की पुन्हा घसरतील, याबद्दल अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. जाणकारांच्या मते सोयाबीनमध्ये दरवाढीचा कल कायम राहण्याची चिन्हे आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रुड ऑईलमध्ये तेजी आलीय. त्यामुळे सोयातेलासह (Soya Oil) सर्वच वनस्पतीजन्य खाद्यतेलांच्या दरात (Edible oil Rate) वाढ झालीय. तसेच सोयापेंड निर्यातीला चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातील साठा कमी झालाय.

प्रक्रिया उद्योगाला आता मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी करण्यावाचून पर्याय नाही. त्यामुळे सोयाबीनच्या दरात पुढील काही दिवसांत प्रति क्विंटल १०० ते १५० रूपयांची वाढ होईल आणि सोयाबीनचे दर टिकून राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

२) तुरीचे दर पाचशे रूपयांनी वाढण्याची शक्यता (Tur Rate)

देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तुरीचे दर तेजीत आहेत. त्यामुळे सरकार हवालदिल झालं आहे. तुरीचे दर आटोक्यात आणण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या उपाययोजनांचा सपाटा लावलाय. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी नुकतीच रिटेलर असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.

तूरडाळीच्या विक्रीवर अवाजवी नफा आकारू नका, अशी सूचना त्यांनी केली. तसेच स्टॉक लिमिटचं हत्यारही सरकार उगारणार हे स्पष्ट दिसतंय. परंतु त्याचा फारसा उपयोग होणार नाही. मुळात उत्पादनच कमी असल्यामुळे बाजारात पुरवठा रोडावणार आहे.

आयातीलाही मर्यादा आहेत. विशेष म्हणजे अनेक व्यापारी, आयातदार आणि स्टॉकिस्टनी परदेशात तुरीचा स्टॉक करून ठेवलाय. त्यामुळे भारतात तुरीवर स्टॉक लिमिट लावली तरी त्यांना काही फरक पडत नाही.

दुसरं म्हणजे सध्या बहुतांश स्टॉक शेतकऱ्यांकडे आहे. शेतकरी दरवाढीच्या आशेने माल रोखून धरलाय. शेतकऱ्यांना स्टॉक लिमिट लागू होत नाही. त्यामुळे सरकारला तुरीच्या दरातील वाढ कृत्रिमरित्या थांबवणं शक्य होणार नाही.

येत्या काही दिवसांत तुरीचे दर पाचशे रूपयांनी वाढतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात तुरीचे दर सरासरी आठ हजार ते नऊ हजार रूपये क्विंटल या रेंजमध्ये राहतील, असं त्यांनी सांगितलं.

Chana Production
Cotton Market : बाजारात मेअखेरीस कापूस आवक वाढणार

३) कापसाचे दर अजून वाढणार

देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात कापसाचे दर आणखी वाढतील; क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची वाढ होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे कापसाला बळ मिळालंय. अमेरिकी कृषी खात्याच्या म्हणजे यूएसडीएचा ताजा अहवाल नुकताच आलाय. त्यानुसार अमेरिकेत कापसाची लागवड तब्बल १८ टक्के घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कापसातील दरवाढीला मोठा आधार मिळालाय.

तसेच बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये कापसाच्या पुरवठ्याची स्थिती आणखी वाईट होण्याची चिन्हे आहेत. दुसऱ्या बाजूला चीनमध्ये कोरोनामुळे थबकलेले व्यापारचक्र पुन्हा मूळपदावर आलेलं आहे. त्यामुळे मागणी-पुरवठ्याचं गणित लक्षात घेता कापसाचे भाव वाढते राहतील, असा तज्ज्ञांचा होरा आहे.

४) विक्रमी गहू उत्पादनाचा अंदाज हुकणार?

यंदा देशात ३४० लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा झालाय. त्यातून यंदा विक्रमी ११२२ लाख टन गहू उत्पादन मिळेल, असा केंद्र सरकारचा अंदाज होता. परंतु गेल्या काही दिवसांत उत्तर भारतातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांचा फटका बसला.

त्यामुळे हा अंदाज हुकण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील ५ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील गहू पिकाचे नुकसान झाल्याचा सरकारचा अंदाज आहे.

तर पंजाब आणि हरियाणात झालेल्या पीकहानीची माहिती संकलित करणं अजून सुरू आहे. त्यामुळे त्याचे आकडे अजून हाती आलेले नाहीत. गहू उत्पादनात घट होणार, हे आता स्पष्ट झाल्यामुळे गहू निर्यातीवरची बंदी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

Chana Production
Chana Procurement : राज्यात साडे सतरा लाख क्विंटल हरभरा खरेदी

५) हरभऱ्याच्या दरात सुधारणा

देशात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालंय. अर्थात रब्बी पिकांचं नेमकं किती नुकसान झालंय, याबद्दल केंद्र सरकारनं अजूनही सावध पवित्रा घेतलाय. उत्पादनात मोठी घट होणार, हे सरकारनं कबुल केलं तर त्याची लगेच बाजारात प्रतिक्रिया उमटते.

महागाईचा दर वाढतो. सरकारने त्याचा धसका घेतलाय. त्यामागे निवडणुकीतील मतांचं राजकारण आहे. त्यामुळे सरकारला काहीही करून शेतमालाचे भाव वाढू द्यायचे नाहीत. म्हणून सरकार अजूनही परिस्थिती आलबेल असल्याचं सांगत आहे.

परंतु कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही. सरकार रब्बी पिकांच्या उत्पादनाबद्दल काहीही दावे करत असलं तरी प्रत्यक्षात जमिनीवरचं वास्तव वेगळं आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांत प्रतिकूल हवामानामुळं हरभरा पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक अभ्यासकांनी त्याला दुजोरा दिलाय.

काही जाणकारांच्या मते काढणीला आलेल्या हरभरा पिकाचं नुकसान १० टक्क्यांच्या घरात आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सांगितलंय की त्यांचा हरभऱ्याचा उतारा यंदा २० ते ३० टक्के कमी होणार आहे. यंदा हरभऱ्याचं मोठं उत्पादन होईल, असा सरकारचा सुरूवातीचा अंदाज होता. त्यामुळे दर दबावात होते.

हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल ५३३५ रूपये आहे. हंगामाच्या सुरूवातीपासूनच दर हमीभावापेक्षा कमी राहिले. परंतु आता उत्पादनवाढीचा अंदाज हुकणार असल्याने बाजारातलं चित्र बदललं आहे.

त्यातच सरकारने नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रासह प्रमुख हरभरा उत्पादक राज्यांमध्ये हमीभावाने खरेदी सुरू केलीय. त्याचा मार्केट सेन्टिमेन्टवर मोठा परिणाम झालाय. दरातील घसरणीला लगाम लागलाय.

नाफेडने आतापर्यंत सुमारे २ लाख ७० हजार टन हरभरा खरेदी केलाय. त्यातली निम्मी खरेदी महाराष्ट्रात झालीय. उत्पादनघटीची शक्यता आणि नाफेडची खरेदी यामुळे हरभऱ्याचे दर टिकून राहतील.

हरभऱ्याच्या दरात मोठी पडझड होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने हरभरा विकू नये, असा सल्ला जाणकारांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com