
Suger Market : ब्राझीलमध्ये एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या हंगामात (Sugar Season) ४०० लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) अपेक्षित आहे.
'जॉब इकॉनॉमिया या संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन ३० लाख टन वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ब्राझीलमध्ये साखर उत्पादनासाठी फारसे सकारात्मक वातावरण नाही. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळामुळे ऊस क्षेत्राला मोठी बाधा पोहोचली.
यातच ब्राझीलने इथेनॉलच्या उच्च किमती गृहीत धरून साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवली. या दोन्हीचा नकारात्मक परिणाम साखर उत्पादनावर झाला.
ब्राझील हा जगातील सर्वाधिक साखर उत्पादन करणारा देश आहे. गेल्या दोन वर्षांची स्थिती याला अनुकूल राहिली नसल्याने देशात साखरेचे उत्पादन घटले. याचा फायदा ब्राझीलपाठोपाठ उत्पादन असणाऱ्या भारताने उठवला. जागतिक बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेचे मोठे स्थान आहे.
ब्राझीलच्या साखरेच्या आवकेवर बहुतांश करून जागतिक बाजारपेठेतील दर अवलंबून असतात. पण गेल्या दोन वर्षांत जागतिक बाजारपेठेत ब्राझीलची साखर हव्या त्या प्रमाणात पोहोचली नाही. पण त्या तुलनेत भारतीय साखरेची चांगली आवक राहिली. यामुळे भारतीय साखरेलाही चांगला भाव मिळाला.
गेल्या वर्षी इथेनॉल दरामध्ये घसरण झाली. याचा फटका ब्राझीलमध्ये इथेनॉल करणाऱ्या उत्पादकांना बसला.
हे गृहीत धरता यंदा साखर कारखाने इथेनॉलपेक्षा साखरेला महत्त्व देतील, अशी शक्यता आहे.
सध्या जागतिक बाजारात साखर तेजीत आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न ब्राझीलचे साखर कारखानदार पहिल्या टप्प्यात करतील, असा अंदाज आहे.
साधारणता एक महिन्यात ब्राझीलची साखर जागतिक बाजारपेठेत पोहोचेल. तोपर्यंत तरी साखरेचे सध्या असलेले उच्चांकी दर कायम राहतील, अशी शक्यता साखर उद्योगाची आहे.
२०२३-२४ मध्ये ३३ अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीपेक्षा १.८ अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन कमी होईल, अशी अपेक्षा आहे.
यंदा सुरू असलेल्या हंगामामध्ये भारत, चीन आणि युरोपियन युनियनसारख्या इतर अनेक उत्पादक देशांमध्ये साखर उत्पादनात घट होत आहे.
यामुळे या देशातून जागतिक बाजारपेठेत फार मोठ्या प्रमाणात साखर येणार नाही अशी अपेक्षा आहे.
याच परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी ब्राझील साखरेचे उत्पादन वाढवू शकते. गेल्या दोन वर्षांपासून निर्यातीच्या पातळीवर ही ब्राझीलची घसरण झाली आहे.
येत्या हंगामात मात्र ब्राझील निर्यातीचा बॅकलॉग भरून काढेल असे चित्र आहे. यंदा ब्राझीलकडून जागतिक बाजारपेठेत २९० लाख टनांपर्यंत साखरेची आवक होईल, असा कयास आहे.
भारतातून कमी साखर निर्यात
भारत सरकारने अजूनही ६० लाख टनांच्यावर निर्यातीला परवानगी दिली नाही. सध्या देशात घटणारे साखर उत्पादन पाहता इथून पुढील काळात केंद्र सरकार जादा निर्यातीला मोठ्या प्रमाणात परवानगी देईल अशी शक्यता कमी आहे.
त्यामुळे येणाऱ्या कालावधीत भारतासारख्या प्रतिस्पर्ध्याकडून जागतिक बाजारपेठेत कमी साखर येण्याची शक्यता आहे. याचा फायदा ब्राझीलच्या साखर कारखानदाराना होईल असा अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.