
Chana Gram News : जळगाव जिल्ह्यातील वावडेमध्ये रब्बीतील हरभरा (Rabi Chana) पीक तयार होऊन पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही शासकीय खरेदीला (Chana Procurement) सुरुवात झाली नसल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना हरभऱ्याची विक्री करत असून, क्विंटल मागे ८०० ते हजार रुपयांचे नुकसान होत आहे.
त्यामुळे शासन हमीभावाने (Chana MSP) हरभरा खरेदी कधी करणार? असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हा मार्केटिंग अधिकारी जळगाव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अजून शासनाचे आदेश नसल्याचे सांगण्यात आले.
शासनाने दरवर्षी हरभऱ्याचा हमीभाव ५३३५ जाहीर केला आहे. देखील बाजार समितीमध्ये मात्र ३८०० ते ४५५० हा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. रब्बीतील हरभरा हे पीक महत्त्वाचे आहे.
मागील १५ ते २० दिवसांपासून हे पीक तयार होऊन हरभरा बाजारात विक्रीसाठी दाखल झाला आहे. मागील आठवडाभरापासून हरभऱ्याची आवकही वाढली आहे. शेतकरी अडचणीत असल्यामुळे मिळेल, त्या भावात विक्री करीत आहेत.
फेब्रुवारी महिना संपत आला तरी अजूनही शासनाने हमीभावाने हरभरा खरेदी सुरू केली नाही. परिणामी, शेतकऱ्यांची क्विंटल मागे आठशे ते हजार रुपयाचे नुकसान होत आहे. दरवर्षी शासनाचे वरातीमागून घोडे असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
शासनाने फक्कड हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करावी, अशी मागणी वेगवेगळ्या संघटनांसह शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
शेतकरी चिंतेत
शासनाकडून शासकीय हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याला उशिर होत असतो. तोपर्यंत शेतकऱ्यांचा बराचसा शेतमाल हा खासगी व्यापाऱ्याला गरजेपोटी विक्री केला जातो. घाम गाळूनही शेतमालाला हमी भाव मिळत नाही.
शासन केवळ हमीभावाचे गाजर दाखवते. प्रत्यक्षात तेवढा भाव मिळत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन बळीराजाला हातबट्ट्याचा खेळ दरवर्षी खेळावा लागतो. मात्र शासनाला याचे कुठलेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते.
नाफेड व्यापाऱ्यांच्याच फायद्याचे...
सध्या रब्बीतील हरभरा शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. मार्च महिन्याअगोदर पीककर्ज भरणे आवश्यक असल्याने शेतकरी खुल्या बाजारात हरभरा विकत आहे.
यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल सातशे ते नऊशे रुपयाचे नुकसान होत आहे. नाफेडची खरेदी उशिरा सुरू केली तर ती व्यापाऱ्यांच्याच फायद्याची ठरणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.